▼

Saturday, 4 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  राज्यात कोरोनाबाधित नवीन ६७ रुग्णांची नोंद; एकूण बाधितसंख्या ४९०
Ø  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्व देशवासियांना उद्या रविवारी रात्री दीप प्रज्वलनाचं आवाहन
Ø पंतप्रधानांच्या आवाहनावर काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
Ø कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस अधिकारी-कर्मचारी कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान  
Ø प्रधानमंत्री जनधन खातेधारक महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल महिन्याचं अनुदान जमा
आणि
Ø रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं जप्त करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश; परभणीत ६४ वाहनं जप्त
****

राज्यात काल कोरोनाबाधित नवीन ६७ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे कोरोना विषाणूबाधितांची संख्या ४९० झाली आहे. नवीन ६७ रुग्णांपैकी मुंबईत ४३, पुण्यात नऊ, अहमदनगर इथं तीन, तर रत्नागिरी आणि वाशिम इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

दरम्यान, राज्यात काल सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या २६ झाली आहे. तर ४२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्र सरकारच्या सल्ल्यानं राज्य सरकारनं राज्यात ३० रुग्णालयांना फक्त कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या उपचारासाठी चिन्हांकित केलं आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये दोन हजार तीनशे पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली असून तिथे फक्त कोरोना विषाणूबाधितांचाच उपचार केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या बाबतची अधिसूचना जारी  केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
****

देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत देशभरातले १५६ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर प्रकृतीत सुधार झाल्यामुळे घरी परतले आहेत. गेल्या चोवीस तासात देशभरात कोरोना संसर्ग झालेले ३३६ नवीन रुग्ण आढळले असून, बारा जणांचा मृत्यू झाला. देशभरात कोरोनामुळे मृतांची संख्या आता ५६ झाली आहे तर कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार ३०१ झाली आहे. यापैकी ६४७ जण दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातमध्ये सहभागी झाल्याचं आढळलं असून, त्यांच्यामुळे देशातल्या चौदा राज्यांत संसर्ग वाढल्याचं दिसून आलं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि सध्या रुग्णालयात उपचार घेत असताना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश गृह विभागानं दिले आहेत.
****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना उद्या रविवारी रात्री दीप प्रज्वलनाचं आवाहन केलं आहे. रात्री नऊ वाजता घरातले विजेचे दिवे मालवून, घराच्या दारात, बाल्कनीत तेलाचे दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचे दिवे लावून देशाच्या सामुहिक शक्तीची ओळख करून देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. त्यांनी काल दृकश्राव्य फिती द्वारे देशवासियांशी संवाद साधताना हे आवाहन केलं. नऊ मिनिटं हे दिवे सुरू ठेवावेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलं आहे अशा गरीब बांधवांना आपल्याला सोबत पुढे घेऊन जायचं आहे. लॉकडाऊनमुळे आपापल्या घरात असलेले लोक एकाकी पडलेले नसून, संपूर्ण देशाची सामुहिक शक्ती सर्वांसोबत आहे, हे दाखवून देण्यासाठी दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मात्र नागरिकांनी आपापल्या घरातच थांबवण्याची दक्षता घेण्यासही पंतप्रधानांनी सांगितलं आहे.
****

पंतप्रधानांच्या या आवाहनावर काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केली आहे.
कोरोना विषाणूचं संकट आणखी गंभीर होत असताना, पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय साधनांचा पुरवठा करणं, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणं तसंच नागरिकांना धीर देणं आवश्यक असताना, पंतप्रधान दिवे लावायला सांगत आहेत, या शब्दात थोरात यांनी टीका केली. ते म्हणाले...

एकंदर आज गरज आहे मेडिकल इक्विपमेंटस्‍ पुरवणं, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणं, नागरिकांना धीर देणं, हे सोडून दिलं, आत दिवे बंद करा अन्‍ दिवे लावा, टाळ्या वाजवा, हे कुठं पंतप्रधानांचं काम आहे का? कमीत कमी त्यांनी या विषयावरती तरी गंभीर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे.
****

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पंतप्रधानांच्या या आवाहनावर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे कोरोना विषाणूशी लढा देणारे नागरिक नाराज झाल्याचं सांगत, आपण पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणार नसल्याचं, आव्हाड यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाचं स्वागत केलं आहे. दीप प्रज्वलनातून सर्व देशवासियांना एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न असून, त्यांच्या या विचाराचं आपण स्वागत केलं पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.
****

