Wednesday, 18 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.03.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****

 राज्यात महत्त्वाच्या सेवा बंद केल्या जाणार नाहीत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे, ते आज सकाळी पत्रकारांशी बोलत होते. पाणीपुरवठा, स्वच्छता, दैनंदिन गरजेच्या वस्तुंची दुकानं राज्यभरात सुरू राहतील, मात्र तातडीची गरज नसलेली कपडा, दागिने आदी दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन टोपे यांनी केलं. मुंबईत नागरिकांनी शहर बस आणि उपनगरी रेल्वेगाड्यांतली गर्दी कमी केली नाही, तर या सेवा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही टोपे यांनी दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत राज्यात विशेष काळजी घेणं गरजेचं झालं आहे, असंही टोपे यांनी म्हटलं आहे. परदेशातून येणाऱ्या, कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या साठ वर्षांखालच्या प्रवाशांच्या हातांवर शिक्के उठवून त्यांना घरीच विलग राहण्याचे आदेश देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या, परदेशातून येणाऱ्या आणि करोनाची लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची, तसंच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना साठी चाचणी करण्यात येत असून, अशा आठशे नमुन्यांपैकी बेचाळीस नमुन्यांमध्ये ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं.


 दरम्यान, राज्यातल्या सात प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी करण्याची सुविधा निर्माण करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. सध्या राज्यात फक्त तीन ठिकाणी, मुंबई, पुणे आणि नागपूर इथे अशी सुविधा असणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. येत्या सुमारे पाच दिवसात केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालय आणि हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये ही सुविधा निर्माण केली जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. राज्याच्या इतर भागांतही अशा प्रयोगशाळा निर्माण करणार असल्याचं टोपे म्हणाले.

 कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात पुणे, मुंबई, नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा त्वरीत सुरू करावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना सादर केलं आहे. मराठवाड्यात हे केंद्र सुरू झाल्यास, संशयितांचे अहवाल लवकर हाती येतील, राज्यातला इतर केंद्रांवरचा ताण कमी होईल, आणि यंत्रणेची दमछाक थांबेल, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****

 कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही राज्यातल्या बंद ठेवण्यात आलेल्या शाळांमधल्या मुलांना माध्यान्ह भोजन मिळणंही बंद झाल्याची दखल घेत, या मुलांना हे जेवण कसं पुरवणार, असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलं आहे. याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्य सरकारांना याबाबतची नोटिस आज जारी केली.
****

 सांगली जिल्ह्यातल्या चांदोली इथलं वारणा धरण आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातलं पर्यटन बंद करण्यात आलं आहे. राज्यातल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण संस्थांना सुटी देण्यात आल्यानं या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनानं हा निर्णय  घेतला आहे.
****

 कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर होण्याचं समन बजावलं आहे. या आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी आज पुण्यात ही माहिती दिली. येत्या चार एप्रिलला पवार यांना मुंबईत या आयोगासमोर हजर व्हायचं आहे.
****

 काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना आज बेंगलुरु पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेले आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे एकवीस सदस्य बेंगलुरुतल्या रामाना रिसॉर्टमध्ये असून, त्यांची भेट व्हावी, या मागणीसाठी दिग्विजय सिंह या हॉटेलबाहेर धरणं धरून बसले होते. ही भेट घेण्यास मनाई करताना पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****

 काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अमरावती तसंच गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार वादळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे. या पावसानं गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्येही काल वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं शेतातल्या पिकांचं नुकसान झाल आहे. सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रातल्या गहू, हरभरा या पिकांसह फळबागांचंही नुकसान झाल्याच्ं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आंब्याचा मोहोरही गळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं ळवलं आहे.
*****
***

No comments:

Post a Comment