Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मार्च २०२० सायंकाळी ६.००
****
कोरोना प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यात पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या चालू वर्षातल्या
सरासरी कामगिरीच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. काही शाळा तसंच
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नववी तसंच अकरावीची परीक्षा सुरू आहे, या वर्गांची उर्वरित
परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार असून, दहावीची उर्वरित परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार
होणार असल्याचं, गायकवाड यांनी सांगितलं.
****
मुंबई महानगर,
पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या चार महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता
इतर सर्व आस्थापना येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी दिले आहेत. आज जनतेला उद्देशून केलेल्या संबोधनात ते बोलत होते. सर्व सरकारी
कार्यालयं २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील, ज्या आस्थापनांना वर्क
फ्रॉम होम अर्थात घरून काम करून घेणं शक्य नाही, त्यांनी काम पूर्ण बंद ठेवावं. मुंबईत
उपनगरी रेल्वे सेवा तसंच शहर बस वाहतुक बंद होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पाणी
पुरवठा, स्वच्छता या सेवांसह बँका नियमित सुरू राहतील.
या बंद काळात
हातावर पोट असलेल्या रोजंदार कामगारांचे पगार कापू नयेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
केलं. नागरिकांनी या बंदला सुटी समजून पर्यटनाला निघू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
केलं. या नंतरही उपनगरी रेल्वेतली गर्दी कमी झाली नाही, तर सार्वजनिक वाहतुक सेवा बंद
करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पुढचे पंधरा
दिवस सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना, व्यवहार बंदीचा निर्णय पुढचे आदेश मिळेपर्यंत
कायम राहणार असल्याचं सांगितलं. विवाह किंवा अंत्यविधीसारखे सुखदु:खाचे विधी कमाल पंचवीस
नातलगांच्या उपस्थितीत करावेत, अशी सूचनाही पवार यांनी केली.
दरम्यान,
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाली असून, पाच रुग्णांची प्रकृती सुधारत आहे,
****
देशभरातली
कोरोना ग्रस्तांची संख्या आज दोनशे तेवीसवर पोहोचली आहे. कोरोना विषाणूसंदर्भात सुरु
असलेल्या प्रत्येक संशोधनावर सरकारचं सातत्यानं लक्ष असून, सरकार संबंधितांच्या सतत
संपर्कात आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत दिली.
शून्य प्रहरात सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते. कोरोना बाधेसंदर्भात कोणाची
चाचणी करायची याबाबतचे निर्देश आणि वैद्यकीय सल्ला स्पष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू
संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मायगोव्ह कोरोना हेल्प डेस्क या नावानं व्हाट्सअप
चॅट सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. ९० १३
१५ १५ १५ या व्हाट्सअप क्रमांकावर जनतेनं आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून हवी
ती माहिती जाणून घ्यावी, ही स्वयंचलित यंत्रणा आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
आखाडा बाळापूर इथं कोरोना विषाणू प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून बाहेर गावावरून
येणाऱ्या प्रवाशांसाठी आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने हात स्वच्छ धुण्यासाठी
बसस्थानक तसंच गर्दीच्या ठिकाणी हात धुण्याचे स्टॉल लावले आहेत. गावांमध्ये जनजागृती
करण्यासाठी लाऊडस्पीकर लाऊन उपाययोजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.
****
नांदेड इथं
कपडा बाजार पेठेत दि क्लॉथ मर्चंट वेलफेयर संघटनेकडून सर्व व्यापारी गुमास्ता हमाल
यांना मोफत मास्क वाटप करण्यात आलं. मार्कण्डेय बँकेचे माजी अध्यक्ष जगन्नाथ बिंगेवार
यांनी ही माहिती दिली. रविवार २२ मार्च रोजीच्या जनसंचार बंदीत नांदेड शहरातील सर्व
दुकाने बंद ठेवून सहभागी होण्याचा निर्णय नांदेडच्या कपडा विक्री व्यापारी संघटनांनी
घेतला असल्याचं बिंगेवार यांनी सांगितले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात देशी-विदेशी मद्य आणि बिअरची किरकोळ विक्री येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे
आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांना
रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी
केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात
गंगाखेड इथल्या समर्थ मंगल कार्यालयाचे मालक सदानंद जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत सर्व मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे
आदेश असतांनाही या मंगल कार्यालयात काल विवाह सोहळा झाला, त्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात
आला आहे.
सांगली जिल्ह्यात
भिलवडी आणि कोकरुड या दोन ठिकाणी अशाच कारणावरून चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत.
****
जालना जिल्ह्यात
जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा काबली सजाचा तलाठी विजय रामभाऊ गरड याच्यासह एका व्यक्तीला
सहा हजार रूपयांची लाच घेतांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. वडिलोपार्जित
जमिनीची वारसाहक्काप्रमाणे वाटणी करून तशी नोंद घेण्यासाठी तलाठी गरड यानं १५ हजार
रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.
****
No comments:
Post a Comment