Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø देशात कोरोना विषाणू
संसर्गाच्या वेगात ४० टक्के घट; रुग्णांचं कोरोना
विषाणूमुक्त होण्याचं प्रमाण १३ पूर्णांक सहा दशांश टक्के
Ø महाराष्ट्रात नवीन ११८ कोरोनाबाधित
रुग्ण; एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३२० वर
Ø ऊसतोड कामगारांना कुटुंबियांसह आवश्यक तपासण्या करुन स्वगृही परत
पाठवण्याचा निर्णय
Ø घरमालकांनी भाडेवसुली किमान तीन महिने
पुढे ढकलण्याची सूचना; शैक्षणिक शुल्कासाठी विद्यार्थ्यांना
सक्ती न करण्याचे शाळांना निर्देश
आणि
Ø कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी स्वतःची मानक कार्यप्रणाली
तयार करावी - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे
निर्देश
****
देशात कोरोना विषाणू
संसर्गाच्या वेगात सुमारे ४० टक्के घट झाली असून, रुग्णांचं कोरोना विषाणूमुक्त होण्याचं प्रमाण १३ पूर्णांक सहा दशांश टक्के
असल्याचं आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं. टाळेबंदीपूर्वी देशातल्या रुग्णांची संख्या दर तीन
दिवसांनी दुप्पट होत होती, आता सव्वा सहा दिवसांनी रुग्ण संख्या
दुप्पट होत असल्याचं, त्यांनी सांगितलं. देशातंर्गत चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं असताना, रोगप्रसारात
आलेली घट समाधानकारक आहे. सरकारकडून रोगनिदान आणि प्रतिबंधासाठी
आणखी प्रयत्न सुरू असून, जलद चाचणी प्रक्रियेचा वेग वाढवून तीस
मिनिटात अहवाल मिळवण्याचे प्रयत्न करत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.
कोविड १९ या आजारासाठी
विशेष रुग्णालयं तयार करण्यावर सरकारनं भर दिला असून, आतापर्यंत अशी एक हजार १९० रुग्णालयं तयार केली आहेत. कोविडवर लस विकसित
करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, त्याकरता भारतानं जागतिक
भागीदारांसोबत काम सुरु केलं असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.
****
दरम्यान, विलगीकरण क्षेत्रात सलग चार आठवड्यात कोरोना विषाणू बाधित नवीन रुग्ण आढळला
नाही, तर त्या भागावरचं नियंत्रण शिथील करण्याचे निर्देश आरोग्य
विभागानं दिले आहेत. देशात महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, मध्यप्रदेश तसंच राजस्थानातून सर्वाधिक कोरोना
विषाणूबाधित रुग्ण आढळले असून देशभरात १७० हॉटस्पॉट, १२३ हॉटस्पॉट
जिल्हे आढळले असून २०७ जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित रूग्ण नसल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टाळेबंदीच्या काळात टपाल खात्यानं
शंभर टन औषधांसह अनेक आवश्यक वस्तुंची वाहतूक केली असून, दोन लाख पोस्टमनमार्फत बँक खात्यातला पैसा
खातेधारकांपर्यंत पोहोचवला जात असल्याचं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
****
देशात सध्या कोरोना
विषाणू बाधितांची संख्या १३ हजार ३८७ वर पोहोचली आहे. काल दुपारपर्यंतच्या
२४ तासात देशभरात एक हजार ७ नवीन रुग्ण आढळले असून,
२३ कोरोना विषाणूबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत
एक हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
****
महाराष्ट्रात काल नवीन
११८ कोरोनाबाधित आढळले त्यामुळे राज्यातला एकूण कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजार ३२०
वर पोहोचला आहे. काल दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३१ रुग्णांना उपचारानंतर
प्रकृतीत सुधार झाल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात दोनशे
एक रुग्णांचा मृत्यू झाला असून, ३३१ रुग्ण बरे झाले आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या
मालेगाव इथं काल १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं एकूण रुग्णांची संख्या ६२ झाली
आहे. तर काल दोन जणांचा मृत्यू झाला. मालेगावमध्ये या आजारानं आतापर्यंत चार जणांचा
मृत्यू झाला.
