Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****
कोरोना विषाणूचं संक्रमण
रोखण्यासाठी पाळण्यात येणारी १४ तासांची जनता संचारबंदी उद्या सकाळी सात वाजेपासून
अंमलात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दूरचित्र वाहिन्यांवरून
आवाहन करत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सामाजिक विलगीकरणाच्या माध्यामातून योगदान
देण्याचं आवाहन केलं आहे. या चौदा तासांत घरात थांबण्याबरोबरच जे लोक कोरोना संक्रमणाशी
दोन हात करत आहेत त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता टाळ्या
आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
दरम्यान, या अनुषंगानं
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातून सुटणाऱ्या ४३ गाड्या आज मध्यरात्रीपासून उद्या
रात्री दहा वाजेपर्यंत रद्द केल्या आहेत. यात १३ एक्सप्रेस आणि ३० प्रवासी गाड्यांचा
समावेश आहे. यामध्ये बंगळुरू, तपोवन आणि सचखंड एक्सप्रेससह अन्य गाड्यांचा समावेश असल्याचं
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
भारतीय वैद्यकीय संशोधन
परिषदेनं कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रतिकार करण्यासाठी एक नवी व्यूहरचना
आखत नवी मार्गदर्शिका तयार केली आहे. सर्व रुग्णालयात जे रुग्ण श्वसनासंबंधी आजाराने
त्रस्त असून ज्यांना अल्पश्वसन, ताप आणि खोकल्याचा त्रास आहे त्या सर्वांची तपासणी
करण्याचा निर्णय घेतला आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या पाच ते १४ दिवसांमध्ये
संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचीही एकदा तपासणी करण्यात येणार आहे. देशभरात कोरोनाचे
२५८ रुग्ण सापडले असून दररोज देशाच्या वेगवेगळ्या भागातून नवे रुग्ण समोर येत आहेत.
****
कोरोना प्रतिबंधाबाबत
प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक असून कोरोना प्रतिबंधासाठी
केंद्रीय पातळीवरून आवश्यक असलेल्या उपायोजनांकरता तातडीने पाठपुरावा केला जाईल, असं
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जावडेकर यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे
मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्यसंवादप्रणालीच्या माध्यमातून
संवाद साधला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणूच्या संसर्गानं बाधीत झालेल्या महिला रूग्णाचा अहवाल नकारात्मक आला आहे. आता
औरंगाबाद मध्ये एकही रूग्ण कोरोना बाधीत नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य
चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
कोरोना संसर्गावर
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज राज्यभरात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत. औरंगाबाद
शहरासह जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी
आज आणि उद्या दोन दिवस बंद ठेवण्याच्या आदेशाला चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर शहरातली
मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई आज सकाळपासूनच बंद आहे. हिंगोली शहरासह, जिल्ह्यात
औंढा नागनाथ, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, वारंगा, कनेरगाव नाका,
कुरुंदा या सर्व ठिकाणच्या बाजारपेठा बंद आहेत. नांदेडमध्ये सकाळपासून बाजारपेठ कडकडीत
बंद आहे. जनता संचारबंदीला आजपासूनच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
ठाणे, नवी मुंबई, धुळे, बुलडाणा इथंही कडकडीत बंद पाळला जात आहे.
****
नवी मुंबईतल्या
कामोठे इथं कोरोनाबाधित एका रुग्णाच्या कुटुंबाची कोरोना चाचणी नकारात्मक आढळून आली.
तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबाला घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. मात्र,
त्यांच्यापैकी एक सदस्य घराबाहेर पडल्यामुळे या संपूर्ण कुटुंबाला आता खारघर इथल्या
विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी कामोठे
इथं या कुटुंबाला अचानक भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला.
****
पालघर जिल्ह्यात
एका डॉक्टरनं कोरोना विषाणूसाठी औषध उपलब्ध असून त्या औषधाच्या प्रत्येक डोससाठी १००
रुपये आकारले जातील अशी खोटी जाहिरात केल्यामुळे या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. तसंच या डॉक्टरने विनापरवाना कोरोना विषाणू संदर्भात शिबिर घेऊन गर्दी जमा
करून जमावबंदी आदेशाचा भंग केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ कवी
किशोर पाठक यांचं अल्पशा आजारानं आज नाशिक इथं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. काही
दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झाल्यामुळे ते आजारी होते. कवी कुसुमाग्रज यांचे ते
मानस पुत्र होते. पाठक यांचे सुमारे २८ कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांना
राज्य शासनासह विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले होते.
****
No comments:
Post a Comment