Thursday, 19 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना प्रतिबंधासाठी सरकारनं दिलेल्या सूचना जनतेनं पाळाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज जनतेला थेट संबोधित करून, अनावश्यक गर्दी टाळत, वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याचं आवाहन केलं. या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या परिस्थितीत राज्य सरकारला पूर्ण सहकार्याचं आश्वासनं दिलं असून, केंद्रीय यंत्रणा सर्व सहकार्य पुरवत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या संसर्गाला प्रतिबंध करण्यास राज्य सरकार तसंच वैद्यकीय यंत्रणा सक्षम आहे, राज्यात कोणत्याही वस्तूंचा तुटवडा नसल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळे सिंगापूरमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्याबाबत राज्यसरकारनं आश्वस्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांपैकी पन्नास विद्यार्थी महाराष्ट्रातले असल्याची माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या सर्वांना परत आणण्यासाठी तातडीनं पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेतील विविध विद्यापिठात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थांच्या समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेतील भारतीय दुतावासानं अमेरिकन सरकारला विनंती केली आहे. या विद्यार्थांना भारतात परत आणण्यासाठी अमेरिका सरकारनं या विद्यार्थांना आवश्यक सेवा पुरवाव्यात अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
****
कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि राज्य सरकारांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं तीस अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांची नियुक्ती केली आहे. हे सर्वजण विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर काम करणार आहेत. या अधिकाऱ्यांची एक बैठक आज होणार आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण १७१ रूग्ण आढळले असून यामध्ये ११३ भारतीय तर २४ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामधील १४ रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय आणि त्यावर सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत ते संवाद साधणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
नंदुरबार जिल्हात करोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक उपाययोजना करावी आणि राज्य आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. गरज पडल्यास विलगिकरण कक्षासाठी आदिवासी विकास विभाग आणि समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहाचा वापर करण्याचा  विचार असल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलं.
****
नाशिक शहरात स्वाईन फ्ल्युचे संकट निर्माण झाले आहे. जानेवारी पासून आत्तापर्यंत शहरात सहा रूग्ण आढळले तर मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात चार रूग्ण आढळले आहेत. नाशिक शहरात कोरोनाबाबत विशेष दक्षता घेतली जात असून अद्याप एकही रूग्ण कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. जिल्हातील सर्व म्हणजेच ३१ रूग्णांचे वैद्यकीय चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चौघा दोषींपैकी एक पवन गुप्ता याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. गुन्हा झाला तेव्हा आपण किशोरवयीन असल्याचा दावा त्यानं या याचिकेत केला होता. या चौघा दोषींच्या सर्व दयायाचिका फेटाळल्या गेल्या असून, माफीचे सर्व पर्यायही नाकारण्यात आले आहेत. या चौघांच्या फाशीसंदर्भात यापूर्वी तीन वेळा जारी झालेले डेथवॉरंट रद्द झाले होते, मात्र गेल्या पाच मार्च रोजी जारी झालेल्या डेथ वॉरंटनुसार या चौघांना उद्या पहाटे साडे पाच वाजता दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी दिलं जाणार आहे.
****
मोबाइल संभाषणात येणाऱ्या कॉलड्रॉप समस्येत गेल्या तीन वर्षांत मोठा सुधार झाला असल्याचं, दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. अशा मोबाइल कंपन्यांकडून कॉलड्रॉप बद्दल अडीच कोटी दंड वसूल केल्याचं धोत्रे यांनी सांगितलं. मात्र संजय राऊत यांनी या उत्तरानं समाधान न झाल्याचं सांगत, ज्या कंपन्या ही समस्या दूर करत नाहीत, त्यांच्यावर प्रतिबंध का लावला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
****
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. २४ मे ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा होणार होती, मात्र आता ही स्पर्धा २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
****


No comments:

Post a Comment