****
नंदुरबार शहरात कोरोना
विषाणूचा पहिला रुग्ण काल आढळला. ४८ वर्षीय एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती
नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. हा रुग्ण काही दिवसांपूर्वी
मालेगाव इथं जाऊन आला होता.
****
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित
रुग्णांची संख्या पाचशे ६५ झाली आहे. काल जिल्ह्यात नवीन ६८ रुग्ण आढळले. जिल्ह्यात
तीन रुग्णांचा काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या ४८
झाली असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात
काल १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५२
जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. शहरात २३ जणांना
घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. तर शासकीय वैद्यकीय
रुग्णालय आणि महाविद्यालय - घाटीत काल २५ रुग्णांची तपासणी करण्यात
आली.
****
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या
कौळखेडच्या सात जणांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय
ढगे यांनी दिली. संचारबंदी लागू असतांना हे कुटुंब मुंबईहून
एका खाजगी वाहनानं कौळखेड इथं आलं होतं. शासनाच्या आदेशाचं उल्लंघन
केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या कुटुंबाविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना घरात विलगीकरणात ठेवण्यात
आलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात पहिला कोरोना
विषाणू सकारात्मक रूग्ण काल कोरोना विषाणूमुक्त झाला आहे. त्याला काल जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यावेळी
रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी या रूग्णास आनंदाने निरोप दिल्याच आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात २० रुग्णांपैकी
तिघांचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता १७ कोरोना विषाणू बाधित सकारात्मक रुग्ण
आहेत.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक
उपाय योजना म्हणून नांदेड शहरात महापालिकेच्या वतीनं स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणं या विषयी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेतली.
या बैठकीस उपस्थित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी आवश्यक
सूचना केल्या.
****
परभणी शहरात संचारबंदीची कडक
अंमलबजावणी करण्यात येत आहे. परभणीत कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळून आल्यामुळे, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी उद्यापर्यंत
संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या
जिंतूर इथं काल नागपूर सहकारी साखर कारखान्याचे
५१ ऊसतोड कामगार दाखल झाले, त्या सर्व कामगारांना ग्रामीण रुग्णालयात
नेऊन त्यांच्या हातावर होम क्वारनटाईनचे शिक्के मारण्यात आले, त्यानंतर या सर्वांना
शहरातल्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
****
राज्यातले ऊसतोड कामगार आणि
त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक तपासण्या करुन स्वगृही पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं
घेता आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
या साखर
कारखान्यांनी त्यांच्याकडील कामगारांची तात्पुरती निवारा ग्रहे सुरू केली आहे. व कामगारांना
त्यांच्या मूळ गावी सोडू इच्छित आहेत. त्यांचे वास्तव्य निवारा ग्रहात मदत छावणीत मदत
१४ दिवसापेक्षा जास्त झाल्यास जी कारखाने लवकर
बंद झाली तसेच अश्या सर्व कारखान्यावरच्या ऊसतोड मजूर बंधू-भगिनींना परत घरी येण्याच्या
संदर्भातला राज्य सरकारने हा निर्णय घेतला. ह्या ऊसतोड मजूर बंधू-भगिनींना त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या कारखान्यांचे एमडी
आणि पोलिस अधीक्षक यांनी योजना आखून द्यायची आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना त्या-त्या
जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या ऊसतोड मजूर बंधू-भगिनींकडे पाठवायचं. आपण टप्प्याटप्प्याने
या ठिकाणी या त्याचबरोबर अगोदर महिलांना आणि जे लहान बालक आहेत त्यांना आपण अगोदर पुढे
गावी पाठवा.
पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग यासह राज्यातल्या विविध भागात साखर कारखाना परिसरात
अडकलेले बीड, अहमदनगर यांसह विविध जिल्ह्यातल्या
ऊसतोड मजुरांना, या निर्णयामुळे आता आपल्या
घरी परत जाता येणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गावर
उपचार करून घ्यायला तयार नसणाऱ्या रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे
निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या या निर्देशात, उपचारांबाबत
उदासीन असलेल्या अशा रुग्णांपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना असलेला धोका पाहता,
त्यांना योग्य सुरक्षा देण्यास सांगितलं आहे.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेनं रिव्हर्स
रेपो दरात पाव टक्क्याने कपात केली आहे. त्यामुळे रिव्हर्स
रेपो दर चार टक्क्यांऐवजी तीन पूर्णांक ७५ शतांश टक्के एवढा झाला आहे. बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या दरकपातीचा बँकिंग क्षेत्राला लाभ होईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा लघु
उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, या क्षेत्राला
चालना देण्यासाठी रिजर्व्ह बँकेनं राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्डला २५ हजार कोटी, राष्ट्रीय लघुउद्योग विकास बँक- सिडबीला १५ हजार कोटी तर नॅशनल हाऊसिंग
बँकेला दहा हजार कोटी रुपये मदतही जाहीर केली आहे.
****
२० एप्रिलनंतर राज्यातल्या
काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसंच अटी आणि शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक
उपक्रमांना सुरू करण्यात येत आहे. यादृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित
मार्गदर्शक आदेश जारी केले आहत. नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केलेली ठिकाणं वगळून
इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील. मात्र सामाजिक
अंतर, स्वच्छतेचे नियम पाळणं, मास्क घालणं या आणि अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात
आलेल्या नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. लोकांना अत्यावश्यक
सेवा, जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळत राहतील,
पण धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांमध्ये एकत्र येणं, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा,
सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
केंद्र सरकारनं आर्थिक
आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावं, अशी विनंती
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना येणं बाकी असणारी वस्तू आणि सेवा कर- जीएसटीची थकबाकी मिळावी, जीएसटीची पुढील रक्कम दरमहा वेळेवर मिळावी, राज्याच्या
उत्पन्नातली अपेक्षित तूट लक्षात घेऊन पुढील पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा
दहा हजार कोटी रुपयांचं
अनुदान दिलं जावं, आदी मागण्या पवार यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना
करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीनं काल आरोग्य, वैद्यकीय
शिक्षण, पोलिस, गृह रक्षक दल आणि इतर
विभागातल्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं वेतन-मानधन तात्काळ
अदा करण्याचा निर्णय घेतला. राज्यात स्थावर खरेदी-विक्रीचे
व्यवहार सुरु करुन त्यांची नोंदणी पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने करण्यास परवानगी देण्याचा तसंच चालू
आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनाचा २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्याचा निर्णयही उपसमितीनं
घेतला आहे.
****
राज्यात घरमालकांनी भाडेकरुंकडून
भाडेवसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, अशी सूचना गृहनिर्माण
विभागानं जारी केली आहे. कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर
टाळेबंदी लागू असल्यामुळे सर्वसामान्य कामगारांचा रोजगार बंद
असल्यानं, त्यांना नियमित घरभाडे भरणं शक्य होत नसल्याचं दिसून
येत आहे. या परिस्थितीत घरभाड्याची रक्कम वेळेवर अदा न केल्याच्या
कारणावरून कोणत्याही भाडेकरूला घरातून काढू नये अशी सूचनाही करण्यात आली आहे.
गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबाबतचं
पत्र जारी केलं.
****
शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना
चालू तसंच आगामी शैक्षणिक वर्षाचं शुल्क भरण्याची सक्ती करू नये, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. शुल्क
भरण्याची सक्ती करणाऱ्या शाळांविरोधात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचं
आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, सर्व पालकांना केलं आहे. त्या
म्हणाल्या....
मला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पालकांच्या
विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. की त्यांच्या शाळेच्या अजूनही या लॉकडाऊनच्या
काळामध्ये फीची मागणी होत आहे. सर्व संस्थांना आणि शाळांना याठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या
माध्यमातून एक परिपत्रक पाठवले गेलेल आहे. आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला
सांगण्यात आले आहे, या काळातमध्ये लॉकडाऊनमध्ये आपण विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करू नये. आणि अश्या
संदर्भामध्ये कुठलीही मागणी होत असेल तर माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आव्हान
आहे, की त्यांनी यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे
या संदर्भातील जी तक्रार नोंदवावी. आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जे शासन पत्र शासनाने पाठवलेले आहे
त्याची अंमलबजावणी व्हावी.
