Tuesday, 24 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 24 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांपैकी आतापर्यंत १२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या रुग्णांचे नवीन चाचणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या सर्वांना लवकरच रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचं, या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.
****
मुंबईत पोलिसांनी मास्कचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला जेरबंद करून, त्यांच्या ताब्यातून २५ लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये एन नाईन्टी फाईव्ह प्रकारचे सव्वा तीन लाख मास्क असून, हा मास्कच्या या साठ्याची किंमत पंधरा कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी मुंबईत प्रत्यक्ष कारवाईनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून दोन फरारांचा शोध सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलम तीन आणि सात अंतर्गत या सर्वांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. मास्कचा हा मोठा साठा सापडल्यामुळे सर्वसामान्यांची मास्कची मागणी बऱ्याच अंशी पूर्ण करता येईल, असं देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान, नागरिकांनी संचारबंदीचं पालन करावं, अन्यथा सर्वत्र सक्तीनं कारवाई करण्याचे संकेतही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. नागरिकांनी कृपया घरातच रहावं, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आणखी कठोर पावलं उचलायला नागरिकांनी भाग पाडू नये, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या बांधकाम कामगारांसाठी आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. देशातली बांधकामं ठप्प झाल्यामुळे किमान चार कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात गांधी यांनी या कामगारांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सुचवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी काही मुद्यांवर बोलणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गेल्या रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहनही मोदी यांनी अशाच संवादातून केलं होतं.
****
नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं संचारबंदी लागू असताना नागरिक खरेदीच्या निमित्तानं रस्त्यावर येत आहेत. परभणी जिल्ह्यातही अनेक नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. जालना इथंही असंच चित्रं पहायला मिळत आहे.  पोलिस या नागरिकांना थांबवून घरातच राहण्याच्या सूचना देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच डासांचा नायनाट करण्यासाठी जालना इथं नगरपालिकेच्यावतीनं आठही प्रभागात औषधं फवारणी करण्यात येत आहे.
****
बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यावर सर्वत्र शांततेचं वातावरण आहे. सकाळी अकरा ते तीन या वेळेत ही संचारबंदी शिथील केल्यावर काही भागात दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर रेषा आखून ग्राहकांना रांगेत उभे करून सामानाची विक्री केली. दरम्यान, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना शिथीलतेच्या काळात गर्दी न करण्याचं आवाहन केलं असून अन्यथा हा कालावधी देखील बंद करण्यात येईल असे सांगितलं.
****
यवतमाळ जिल्ह्यात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या तीन जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका परिचारिकेचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकतीस मार्चपर्यंत वृत्तपत्र वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली
****
राज्यसभेच्या अठरा जागांसाठी परवा गुरुवारी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासाठीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान, ३७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या सात जागांवरून भाजपकडून डॉ भागवत कराड, उदयनराजे भोसले, आणि रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान तर शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.
****
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची आज आठ महिन्यांनंतर सुटका करण्यात आली आहे.
****


No comments:

Post a Comment