Sunday, 19 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.04.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 

 देशभरात कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ७१२ इतकी झाली आहे. यापैकी २ हजार २३० जण उपचारानंतर बरे झाले असून, १२ हजार ९७४ जणांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. कोरोनाबाधित सर्वाधिक ३ हजार ६५१ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक २११ मृत्यूही महाराष्ट्रातच झाले असून, त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये ७०, गुजरात ५३ आणि दिल्लीमध्ये ४२ लोक कोरोनामुळे मरण पावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

 राज्यात गेल्या  २४ तासात कोरोनाबाधित ३२८ नवीन रुग्ण आढळून आले असून, १० जण मरण पावले आहेत.
****

 चीननं कोरोना विषाणूचं मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहराला आता कमी धोक्याचं क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गेल्या १४ दिवसांत ज्या प्रांतांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही ते भाग कमी धोक्याचे क्षेत्र असल्याचं चीन सरकारनं म्हटलं आहे. तर ज्या भागात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागांना अति धोक्याचे क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 हायड्रोक्सि क्लोरोक्विन या औषधाचं सेवन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पोटदुखी, अस्वस्थता आणि शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी होण्याचे त्रास दिसून आले आहेत, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या एका अभ्यासातून समो आलं आहे. या औषधाच्या परिणामांचा परिषद अभ्यास करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, आज सकाळी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला खासदार, आमदारांसह सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सध्या ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जळगाव जिल्ह्यात एका ६० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ऑरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा दोन दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाला होता. याआधी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण होते, त्यापैकी एक जण उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला, तर एकाचं निधन झालं होतं.
****

 कोल्हापूर शहरात आज कोरोनाचा आणखी एक रूग्ण सापडला आहे. मुंबईहून कोल्हापुरला आलेल्या कंटेनर चालकाचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७ झाली आहे.

 दरम्यान, टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून, आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त दुचाकी जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 यवतमाळ इथं दोन जणांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. हे दोघं कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांना लागण कोरोनाची लागण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथं चोर समजून तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी १११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यापैकी ९ आरोपी १८ वर्षांखालील असल्यामुळे त्यांना भिवंडी इथल्या बालगृहात पाठवण्यात आलं असून, अन्य आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अनेक बँकांमध्ये पैसे उचलण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आखाडा बाळापूर इथं जिल्हा मध्यवर्ती बँक उघडण्याआधीच नागरिक रांगा लावत आहेत. यामुळे सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड आणि नाशिक रोड इथल्या गोदामांमधून १ हजार ५७५ दुकानदारांना वितरणासाठी ११ हजार मेट्रीक टनांहून अधिक तांदूळ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात या योजनेत एकूण ७ लाख ६५ हजार ९६७ कार्डधारक आहेत. या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातल्या २ लाख ३९ हजार २८२ कार्डधारकांना तांदूळ मिळाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं राबवण्यात येत असलेल्या शिवभोजन योजनेचा अनेक गरजू आणि गरिबांना लाभ मिळत आहे. टाळेबंदी दरम्यान ५ रुपयात संपूर्ण जेवण देण्याची सुविधा या योजनेत करण्यात आली आहे, मात्र माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर हे स्वखर्चातून गरजूंना जेवण देत आहेत. सकाळी ११ ते २ या वेळेत या केंद्रावर सर्वांना मोफत जेवण दिलं जात आहे.
*****
***

No comments:

Post a Comment