****
सरकारनं आदिवासी भागासाठी प्रत्येक
महिन्याला किराणा आणि इतर खर्चासाठी पाच हजार रुपयांची
तरतूद करावी आणि ऑक्टोबर २०२० पर्यंत मोफत धान्य द्यावं अशी मागणी
अहमदनगरचे माजी आमदार वैभव पिचड यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
टाळेबंदीमुळे आदिवासी भागातल्या नागरिकांना हाताला काम नसल्यामुळे कुपोषण
आणि भूकबळीची परिस्थिती निर्माण होत असल्याचं पिचड यांनी राज्यपालांना
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
पालघर जिल्ह्यात ग्रामस्थांनी
चोर असल्याच्या गैरसमजातून केलेल्या मारहाणीत तीन प्रवाशांचा
मृत्यू झाला. गुरुवारी रात्री दाभाडी - खानवेल
मार्गावर हा प्रकार घडला. नाशिककडून येणाऱ्या वाहनातल्या
प्रवाशांची विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना चोर समजून दगड आणि
इतर साहित्यानं मारहाण केली. या मारहाणीत वाहन चालकासह दोन प्रवाशांचा
मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राज्य शासनानं
रब्बी हंगाम २०२० चा कापणी अहवाल स्वीकारला असून हरभरा खरेदीचं प्रमाण
वाढवलं आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातल्या हमीभाव केंद्रावर
शेतकऱ्यांचा ११ पूर्णांक २९ क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार आहे. याआधी जिल्ह्यातून फक्त साडे सहा क्विंटल हरभरा खरेदीचा निर्णय शासनानं घेतला
होता, मात्र यावर्षी हरभऱ्याचं हेक्टरी उत्पादन १० ते १५ क्विंटल
पर्यंत झालं असल्यानं, खरेदीचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला
होता, त्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टरी ९ क्विंटल
६२ किलोग्रॅम, जालना १० क्विंटल ५८ किलोग्रॅम, बीड ११ क्विंटल ५६ किलोग्रॅम, लातूर ११ क्विंटल २९ किलोग्रॅम,
उस्मानाबाद ८ क्विंटल ५ किलोग्रॅम, नांदेड १७ क्विंटल
८ किलोग्रॅम, परभणी ८ क्विंटल ६८ किलोग्रॅम, तर हिंगोली जिल्ह्यात प्रतिहेक्टर ९ क्विंटल ८५ किलोग्रॅम हरभरा खरेदी केला जाणार आहे.
****
उस्माबाद जिल्ह्याच्या
कळंब तालुक्यातल्या होगाव इथल्या साई जिनींग ॲण्ड प्रेसिंग कंपनीत पुढच्या आठवड्यात
कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एन. नवीन
सोना यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली. कापूस खरेदी करताना मास्क लावणं,
सामाजिक अंतर राखणं, सॅनिटायखरचा वापर करणं, या नियमांचं पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी
दिल्या.
दरम्यान, उस्मानाबाद
इथल्या खरेदी केंद्रावर आजपासून तूर खरेदी सरु करण्यात येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे
रोजगार बंद झालेला असताना, प्रधानमंत्री जनधन योजनेच्या महिला खातेधारकांना
पाचशे रुपये तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतला दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता
बँक खात्यात जमा झाला आहे. यामुळे शेतकरी तसंच महिला वर्गात समाधानाचं
वातावरण आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली,
उस्मानाबाद सह अनेक भागातल्या नागरिकांनी याबद्दल पंतप्रधानांचे आभार
मानले आहेत.