लॉकडाऊनच्या काळात शेतीविषयक सर्व कामं सुरु ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. शेतकरी आणि शेतमजुरांना काम करण्याची परवानगी द्यावी, कृषी उत्पादनांची खरेदी सुरु ठेवावी, भाजी मंडई सुरु ठेवावी, कृषी यंत्राच्या वाहतुकीची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, असं भल्ला यांनी राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. पीक काढणी किंवा इतर शेतीविषयक कामं करताना सामाजिक अंतराचा नियम पाळला गेला पाहिजे, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही गृह सचिवांनी दिले आहेत.
****

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गरीब तसंच गरजूंना विनाअट राशन वितरित करावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते. पुढच्या तीन महिन्यांसाठी आवश्यक धान्यसाठ्यापैकी ९० टक्के धान्यसाठा उपलब्ध झाला असून, उर्वरित साठा येत्या दोन दिवसांत मिळेल, अशी माहिती केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत, त्यांना आधारकार्डाच्या आधारे आणि ज्यांच्याकडे आधार कार्डही नसेल, त्यांची तात्पुरती यादी तयार करून तीन महिन्यांचं शिधावाटप करावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं फडवणीस यांनी सांगितलं. राज्यसरकारकडे बांधकाम कामगारासाठीचा निधी मोठ्या प्रमाणावर जमा आहे, त्यातून बांधकाम कामगारांना तातडीनं मदत द्यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
****

पोलिस दलातल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मुंबईत मंत्रालयात काल झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्यानं देण्यात यावं, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. होमगार्ड - गृहरक्षक दलाच्या जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****

कोरोना विषाणू प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘थ्री प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’, ‘टेस्टींग किट्स्’, ‘व्हँन्टीलेटर्स’ तसंच अन्य वैद्यकीय उपकरणांना वस्तू आणि सेवाकरातून सूट देण्यात देण्यात यावी, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवलं आहे. हा निर्णय त्वरीत घेतल्यास ही उपकरणं सहज आणि स्वस्त उपलब्ध होण्यास मदत होईल, त्यातून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल, असा विश्वास पवार यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.
****

केंद्रीय सुरक्षा दलाच्या खारघर इथल्या ६ सैनिकांचे कोरोना विषाणू चाचणीचे अहवाल सकारात्मक आले आहेत. परवा केंद्रीय सुरक्षा दलाच्या ५ सैनिकांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर, इथले १४६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळंबोली इथल्या एमजीएम रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. आता या दलातल्या एकूण अकरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयात काल तीन कोरोना विषाणू संशयित रूग्ण दाखल झाले. 
****

न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करण्यास सुरूवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठासह राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या न्यायालयांमध्येही अशा प्रकारे कामकाज सुरू करण्यात आलं आहे. या प्रक्रियेमुळे वकिल, वादी-प्रतिवादी, साक्षीदार यांना न्यायालयात उपस्थित न राहता, आहे त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे.
****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधीअंतर्गत सर्व राज्यांसाठी ११ हजार ९२ कोटी रुपये जारी करण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हा निधी देण्याबात आश्वासन दिलं होतं. केंद्रानं राज्य सरकारांकडे असलेल्या निधीत वाढ करण्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठी राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधीचा पहिला हप्ता जारी केला आहे.

दरम्यान, कोविड १९ च्या उपाययोजनांसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानंही विविध राज्यांना १७ हजार २८७ कोटी रुपये इतका निधी जारी केला आहे. यात १४ राज्यांना १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार महसुली तुटीसाठी दिल्या गेलेल्या सहा हजार १९५ कोटी रुपयांचा समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातल्या प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या सर्व महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल ते जून २०२० पर्यत तीन महीन्यासाठी ५०० रुपये दरमाह याप्रमाणे प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम प्रधानमंत्री जनधन खातेधारक महिलांच्या बचत खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याची दोन हजार रुपये इतकी रक्कम थेट हस्तांतरणद्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी ही माहिती दिली.

