Tuesday, 31 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 31.03.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधित ३९ रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधार पडल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, यापैकी चौदा जण मुंबईतले आहेत. पिंपरी चिंचवडमधून नऊ, पुण्यातून सात, नागपूर चार, यवतमाळ तीन, आणि अहमदनगर तसंच औरंगाबाद इथल्या एका रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या सर्वांना त्यांच्या घरी चौदा दिवस विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरात एका मशिदीमध्ये १४ जणांनी सामुहिकरित्या नमाज पठण केलं होती. या सर्वांना विलगीकरणासाठी अहमदनगर इथं पाठवण्यात आलं होतं, त्यापैकी २ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर ३१ व्यक्तींना प्रशासनानं ताब्यात घेऊन अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवल आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेला एकमेव करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त झाला आहे. आणखी दोन दिवस त्याला निगराणीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली
****
सातारा इथं १५ युवकांविरोधात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व जण केक कापण्यासाठी एकत्र जमले होते.
****
पनवेल इथलं मोहिते रूग्णालय पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी काल रात्री बंद केलं. मोहिते रूग्णालयाचे मालक डॉक्टर मोहिते यांची मुलगी परदेशातून आल्यानंतर तिची भेट घेतल्यानंतर डॉ मोहिते यांनी विलगीकरणात न राहता रूग्णालयात जाऊन लहान मुलांवर उपचार केले, याबाबतची माहिती आयुक्त देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी रूग्णालयाची पाहणी करून रूग्णालयाला टाळं ठोकलं.
****
नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेच्या बेघर निवारा गृहात ६० बेघर तसंच प्रवासात अडकून पडलेल्या लोकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ही व्यवस्था करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****



No comments:

Post a Comment