Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****
औरंगाबाद इथं दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये एक महिला तसंच एका पुरुषाचा समावेश आहे. आरेफ कॉलनी तसंच सिडको एन फोर परिसरात
राहणाऱ्या या दोघांवर शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मिनी घाटी मध्ये
उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान,
हिंगोली जिल्हा रुग्णालयात ३१ मार्चला दाखल
झालेल्या पाच कोरोना संशयित रुग्णांपैकी ४९ वर्षीय रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला आहे.
बुलडाणा शहरात ३१ रूग्णांच्या तपासणी अहवालांपैकी तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून
त्यामध्ये एक रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला असून दोघांचे नकारात्मक आले आहेत.
****
कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी संशयितांचा
शोध, तपासणी, आणि विलगीकरण यावर अधिक भर देणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे, ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत
झालेल्या बैठकीत बोलत होते. सामुहिक प्रयत्नातून आपण या संकटावर मात करू, असा विश्वास
पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयांची
गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली. वैद्यकीय उपचारांसंदर्भात माहिती देण्यासाठी ऑनलाईन
प्रशिक्षण आयोजित करावं, तसंच निमवैद्यकीय कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसी
आणि राष्ट्रीय सेवा योजना - एनएसएसच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याची सूचना पंतप्रधानांनी
केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून या बैठकीत सहभागी
झाले. मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची मर्यादा दोन हजार शंभर रुग्णशय्यापर्यंत
वाढवण्यात आली असून पुण्यातही कोविड रुग्णालय उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं, वैद्यकिय उपकरणांसाठी स्थानिक पातळीवरील उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असंही
मुख्यमंत्री म्हणाले.
****
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना
माहिती देताना, स्थलांतरित कामगारांची पूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. या कामगारांच्या
निवास, भोजन तसंच मनोरंजनाची काळजी घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना
दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. एन नाईंटी फाईव्ह मास्क तसंच व्हँटिलेटरचं उत्पादन
वाढवलं जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळावी असं
आवाहनही त्यांनी केलं.
****
पुणे जिल्ह्यात बारामती इथं लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यप्रकरणी
स्थानिक न्यायालयानं तीन जणांना प्रत्येकी तीन दिवस कारावास किंवा पाचशे रुपये दंड
अशी शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अडीचशेपेक्षा
अधिक नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी
दोन रूग्णालयांना राज्य सरकारनं आज परवानगी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मुखेड
इथल्या रूग्णालयात प्रत्येकी पन्नास खाटांची मान्यता दिली आहे.
नांदेड शहरात गल्लीबोळातील रस्ते रहदारीस बंद करण्यात
आले आहेत. यामुळे रस्त्यावर विनाकारण वाहने घेउन फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे.
दरम्यान,
बंदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात गरजूंच्या मदतीसाठी तृतीय पंथी लोकही पुढाकार
घेत आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरात भाजी बाजारात योग्य
सामाजिक अंतर न पाळता नागरिक गर्दी करताना दिसून येत आहे. सूचनांचं पालन होत नसल्यामुळे
प्रशासनाला या संदर्भात कडक पावले उचलावी लागणार आहेत.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातून दिल्लीत निजामुद्दीन
इथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तीन
व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होतं. तिघांचे
तपासणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
दरम्यान
या तीन जणांच्या संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींना घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालूक्यात शिवभोजन थाळीची
सुरूवात करण्यात आली असून या केंद्राकडून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान दररोज दिडशे
भोजन थाळी वितरित केली जाणार आहे. पहिल्या दिवशी ६५ नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतला.
उस्मानाबाद
इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमार्फत शंभर कुटुंबासाठी आवश्यक अशा किराणा साहित्याच्या
पिशव्या देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्याकडे हे साहित्य
सुपूर्द करण्यात आलं.
****
जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेलं बाळासाहेब
ठाकरे समृध्दी महामार्गाचं काम सध्या बंद असल्यामुळे इथल्या परप्रांतीय कामगारांच्या
निवास आणि भोजनाची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. कामगारांचं स्थलांतर
होणार नाही याची खबरदारी कंपनी व्यवस्थापनासह रस्ते विकास महामंडळाकडून घेतली जात असल्याची
माहिती महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे यांनी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment