Tuesday, 3 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 03.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 03 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशीही दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून बाधित झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
लोकसभेतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कामकाज सुरू होताच, या मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा शून्यकाळात उपस्थित करता येईल, असं सांगितलं. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, शून्यकाळात या विषयावर बोलताना, फलक झळकावणाऱ्या सदस्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. त्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे अध्यक्षांना कामकाज आधी बारावाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.
****
राष्ट्रहित सर्वोपरि असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. देशाच्या प्रगतीसाठी शांतता, सौहार्द आणि एकता हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे समाजात स्नेहभाव वृद्धिंगत करण्यासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केल्याचं, जोशी यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एनपीआर संदर्भात एक समिती स्थापन करून निर्णय घेणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए संदर्भात आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, राज्यातल्या एकाही नागरिकाच्या नागरिकत्वाला धोका पोहोचू देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुस्लीम आरक्षणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्यासमोर आलेला नाही, असंही ठाकरे यांनी नमूद केलं. मराठा आरक्षण, कर्जमाफी योजना, आदी मुद्यांवरही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. सामना दैनिकाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिल्याने, सामना दैनिकाची भाषा किंवा धोरणात काहीही बदल होणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं. सामना दैनिकात वापरली जाणारी भाषा ही आपली पितृभाषा असल्यानं, ती कायम राहणार असल्याचं, ते म्हणाले. येत्या सात तारखेला आपण अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.
****
अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाधीनतेपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी अशासकीय संस्था एनजीओच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. ते आज विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या वापरावर झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते. आमदार अंबादास दानवे यांच्यासह अनेक सदस्यांनी या मुद्यावर आपली मतं मांडली. औरंगाबाद इथं टोपणनावाने अंमलीपदार्थ विक्री सुरू असल्याकडे अंबादास दानवे यांनी लक्ष वेधलं, ही विक्री बंद करण्यासाठी कठोर कारवाईची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
राज्य सरकारांनी अनाथांना दिलेल्या एक टक्का आरक्षणाचा, अनाथ नसलेल्या अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं निदर्शनास आलं आहे, मात्र पात्र अनाथ तरुणांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना नोकरीत सामावून घेतलं जात नाही, याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. यासंदर्भात लोकसेवा आयोग तसंच सामान्य प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी अनास्था दूर करून, संबंधित तरुणांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी फडणवीस यांनी केली.
****
नाशिक इथल्या लासलगाव कांदा बाजारपेठेत आज कांदा लिलाव सुरळीत सुरू झाले. बाजार समितीत आज जवळपास तेरा क्विंटल कांद्याची आवक झाली. कालच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****.
जम्मू काश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेवरच्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून झालेला गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं, सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा राज्यभरातून १७ लाख, ६५ हजार ८९८ परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत, यापैकी ९ लाख ७५ हजार ८९४ मुलं, तर ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत.
****


No comments:

Post a Comment