योग्य कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची वाहनं जप्त करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस विभागाला दिले आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनचं योग्य पालन करावं, कोणीही विनाकारण वाहनं रस्त्यावर घेऊन येऊ नये, असं आवाहन देशमुख यांनी ट्वीटरवरून केलं आहे.
****

परभणी इथं संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर विनाकारण फिरणाऱ्या ६४ जणांची वाहनं जप्त करण्यात आली. पोलीस अधिक्षक कार्यालयानं गरजुंना अन्नधान्याचं वाटप करणाऱ्यांना पास दिले असून, काही जण विनाकारण फिरण्यासाठी पासचा वापर करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे फक्त अन्न वाटप करण्यापुरताच हा पास ग्राह्य धरला जाईल, असं पोलिस अधिक्षकांनी सांगितलं.

जिल्ह्यात सात ठिकाणी स्थलांतरीत कामगारांसाठी मदत शिबिरं सुरु करण्यात आली असून, त्यामध्ये २७१ स्थलांतरितांचा समावेश आहे.
****

दिल्लीतल्या निझामुद्दीन मरकजमधून वाशिम इथं आलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल काल प्राप्त झाला. या व्यक्तीला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. मुंबईतल्या जोगेश्वरीच्या एका जणाचा अहवालही सकारात्मक आला आहे, तो देखील मरकजहून आला होता. या व्यक्तीच्या कुटुंबातल्या इतर सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, जोगेश्वरीत आता कोरोनाबाधितांची संख्या आठ झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं आढळलेल्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या स्रावाचे नमुने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वसमतमध्ये हा रूग्ण राहत असलेल्या तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसराचं सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****

जालना जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात काल २२ नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. विलगीकरण कक्षात सध्या ३४ रुग्ण उपचार घेत आहेत.
****

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी  डॉक्टर विपीन इटनकर यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या प्राप्त यादीतून चौदापैकी आठ जणांचे नमुने हे नकारात्मक आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. उर्वरित सहा रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यात १४६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.
****

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा कडेकोटपणे बंद करण्यात याव्यात असे निर्देश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात होणारी आणि लातूर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात होणारी अनावश्यक वाहतूक पूर्णपणे बंद करावी अशा सूचनाही देशमुख देशमुख यांनी केली आहे.
****

परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं भाजी बाजार तसंच किराणा दुकान याठिकाणी व्यापारी आणि ग्राहक यांच्यात अंतर ठेवण्याच्या नियमाची अंमलबजावणी तंतोतंत होतांना दिसून येत आहे. जिंतूर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
****

हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव नाका इथं गल्ली बोळीतले सर्व रस्ते नागरिकांनी बंद केले आहेत. संचारबंदी नियमांचं काटेकोर पालन करत विनाकारण फिरणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.
****

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून एका खासगी रुग्णालयात काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. अमृता ब्लड बँकेच्या सहकार्यानं घेतलेल्या या शिबिरात १०१ दात्यांनी कोरोना संसर्ग होणार नाही याची योग्य दक्षता घेत सुरक्षित रक्तदान केलं.

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं काल घेतलेल्या रक्तदान शिबीरात ४१ जणांनी रक्तदान केलं
****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड शहरात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विनोद आडेपवार मित्र मंडळाच्या वतीनं काल वीस वंचितांना अन्नधान्याची मदत करण्यात आली. भाजपचे विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांनी स्थानिक विकास निधीतून बिलोली आणि नायगाव इथल्या ग्रामीण रूग्णालयांना चाळीस लाख रूपयांचा निधी देत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना दिलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या उस्माननगर इथं रोजंदारी करण्याऱ्या पाच कुटुंबांना पोलीस अधिकारी थोरे यांनी दत्तक घेतले असून त्यांना अन्नधान्य, किराणा सामान पुरवण्यात येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड कार्यालयाच्या वतीनं अन्नधान्य, किराणा सामान, आदी साहित्याच्या अडीच हजार किट तयार केल्या आहेत.
****

परभणी इथं कम्युनिटी किचन या उपक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी सुरुवात केली. शहरातील २५ गरजू कुटुंबांना पुढचे १५ दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्याचं काल वाटप करण्यात आलं. शहरातल्या बेघर तसंच गरजु नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणीही करण्यात आली.

जालना इथंही शिवसेनेच्या वतीनं गरजू जिल्ह्यात तसंच कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती अभियानाही राबवलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

लातूर जिल्ह्यातल्या जळकोट पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी परराज्यातून राहण्यास आलेल्या कामगारांना अन्नधान्याचं वाटप केलं.

केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यातले आठशे चौदा नागरिक लॉकडाऊनमुळे हिंगोली शहरात अडकून पडले आहेत. या सर्वांसह शहरातल्या विविध रूग्णालयातल्या रूग्णांना शहरातल्या गायत्री शक्तिपीठाच्या माध्यमातून जेवण पुरवलं जात आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -

२२ मार्च पासून सुरू झालेला हा भोजन यज्ञ 14 एप्रिल पर्यंत चालणार आहे. दररोज  २ हजार थाळी  भोजनाचे वाटप होत असल्याचे गायत्री परिवाराचे प्रमुख विजय काबरा यांनी सांगितले. या कामी  गायत्री परिवाराचे  ६० स्वयंमसेवक पूर्णवेळ कार्यरत आहेत.  आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल भोकर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. तालुक्यात केल्या जात असलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी चव्हाण यांनी यावेळी माहिती घेतली. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे स्थानिक विकास निधीतून पन्नास लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
****

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी तीन वाहनं काल बीड जिल्ह्यात धारूर इथं पोलिसांनी ताब्यात घेतली. या ७४ कामगारांना धारुर इथल्या एका शाळेत ठेवण्यात आलं आहे.
****

उस्मानाबाद जिल्ह्यात तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उस्मानाबाद, कळंब आणि तुळजापूर तालुक्यातल्या सर्व कोरोना सहाय्यता कक्षासाठी सॅनिटायझर आणि मास्क वितरित करण्यात आले.
****

जालना इथं उभारल्या जात असलेल्या कोरोना रुग्णालयातल्या विविध पदांसाठी जिल्हा परिषद इमारतीमध्ये थेट भरती प्रक्रिया सुरु आहे. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना सुरक्षित अंतर ठेऊन मुलाखत कक्षात प्रवेश दिला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला भाजीपाला, फळं तसंच इतर नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीकरता परिवहन कार्यालयांमार्फत ई - पास परवाना वितरीत करण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांनी ई-मेलद्वारे अर्ज सादर करावेत, असं आवाहन परभणी इथले आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.बी.आळसे यांनी केलं आहे.
****


अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक कोटी रूपये निधीबरोबरच आपलं एका महिन्याचं मानधन पंतप्रधान मदत कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात टोल फ्री नंबर दिले असून, जे नागरिक इतर ठिकाणी अडकले आहेत त्यांना, ते आहेत त्या ठिकाणीच मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत असल्याचं डॉ विखे पाटील यांनी सांगितलं
****

माजी मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे. पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला शक्य असेल तशी मदत करा. आपल्या वस्तीत आजुबाजूला असलेल्या प्राणीमात्रांनाही मदत करा. प्रशासकीय आदेशांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा, असं त्यांनी आवाहन केलं.
****

परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं भारतीय स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर काल खातेधारकांनी गर्दी केली होती. या दोन्ही बॅंकेच्या शाखा जवळजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. प्रशासनाच्यावतीनं वारंवार सांगूनही अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आला. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचं अनुदान, कर्मचाऱ्यांचे पगार आणि पुढच्या आठवड्यात बँकांना दोन दिवस सुटी आल्यानं, खातेधारकांची गर्दी केल्याचं सांगण्यात आलं.
****

अहमदनगर इथं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून औषध फवारणी सुरू असताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहाणीचा महानगरपालिका कामगार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत तसंच मनपा कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली. बुधवारी रात्री या स्वच्छता निरीक्षकांना मारहाण झाली होती.
****

लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत काल १२७ जणांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ४४ जणांना घरात विलगीकरण करुन ठेवलं आहे. 
****

लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केंद्र सरकारकडे लातूर जिल्ह्यासाठी वीस हजार एन ९५ मास्क, ५० व्हेंटीलेटर मशीन आणि दोन हजार पी पी ई कीटची मागणी केली आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल सर्व खासदारांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी श्रृंगारे यांनी ही माहिती दिली.
****

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या राठोडा गावाबाहेर महानुभाव पंथाच्या साधकांच्या शिबिराला काल अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी भेट दिली. काही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचं, तसंच सामाजिक अंतर राखण्याचा नियम पाळण्याचं त्यांनी आवाहन केलं.
*****
***

No comments:

Post a Comment