Tuesday, 17 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 17.03.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित माहितीची देवाण-घेवाण करण्याची विनंती केली आहे. ही माहिती Mygov या पोर्टलवरही देऊ शकाल, असं मोदी यांनी म्हटलं आहे. या माहितीचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकेल. जैव-तंत्रज्ञान, नवीन संशोधन, वेगवेगळे अॅ्प या बद्दलची माहिती या पोर्टलवर देता येईल.कोरोना विषाणूशी संबंधित आलेल्या विविध उपाययोजनातून सर्वोत्कृष्ट उपाययोजनेला पुरस्कारही दिला जाईल, असंही मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
रशियात पर्यटनासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातले तेरा प्रवासी उज्बेकिस्तानात अडकले आहेत. फिरायला गेलेल्यात सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि पुणे इथले रहिवासी असुन एकूण ३८ जणांचा यात समावेश आहे. कोरोना मुळे परतीच्या प्रवासासाठी विमान उपलब्ध न झाल्यानं हे सर्व परदेशात अडकले आहेत. भारतीय दुतावासकडे त्यांनी मदत मागितली असून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न राज्य सरकार कडून केले जात आहेत.
****
पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आज पहाटेच्या सुमारास जम्मू काश्मीरमध्ये पुंछ इथल्या मानकोटे आणि मेंढर क्षेत्रातल्या नियंत्रण रेषेच्या पलिकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा झाला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानी सैन्यं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं आज पुण्यात निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातल्यर बार्शी इथं जन्मलेले कुलकर्णी यांनी पुणे आकाशवाणीतून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. सुमारे दीडशे चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. यापैकी अशी ही बनवाबनवी, थरथराट, रंगतसंगत, चल रे लक्ष्या मुंबईला, आदी चित्रपटांना मोठी प्रसिद्धी मिळाली. खेळ आयुष्याचा हा नुकताच प्रसिद्ध झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारनंतर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****


No comments:

Post a Comment