आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ एप्रिल २०२० सकाळी ११.००
वाजता
****
पालघर जिल्ह्यात जमावाच्या
मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये, असं आवाहन
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून बोलत होते.
मुलं पळवणारी टोळी असल्याचा गैरसमजाने ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू
झाला. या प्रकरणी आठ तासात एकशे एक लोकांना अटक करण्यात आली, यापैकी एकही व्यक्ती मुस्लिम
नसल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीकडे
देण्यात आला असून, विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी तपास करत असल्याची माहिती
देशमुख यांनी दिली.
दरम्यान, आर्थिक घोटाळ्यातील
आरोपी असलेल्या वाधवान कुटुंबाचा विलगीकरणाचा काळ आज दुपारी पूर्ण होत आहे, त्यानंतर
या कुटुंबीयांना केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने ताब्यात घ्यावं, असं पत्र सीबीआयला
दिलं असल्याचं, अनिल देशमुख यांनी सांगितलं. सीबीआय ताब्यात घेईपर्यंत वाधवान कुटुंबीय
शासनाच्या ताब्यात राहील, त्यांना पसार होऊ दिलं जाणार नाही, असंही गृहमंत्र्यांनी
सांगितलं आहे.
****
नांदेड शहरात आज कोरोना विषाणू
बाधित सकारात्मक रूग्ण आढून आला आहे. शहराच्या
पीरबुऱ्हाणनगर भागात राहणारी ही ६४ वर्षे वयाची व्यक्ती कोरोना बाधित असल्याची
माहिती जिल्हा प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. हा परिसर सील करण्यात
येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथं कोरोनाबाधित
दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे या आजारानं शहरात आतापर्यंत मरण पावलेल्यांची
संख्या पाच झाली आहे.
दरम्यान औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यानं संचारबंदीच्या कालावधीत वाढ
करण्यात आली आहे. आजपासून दुपारी
एक ते रात्री ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद
यांनी जारी केले आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण औद्योगिक वसाहती मधल्या शालिनी केमिकल या रसायनाच्या बंद असलेल्या कारखान्यात
आज सकाळी स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशाचा झाला हे अजून समजलेलं नसून औद्योगिक वसाहतीतला
अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाला आहे. पुढील तपास औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या
वतीनं करण्यात येत आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवीत हानी झाल्याचं वृत्त नाही.
*****
No comments:
Post a Comment