Saturday, 18 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.04.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशातील कोरोना विषाणू बाधीतांची संख्या चौदा हजार तिनशे अठ्ठ्याहत्तर झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. यातील एक हजार नऊशे एक्क्याण्णव रुग्ण बरे झाले असून एकानं स्थलांतर केलं आहे. संसर्ग झालेल्यांपैकी ७६ विदेशी नागरिक आहेत. देशात या विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चारशे ऐंशी झाली आहे.
****

 औरंगाबाद इथं आज सकाळी एका कोरोना विषाणू बाधित ६५ वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. गेल्या तेरा तारखेला या महिलेला खासगी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोळा एप्रिल रोजी या महिलेला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं.  शहरातील एका पंधरा वर्षीय मुलाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर औरंगाबादमधे विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २९ आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. यातील दोन रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****

 जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी परिसरातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सोळा मजुरांना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. यातल्या एका मजुराच्या  पत्नीनं मागील आठवड्यात जालन्याहून  गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यात प्रवास केला होता. नर्मदा जिल्हा प्रशासनानं केलेल्या तपासणीत या महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत अधिकृत माहिती प्राप्त होताच जालना जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून रात्री उशिरा कंपनीतल्या मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्या लाळेचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याच जालना जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. एम. के.  राठोड यांनी सांगितलं.

 दरम्यान, मुंबई आणि बीडहून बंदोबस्तावरुन परतलेल्या राज्य राखीव दलाच्या दहा जवानांनाही विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. राठोड यांनी दिली आहे.
*****
***

No comments:

Post a Comment