Tuesday, 17 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज ही घोषणा केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने निवडणूक आयोगाला केली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक तसंच परभणी, नाशिक, धुळे, आणि ठाणे महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. राज्यातल्या १९ जिल्ह्यातल्या एक हजार ५७० ग्रामपंचायतींसाठी येत्या ३१ तारखेला मतदान होणार होतं. बीड जिल्ह्यातल्या केज तसंच नांदेड जिल्ह्यातल्या भोकरसह नऊ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या तसंच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. हे सर्व कार्यक्रम आजच्या आदेशामुळे स्थगित झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील कार्यवाहीसंदर्भात स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असंही राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे.
****

 कोरोना प्रतिबंधासाठी मध्य रेल्वेनं नागपूर मुंबई नागपूर नंदिग्राम एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते निझामाबाद एक्सप्रेस सह तेवीस गाड्या येत्या एक एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. प्रवाशांनी याबाबत अधिक माहितीसाठी रेल्वेविभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या अनेक मंडळांनी फलाटावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पन्नास रुपये केले आहेत.

 दरम्यान, मध्य  रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या कामामुळे निझामाबाद-पुणे-निझामाबाद ही प्रवासी गाडी ०१ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड-दौंड-नांदेड प्रवासी गाडी आजपासून येत्या ३० एप्रिल पर्यंत कोपरगाव ते दौड दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
****

 जालना इथं आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी एकजण चीनमधून तर दुसरा गोवा इथून परतला आहे. दोघांच्या थुंकीचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काल विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या तरुणाचा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे.

 दरम्यान, जालना जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मॉल, मोठे बाजार बंद असल्यामुळे फळं आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये आज मोसंबीला प्रतिटन कमाल १२ हजार रुपये दर मिळाला. कापूस आणि रेशीम खरेदीवरही कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा तसंच प्रात्यक्षिक परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव सर्जेराव शिंदे यांनी दिली आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथाचे दर्शन आज रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तहसीलदार तथा मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंग माचेवाड यांनी हे आदेश दिले आहेत.

 अहमदनगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर इथले शनिदर्शन तसंच धार्मिक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आले आहेत. संस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****

 लातूर इथं, येत्या चौदा एप्रिलपर्यंत अपंग प्रमाणपत्र, नोंदणी, तपासणी तसंच वयाचे दाखले वितरण बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत येण्याचं टाळावं, असं आवाहान अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी केलं आहे.
****

 सुधारित नागरिकत्व कायदा - सीएए बाबत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माहिती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी हा कायदा कोणाच्याही मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत नसल्याचं, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. सरकारनं आज न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणारा हा कायदा असल्याचं, या शपथपत्रात म्हटलं आहे.
*****
***

No comments:

Post a Comment