Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १७ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** राज्यात कोरोना विषाणुबाधित
रूग्णांची संख्या ३९; सर्व स्तरावरच्या परीक्षा
३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे राज्य सरकारचे आदेश;
** स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकाही तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव;
** राजकीय पक्ष आणि
संघटनांच्या कार्यक्रम, समारंभ, मेळाव्यांना
परवानगी नाही, धार्मिक स्थळंही भाविकांसाठी बंद
** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांच्यासह सात जणांची राज्यसभेवरची निवड निश्चित
आणि
** जलस्त्रोतांची जपणूक करण्याचं
जलसंपदा मंत्र्यांचं जनतेला आवाहन
****
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. १०८ जण विलगीकरण कक्षात दाखल असून,
एक हजार ६३ जणांना घरातच विलगीकरण करुन ठेवलं आहे. पिंपरी चिंचवड
इथं नऊ, पुणे - सात,
मुंबई- सहा, नागपूर - चार, यवतमाळ, नवी मुंबई, आणि कल्याण
प्रत्येकी तीन, तर रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद इथं
प्रत्येकी एक रुग्ण आहे.
राज्यातली सर्व विद्यापीठं तसंच शाळा आणि महाविद्यालयांना
त्यांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. याशिवाय
सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना २५मार्चपर्यंत घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना विषाणु प्रतिबंधासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या बैठकीनंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली ग्रामीण आणि शहरी
भागातले सर्व महाविद्यालयं, विद्यापीठे तसंच परवानगी असलेले
खाजगी क्लासेस बंद असणार आहेत. २६ आणि २७ मार्च रोजी राज्यातल्या कोरोना विषाणुच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं ते
म्हणाले.
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले
सर्व पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांच्या तासिकांनाही
३१ मार्चपर्यंत सुट्टी असेल, तसंच १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या
पदवी अभ्यास क्रमाच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामकाज सुरु राहणार असून, प्राध्यापकांनी २६
मार्च पर्यंत घरी बसूनच काम करावं, असा आदेश देण्यात आला आहे.
३१ मार्चपर्यंत विद्यापीठातले सर्व वसतिगृहं देखील बंद राहणार असून,
या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या गावाकडे जावं, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या सर्व धर्मियांच्या
प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेऊन भाविकांची गर्दी थांबवण्याचे
निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यंत्र्यांनी काल
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना विषाणुचे संकट
टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव
पूर्ववत साजरे करता येतील, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या कोणत्याही राजकीय पक्षांना आणि संघटनांच्या राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळाव्यांनाही परवानगी देऊ नका, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विविध कामांसाठी नागरिकांनी
शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनानं सात दिवसात कार्यवाही करावी,
असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातल्या स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्तावही यावेळी
देण्यात आला. तसंच ग्रामीण भागातल्या शाळाही बंद ठेवणार, कोरोनाच्या
उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना अनुक्रमे १५
आणि १० कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद
आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक पाच कोटी रुपये असा ४५ कोटी रुपयांचा पहिला
हप्ता देणार, ज्यांना शंभर टक्के घरातर वेगळं राहण्याच्या
सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, जेणेकरुन
समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल, असे
निर्णय यावेळी घेण्यात आले.
दरम्यान, काल दिल्लीत उच्चस्तरीय मंत्री समुहाची आरोग्यमंत्री
हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत युरोपियन संघ, युरोपियन मुक्त
व्यापार संघटना, तुर्की आणि इंग्लंडमधून विमानानं येणाऱ्या प्रवाशांवर आजपासून बंदी
घालण्यात आली आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान आणि कुवैतमधून आलेल्या
लोकांचा किमान १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतलं
सिद्धीविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर बीड जिल्ह्यातलं
परळीचं बैद्यनाथ मंदिर, अंबाजोगाईचं योगेश्वरी देवीचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री
सप्तशृंगी देवीची चैत्रोत्सवातील यात्रा रद्द करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात होणारे
सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी
दिले आहेत. औसा इथं होणारा इज्तेमाही रद्द करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व
आठवडी बाजार, यात्रा, महोत्सव, ऊरूस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर
यांनी काढले आहेत. जिल्ह्यातले मोठे लग्न समारंभ पुढे ढकलण्यात यावेत किंवा मर्यादित
आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
अजिंठा तसंच वेरुळच्या लेण्या, बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, रायगड जिल्ह्यात उरण
तालुक्यातल्या घारापुरी लेणी तसंच खालापूर तालुक्यातलं इमॅजिका वॉटर पार्क आदी पर्यटन
स्थळंही पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
जालना इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काल आणखीन एक
तरुण कोरोनाच्या चाचणीसाठी दाखल झाला. पर्यटनासाठी गोवा इथं गेला असता तो विदेशी नागरिकांच्या संपर्कात
आला होता. त्याच्या लाळेचे नमुने पुणे इथल्या प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवण्यात आले
आहेत.