****
नांदेड इथल्या संत पाचलेगावकर
महाराज मुक्तेश्वर आश्रमाच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे
एक रूपये मदत देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव टाक यांच्यासह विश्वस्तांच्या
हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्याकडे या रकमेचा धनादेश काल सुपूर्द
करण्यात आला.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १७
लाख ५५ हजार रुपयांची रक्कम दिली आहे. कुलगुरू
डॉ प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी काल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे हा मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
****
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेनं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५ लाख
आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख, असा एकत्रित १० लाख रूपयांचा
निधी दिला आहे. अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे हा
दहा लाख रूपयांचा मदत निधीचा धनादेश काल सुपूर्द
करण्यात आला.
****
टाळेबंदीच्या काळात नागरिकांसाठी
प्रशासनाच्या वतीनं विविध उपाय योजना करण्यात येत आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं नागरिकांसाठी हेल्पलाईन
सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या किन्ही
गावातल्या धनश्री मोरे यांच्या आईसाठी या हेल्पलाईनद्वारे घरपोच औषध मिळाली.
त्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले, त्या म्हणाल्या....
माझ्या आईला कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे. माझ्या आई सारखे
बरेच लोक आजारी आहेत. त्यांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन नंबर वाचला होता वॉटस ॲपवर.
आणि त्या माध्यमातून कागदपत्र जमा करून माझ्या आईसाठी दरमहिन्याला जे मेडिसीन आणावे
लागते ते मागवण्याचा प्रयत्न केला.ते आज पोलिसांनी एसपी मॅडमच्या माध्यमातून घरपोच
आणून दिलं. बऱ्याच लोकांची देवावर श्रध्दा असते.पण आज पोलिसच देवाच्या रूपात येवून
आज मदत केली त्यामुळे मी पोलिसांचे मनापासनू आभार मानते. आणि खुप खुप धन्यवाद.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
होऊ नये म्हणून प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्वतःची मानक कार्यप्रणाली तयार
करावी, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. शेतमाल
खरेदी- विक्रीसंबंधी समस्यांचं निराकरण
करण्याबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्हा उपनिबंधकांनी
योग्य मानक कार्यप्रणाली निश्चित करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार
समित्यांचा व्यवहार सुरू करण्याबाबतचा अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ एप्रिलपासून अशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरू करण्यास
परवानगी द्यावी, असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या
सारोळा ग्रामपंचायतीनं गावात येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.
तसंच गावातल्या वस्तीमध्ये विषाणू प्रतिबंधक फवारणी करत कोरोना
विषाणू संसर्गासंदर्भात जनजागृती अभियान राबवत असल्याची माहिती सरपंच अशोक पोटभरे यांनी
दिली.
दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या पूर्णा शहरात भाजी बाजार सुरु ठेवण्यासंदर्भात
स्थानिक प्रशासनामध्येच समन्वयाचा अभाव दिसून आला. यामुळे ग्रामीण
भागातून भाजीपाला आणलेल्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात तेलंगणा सीमेलगत
असलेल्या सगरोळी गावात स्वस्त धान्य दुकानदार संतोष बामने हे
शासनाच्या निर्णयाचं पालन करत पहिल्या टप्यातल्या धान्याचं घरपोच वाटप
करत आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच किलो तांदूळ
घरपोच वाटपाचा शुभारंभ सरपंच व्यंकट पाटील सिद्धनोड यांच्या हस्ते काल झाला.
दरम्यान, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वच्छतेची
आणि सुरक्षेची कामं करणाऱ्या कामगारांना कुलगुरु डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते काल जीवनावश्यक वस्तूं संचाचं वाटप करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात स्वस्त धान्य
वितरणाबाबत प्राप्त तक्रारीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसय्ये
यांनी पाच दुकानांवर कारवाई केली आहे. यातल्या
दोन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून तीन दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात
आली आहे.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे
खासदार हेमंत पाटील यांनी कुरुंदा आणि गिरगांव आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली
आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत
माहिती घेतली.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं
एका घरात २५ ते ३० नागरिक एकत्र प्रार्थना करत असल्याचं गस्त घालणाऱ्या
पोलिसांच्या निदर्शनास आलं. याच घरात स्वस्त धान्य
दुकानातले तांदळाचे सहा पोते आढळून आल्यानं
या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment