आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० मार्च २०२० सकाळी ११.००
वाजता
****
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांपैकी पाच जणांची
प्रकृती सुधारत असून, त्यांना आज रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या रुग्णांच्या थुंकीचा चाचणी
अहवाल आता निगेटीव्ह आला आहे. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरही या रुग्णांना पुढचे
चौदा दिवस घरी विलगीकरणात राहावं लागणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात आज आणखी तीन नवे रुग्ण आढळले असून, एकूण
कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाल्याची माहिती टोपे यांनी दिली.
दरम्यान,
नागपूर इथल्या मध्यवर्ती कारागृहात मास्कचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे. कारागृह
अधीक्षक अनूप कुमार यांनी ही माहिती दिली. कैद्यांनी तयार केलेले हे मास्क राज्यातल्या
विविध कारागृहांसह नागपूर सत्र न्यायालय, सामाजिक न्यायविभाग, आदिवासी कल्याण विभाग
तसंच इतर सरकारी विभागांना पुरवण्यात येणार असल्याचं, अनूपकुमार यांनी सांगितलं.
****
जालना इथं अन्न-औषध प्रशासन आणि महसूल पथकानं काल सायंकाळी
एका एजन्सीवर छापा टाकून बनावट सॅनिटायझरसह मास्कचा सात लाख रुपयांचा साठा जप्त केला.
या प्रकरणी एजन्सी मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षिण मध्य
रेल्वेनं आणखी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तिरुपती - नगरसोल आणि लोकमान्य
टिळक टर्मिनस - काझिपेट रेल्वे आज आणि २७ मार्चला, नगरसोल तिरुपती आणि काझिपेट - लोकमान्य
टिळक टर्मिनस उद्या आणि २८ मार्चला रद्द करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते
नांदेड २५ मार्चला, नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस २६ मार्चला, तर जालना - दादर जनशताब्दी
एक्सप्रेस आज आणि ३१ मार्चला रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, नांदेड - अमृतसर सचखंड
एक्स्प्रेस आज नांदेड इथून सकाळी साडे नऊ ऐवजी साडे अकरा वाजता सुटणार आहे. तर उद्या अमृतसर येथून सकाळी साडेपाच ऐवजी
सव्वाआठ वाजता सुटणार असल्याचं दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयात
कळवला आहे.
****
No comments:
Post a Comment