Monday, 2 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 02.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 02 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
बोगस बियाणं तसंच बोगस कीटकनाशकं विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अस कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. बोगस बियाणांच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सदस्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात संबंधित कंपन्याविरोधात नव्हे तर कृषी सेवा केंद्रचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले असल्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यावर उत्तर देताना, कृषी मंत्र्यांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचं आश्वासन दिलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पीएसआय पदासाठी काढण्यात आलेल्या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये भटक्या विमुक्त प्रजातींवर अन्याय होत असल्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदनाचं लक्ष वेधलं. या जाहिरातीत सदर प्रवर्गासाठी फक्त दोन जागा आरक्षित असून, याचा आढावा घ्यावा, आणि नियमानुसार जागा आरक्षित ठेवून नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे.
****
धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचा लाभ मिळवून देण्यासाठी विद्यमान सरकानं काय कार्यवाही केली, असा प्रश्न विधान परिषदेत सदस्य महादेव जानकर यांनी आज उपस्थित केला. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता, धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कार्यवाहीच्या मागणीचा जानकर यांनी पुनरुच्चार केला. या संदर्भात टाटा सामाजिक संस्थेचा अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं. यासंदर्भात पूर्वीच्या नोंदी तपासून, सदनाला अवगत केलं जाईल, असं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनायक मेटे, यांनीही या मुद्यावर आपली मतं मांडली, या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे सभापतींना सदनाचं कामकाज आधी पाच मिनिटांसाठी आणि नंतर दहा मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं.
****
कोरोना विषाणू प्रसारासंदर्भात चुकीच्या माहितीवर अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत केलं. सध्या या विषाणूचा एकही रुग्ण राज्यात नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा शोकप्रस्ताव वाचून दाखवला, त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेतही सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव वाचून दाखवल्यावर सदनानं दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र त्यानंतर विरोधी सदस्यांनी दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून सदनात घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरू केल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या निषेधार्थ काँग्रेस, तृणमूल काँग्रेस सह आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या कामकाज सुरू होण्यापूर्वी संसद परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली. दिल्ली हिंसाचारासंदर्भात सदनात चर्चा करण्यासाठी विरोधी खासदारांनी लोकसभा तसंच राज्यसभेत नोटीसही दिली असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक आरोपी पवन गुप्ता याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. उर्वरित तीन दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळून लावलेल्या आहेत. या प्रकरणातल्या चौघा दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनीही या तिघा दोषींचे दयेचे अर्ज यापूर्वीच फेटाळले आहेत, मात्र अक्षय नावाच्या एका दोषीने राष्ट्रपतींकडे पुन्हा एकदा दयेचा अर्ज केला आहे.
****
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्याची आवश्यकता नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठानं आज हा निर्णय सुनावला.
****


No comments:

Post a Comment