Thursday, 30 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.04.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 
लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात एक लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट पडण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधत होते. या महसुली तुटीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची पुनर्रचना, अल्पमुदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मुदत कर्जात रुपांतर, कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं, पीककर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा, असे अनेक उपाय पवार यांनी सुचवले. उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी असेच अनुकूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन संपल्यानंतर बेरोजगारी आणि कुशल मनुष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे.
इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन चतुरस्र अभिनेत्यांना पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
****
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले ऋषी कपूर यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. ऋषी कपूर यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीतला दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. ऋषी कपूर यांचं आज सकाळी मुंबईत एका खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू बाधित असलेल्या २६ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४७५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतली कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ६ हजार ६४४ वर पोहचली आहे. मुंबईत आतापर्यंत २७० जणांचा मृत्यू झाला आहे तर १९३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
****
हिंगोली शहरात आज नवीन चार रुग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यात राज्य राखीव पोलीस दलातील तीन सैनिक तर राज्य राखीव दलाच्या जालना इथल्या कोरोनाबाधित सैनिकाच्या संपर्कातल्या नव्या एका व्यक्तीचा समावेश आहे. आजच्या सकारात्मक रुग्णांसह हिंगोली इथली कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील ८ आणि संपर्कात आलेल्या २३ अशा ३१ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बाधित महिलेने परभणीत उपचार घेतलेल्या रुग्णालयातल्या तीस जणांचंही विलगीकरण करण्यात आलं आहे. या सर्वांचे लाळेचे नमूने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
****
धुळे इथं दाखल ७५ वर्षीय महिलेचा काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही महिला कोरोना विषाणू बाधित होती असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील सर्व दुकानं, शेती संदर्भातील दुकानं आणि इतर किरकोळ दुकानं तसंच बँकाही बंद आहेत. सर्व भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून रस्त्यांवर  शुकशुकाट असल्याचं चित्र दिसत आहे. आज आणि उद्या असा दोन दिवस हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
****
नांदेड शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी अनोखी शिक्षा सुनावली आहे. शहरातील पोलीस कवायत मौदानाजवळच्या चौकात काम नसतांना भटकणाऱ्यांना पोलिसांनी उन्हात बसण्याची शिक्षा केली आहे.
****
अमरावती इथं आज ४ जणांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. यामुळे अमरावती इथली रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे.
दरम्यान, अमरावती महानगर पालिकेतर्फे नागरिकांना घरपोच फळ आणि भाजीपाला उपलब्ध करून देण्याऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या चार प्रभागांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून वाहन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नागरिकांना कळवण्यात आला आहे. नागरिकांना भाजीपाला विक्रेत्याशी थेट संपर्क साधून आपली मागणी नोंदवता येणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आज आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांनी आहार कसा घ्यावा, सामाजिक अंतर कसे ठेवावे याबाबत डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****

No comments:

Post a Comment