Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २० मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना फाशी
** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या रविवारी
सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता संचारबंदी पाळण्याचं पंतप्रधानांचं आवाहन; सरकारच्या सूचना पाळाव्यात -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** २२ मार्चपासून एक आठवडा आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात बंदी
आणि
** बीडच्या अन्न - औषधी प्रशासनाचा
सहायक आयुक्त कृष्णा दाभाडेला पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना
अटक
****
दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना आज
पहाटे ठीक साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात
आली. १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या या प्रकरणी दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयानं २०१३ मध्ये एकूण सहा दोषींपैकी
पाच जणांना फाशी तर एका अल्पवयीन दोषीला तीन वर्ष सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय दिला, यापैकी एका दोषीने तुरुंगात आत्महत्या
केली, तर अल्पवयीन दोषीची तीन वर्षांनंतर सुटका करण्यात आली.
उर्वरित चौघा दोषींनी फाशीच्या अंमलबजावणीवर स्थगिती मिळवण्यासाठी कायद्यातल्या
तरतुदींचा वापर केला, याच प्रक्रियेत या दोषींचं डेथ वाँरट तीन
वेळा रद्द झालं. फाशीला स्थगिती देण्यासाठी चौघा दोषींनी काल
कनिष्ठ न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च
न्यायालयात केलेली याचिकांवर न्यायालयांनी रात्रभर सुनावणी घेत
फेटाळून लावली. त्यानंतर आज पहाटे दोषी
विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना फाशी देण्यात आली. आपल्या मुलीला
सात वर्षानंतर न्याय मिळाला असून या शिक्षेमुळे अशा प्रकारचे गुन्हे
करणाऱ्यांना अद्दल घडेल, अशी प्रतिक्रिया
निर्भयाच्या पालकांनी व्यक्त केली आहे.
****
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
येत्या रविवारी २२ मार्चला सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता संचारबंदी पाळण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल देशाला संबोधित
केलं, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत याची तपासणी जनता संचारबंदीच्या माध्यमातून
करु या, असं ते म्हणाले. कोरोना विषाणूचा
संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळावं, असं ते म्हणाले. कोरोनावर कुठलंही
औषध किंवा लस उपलब्ध नाही, अशावेळी संकल्प आणि संयम या दोन गोष्टी
आपण पाळल्या पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना विषाणू
प्रतिबंधासाठी सरकारनं दिलेल्या सूचना जनतेनं पाळाव्यात, असं आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या जनतेला संबोधित करून, अनावश्यक गर्दी टाळत, घरून काम करण्याचं आवाहन केलं.
या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न
करत आहे, या संसर्गाला प्रतिबंध करण्यास राज्य सरकार तसंच वैद्यकीय
यंत्रणा सक्षम आहे, राज्यात कोणत्याही वस्तुंचा तुटवडा नसल्याचं,
ठाकरे यांनी सांगितलं.
****
देशात २२ मार्चपासून एक आठवडा कोणतेही नियोजित
आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानाला परवानगी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला
आहे. कोरोना विषाणूचा वाढता
प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राज्य
सरकारांनी अधिसूचना काढून ६५ वर्षांवरील व्यक्तींना वैद्यकीय कामाव्यतिरिक्त घराबाहेर
पडू नये, असा सल्ला द्यावा, दहा वर्षाखालील
मुलामुलींना घराबाहेर पडू देऊ नये, रेल्वे आणि हवाई वाहतूक विभागानं
सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती रद्द कराव्या, राज्य सरकारांनी
खासगी क्षेत्राला घरुन काम करण्याची मुभा द्यावी, गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आठवड्याआड
आणि वेगळ्या वेळांमध्ये कार्यालयात हजर राहण्याची सूचना द्यावी,
असे निर्देशही केंद्र सरकारनं जारी केले आहेत.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औरंगाबाद
शहरातली बाजारपेठ उद्या आणि परवा बंद राहणार आहे. जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, औरंगाबाद शहरात गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली
आहे. या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई
केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार
पाण्डेय यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत
होते. आजपासून शहरात हॉटेल्स, पानटपऱ्याही बंद केल्या जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुळजापूर तालुक्यात
अणदूर इथल्या केशव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं जनजागृतीपर पत्रकं तसंच शाळकरी मुलांना
मास्क आणि हात धुण्यासाठी साबणाचं वाटप केलं.
****
मुंबई-पुण्याहून लातूर इथं येणाऱ्या
प्रवाशांची बसमध्येच प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं जिल्हाधिकारी जी
श्रीकांत यांनी काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने
हरभरा, गहू इतर पिकांसह केळीच्या
बागाचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत
अशी मागणी जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातही गारांच्या पावसामुळे झालेल्या
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या लातूर तालुका शाखेच्या
वतीनंही शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई देण्यात यावी, या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.
****
बीड इथं अन्न - औषधी प्रशासनाचा सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे याला पस्तीस हजार
रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. आटा मिलच्या परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी दाभाडे यानं
ही लाच मागितली होती.
****
शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून
ओळखला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी इथल्या
शाळेतले शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडन इथल्या वाकी फौंडेशनचा १०
लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार डिसले यांना येत्या मे महिन्यात
लंडन इथं प्रदान करण्यात येणार आहे.
****
मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम लवकरच सुरू होणार
असल्याची माहिती औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार अंबादास दानवे यांनी
दिली आहे. ते काल औरंगाबाद
इथं वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्याच्या
विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्ह्यासाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींची त्यांनी
माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत वाळू घाटाचा
लिलाव केला नसून चोरीच्या मार्गाने वाळू उपसा केला जात आहे. वाळू तस्कराविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई
करण्याच्या उद्देशाने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ४२
चौक्या स्थापन करण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment