आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ एप्रिल २०२० सकाळी ११.००
वाजता
****
मुंबईहून औरंगाबादेत येऊन प्रसूत झालेल्या कोरोनाग्रस्त
महिलेच्या नवजात मुलीचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टरांनी
काल या महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली होती.
त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १२
रुग्णांचा १४ दिवसानंतरचा पहिला चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. चोवीस तासांच्या अंतरानं
त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली असून, अहवाल येणं बाकी असल्याचं डॉ. कुलकर्णी यांनी
सांगितलं.
****
लातूर इथं उपचार
सुरू असलेल्या आठही कोरोनाबाधित रुग्णांचा १४ दिवसांनंतरचा दुसरा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे. मूळचे आंध्र
प्रदेशामधल्या नंदियाल इथले हे यात्रेकरु गेल्या ४ एप्रिला निलंग्यात आढळून आले होते.
अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना काल रात्रीच लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय
विज्ञान संस्थेतून हलवून निलंगा इथं विलगीकरण कक्षात पाठवलं असल्याची माहिती संस्थेचे
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथल्या एका व्यक्तिचा
कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आज स्पष्ट झालं आहे. ३ दिवसांपूर्वी या व्यक्तिचा मृत्यू
झाला होता. मात्र, त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला नसल्यानं, त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या
ताब्यात देण्यात आला नव्हता. आज त्याचा अहवाल आला आणि तो कोरोना बाधित होता, हे स्पष्ट झालं आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर
यांनी दिली.
****
सांगलीत कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. हा ४७
वर्षीय रुग्ण विजयनगर इथला असून, तो सांगलीतील एका सहकारी बँकेचा कर्मचारी आहे. या
व्यक्तीच्या कुटुंबियांचेही लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, तो परिसरही प्रतिबंधित
करण्यात आला आहे.
जिल्ह्यात यापूर्वी इस्लामपूरमधे कोरोनाचे २६ रुग्ण
आढळले होते, त्यापैकी २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एका महिलेचा अहवाल अद्याप प्राप्त
झालेला नाही.
*****
***
No comments:
Post a Comment