Thursday, 16 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.04.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 

 औरंगाबाद शहरात आज दोन नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. यामध्ये शहरातल्या बायजीपुरा भागातल्या १७ वर्षीय कोरोना बाधित रूग्णाची गर्भवती आई आणि एका नातलगाचा अहवाल सकारात्मक आला आहे. डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहरातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ झाली आहे.

 परभणी शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. एम आय डी सी भागात राहणाऱ्या  पुण्यावरून आलेल्या २१ वर्षीय तरूणाचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.  निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी या माहितीला दुजोरा दिला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण बारा रुग्ण आढळले आहेत. यापैकी नऊ रुग्ण सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याचं तर एक रुग्ण कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं बाधित झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे


 दरम्यान, राज्यात आज कोरोना विषाणूचे नवीन १६५ बाधित रुग्ण आढळले आहेत, राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या तीन हजार एक्क्याऐंशी झाली असल्याचं, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. यापैकी दोनशे पंच्याण्णव जणांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
****

 हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं शहरातल्या सर्व खाजगी इस्पितळांचं निर्जंतुकीकरण केलं जात आहे. ज्या इस्पितळांचं निर्जंतुकीकरण राहिलं असेल, त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे संपर्क करण्याचं आवाहन हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केलं आहे.
****

 कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी चीन कडून सहा लाख पन्नास हजार वैद्यकीय कीट भारतात पाठवण्यात आल्या आहेत. बिजींग मधले भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. येत्या पंधरा दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना विषाणू तपासणी संच सुद्धा भारतात पाठवले जाणार आहेत.
****

 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने कर परताव्याच्या दहा लाखांहून अधिक प्रकरणांचा निपटारा केला असून, करपरताव्याचे चार हजार दोनशे पन्नास कोटी रुपये जारी केले आहेत. मागील आर्थिक वर्ष २०१९-२० मधल्या ३१ मार्च पर्यंत जारी करण्यात आलेल्या कर परताव्याच्या दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या व्यतिरिक्त हा निधी मंडळानं जारी केला आहे. या आठवड्यात आणखी पावणे दोन लाख प्रकरणांचा निपटारा केला जाईल, आएि कर परताव्याची रक्कम जारी झाल्यापासून पाच ते सात दिवसांत करदात्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत.

दरम्यान करपरताव्याच्या सुमारे पावणे दोन लाख प्रकरणात करदात्यांनी मंडळाच्या ई मेलला उत्तर दिलेलं नाही. परताव्याची रक्कम लवकरात लवकर अदा व्हावी, यासाठी करदात्यांनी मंडळाच्या ई मेलला लवकरात लवकर उत्तर द्यावं, असं आवाहन मंडळानं केलं आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या बँकेचे आर्थिक व्यवहार सुकर होणासाठी राष्ट्रीयीकृत बँकेतल्या खातेदार ग्राहकांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माधमातून आधार सक्षम प्रक्रियेद्वारे बँकेचे सर्व व्यवहार करता येणार  आहेत. कालपासून हे सर्व व्यवहार सुरु झाले. यामध्ये १० हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम काढणं, शिल्लक रक्कम पाहणं, मिनी स्टेटमेंट, धनादेशचे व्यवहार करता येतील, असं स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी सांगितलं.   
****

 लातूर जिल्ह्याच्या उदगीर इथल्या सामान्य रुग्णालयातले रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी नटवरसिंग तडवी आणि सहायक अधिक्षक शिवराज धानुरे यांना ५०० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. तक्रारदाराचं वैद्यकीय रजेचं आणि ओव्हर टाईमचं बील कोषागार कार्यालयाला सादर करण्यासाठी आणि रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीच्या देयकाचा चेक देण्यासाठी, त्यांनी ही लाच मागितली होती.
****

 जालना जिल्ह्यात चंदनझिरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद बोडले आणि हवालदार अनिल काळे यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पोलीस ठाण्यात स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्ष उभारला आहे. त्यामुळे कशालाही हात न लावता किंवा शरीराचा स्पर्श न होता सुरक्षा राखली जाते.
****

 नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालूक्याच्या पांगरी इथल्या शेतकरी नागरीकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पंचेचाळीस हजार रुपये मदत दिली आहे.
*****
***

No comments:

Post a Comment