दरम्यान, जालन्यातल्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा तपासणी
अहवाल नकारात्मक आला आहे.
****
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री
कमलनाथ यांना उद्या विश्वासदर्शक चाचणीला सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहेत. काल विधानसभा
सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या एका मिनिटाच्या भाषणानंतर विधानसभा २६
मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. त्यामुळे काल विश्वासदर्शक ठराव होऊ शकला नाही. करोनाच्या
धास्तीमुळे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मध्यप्रदेश विधानसभेत
काल विश्वासदर्शक ठराव टळल्यानंतर भारतीय जनता पक्षानं आता सर्वोच्च न्यायालयात धाव
घेतली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांच्यासह सात जणांची राज्यसभेची निवड निश्चित झाली आहे. आठवा अर्ज त्रुटींमुळे काल फेटाळण्यात
आल्यानं इतर सात उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे. यामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान, भाजपकडून
उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि डॉक्टर भागवत कराड, काँग्रेसकडून राजीव सातव आणि शिवसेनेकडून
प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. येत्या २६ मार्चला यासंदर्भात
औपचारिक घोषणा करण्यात येईल.
****
नागरिकांनी जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक
करावी, असं आवाहन
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्त्रोतांची जपणूक
व्हावी, याबाबत
लोकसहभागाबाबतची जागृती वाढवण्याच्या भूमिकेतून राज्यात कालपासून जलजागृती सप्ताह सुरू झाला. मुंबईत या सप्ताहाची सुरुवात
करताना जलसंपदा मंत्री बोलत होते. राज्यातला नदीजोड प्रकल्प
स्वबळावर पूर्ण करुन मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळवणं, मराठवाड्याच्या
पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी बंद नलिका पाणी पुरवठा प्रणाली पूर्ण करणं,
पाण्याचा पुनर्वापर तसंच पाण्याच्या पुनर्भरणाची व्याप्ती वाढवणं,
अशी कामं सुरु असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
पैठण इथल्या नाथषष्ठी महोत्सवाची काल दहीहंडीनं सांगता झाली.
संत एकनाथ महाराज समाधी मंदीरासमोर उभारलेल्या मंडपामध्ये भक्तांच्या
आग्रहाखातर यंदा संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीनं वेगळ्या दहीहंडीची व्यवस्था
करण्यात आली होती. कोरोनाच्या सावटाखाली नाकाला रुमाल बांधून
भाविक नाथषष्ठी उत्सवात सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातली चितळी ग्रामपंचायत
निवडणूक काल बिनविरोध झाली. आमदार शामसुंदर शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं
आवाहन केलं होतं.
****
परभणी इथं काल बारावीच्या विज्ञान विषयाच्या परिक्षेत
नक्कल करतांना २६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं.
****
घरासमोरची तसंच ताब्यात असलेल्या जागेची नोंदणी नावावर
करुन देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांदेड जिल्ह्यातल्या खतगाव इथला
ग्रामसेवक संभाजी गोविंद हळदेवाड आणि साहेबराव तुकाराम वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं सापळा रचून काल अटक केली.
****
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या कोसगाव
सज्जा इथला तलाठी अतुल बोर्डे याला काल दोन हजार रुपयांची लाच घेतना पकडण्यात आलं. वारसा हक्क नोंद करण्यासाठी त्यानं ही
लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment