▼

Friday, 3 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळा

·      पंतप्रधानांच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनावर काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

·      कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस अधिकारी-कर्मचारी कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान

आणि

·      वैद्यकीय उपकरणांवरचा वस्तू आणि सेवा कर रद्द करण्याची राज्यसरकारची मागणी

****

देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत देशभरातले १५६ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर प्रकृतीत सुधार झाल्यामुळे घरी परतले आहेत. तर गेल्या चोवीस तासात देशभरात कोरोना संसर्ग झालेले ३३६ नवीन रुग्ण आढळले असून, बारा जणांचा मृत्यू झाला. देशभरात कोरोनामुळे मृतांची संख्या आता ५६ झाली आहे तर कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार ३०१ झाली आहे. यापैकी ६४७ जण दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातमध्ये सहभागी झाल्याचं आढळलं असून, त्यांच्यामुळे देशातल्या चौदा राज्यांत संसर्ग वाढल्याचं दिसून आलं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि सध्या रुग्णालयात उपचार घेत असताना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश गृह विभागानं दिले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री केलेल्या दीपप्रज्वलनाच्या आवाहनावर काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केली आहे.

कोरोनाचं संकट आणखी गंभीर होत असताना, पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय साधनांचा पुरवठा करणं, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणं तसंच नागरिकांना धीर देणं आवश्यक असताना, पंतप्रधान दिवे लावायला सांगत आहेत, या शब्दात थोरात यांनी टीका केली. ते म्हणाले...

एकंदर आज गरज आहे मेडिकल इक्विपमेंटस्‍ पुरवणं, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणं, नागरिकांना धीर देणं, हे सोडून दिलं, आत दिवे बंद करा अन्‍ दिवे लावा, टाळ्या वाजवा, हे कुठं पंतप्रधानांचं काम आहे का? कमीत कमी त्यांनी या विषयावरती तरी गंभीर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पंतप्रधानांच्या या आवाहनावर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे कोरोनाशी लढा देणारे नागरिक नाराज झाल्याचं सांगत, आपण पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणार नसल्याचं, आव्हाड यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाचं स्वागत केलं आहे. दीप प्रज्वलनातून सर्व देशवासियांना एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न असून, त्यांच्या या विचाराचं आपण स्वागत केलं पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

****

कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब तसंच गरजूंना विनाअट राशन वितरित करावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते. पुढच्या तीन महिन्यांसाठी आवश्यक धान्य साठ्यापैकी ९० टक्के धान्यसाठा उपलब्ध झाला असून, उर्वरित साठा येत्या दोन दिवसांत मिळेल, अशी माहिती केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत, त्यांना आधारकार्डाच्या आधारे आणि ज्यांच्याकडे आधार कार्डही नसेल, त्यांची तात्पुरती यादी तयार करून तीन महिन्यांचं शिधावाटप करावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं फडवणीस यांनी सांगितलं. बांधकाम कामगारासाठीचा निधी मोठ्या प्रमाणावर जमा आहे, त्यातून बांधकाम कामगारांना तातडीनं निधी द्यावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

****

पोलिस दलातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मुंबईत मंत्रालयात आज झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्यानं देण्यात यावं, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. होमगार्ड गृहरक्षक दलाच्या जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

****

‘कोरोना’ प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’, ‘टेस्टींग किट्स्’, ‘व्हेन्टीलेटर्स’ तसंच अन्य वैद्यकीय उपकरणांना वस्तू आणि सेवाकरातून सूट देण्यात यावी, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवलं आहे. हा निर्णय त्वरीत घेतल्यास ही उपकरणं सहज आणि स्वस्त उपलब्ध होण्यास मदत होईल, त्यातून ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल, असा विश्वास पवार यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.

****

दिल्लीतल्या निझामोद्दीन मरकजमधून वाशिम इथं आलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला. या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेलं आहे.

****

मुंबई उपनगरातल्या जोगेश्वरी इथं दिल्लीच्या मरकजहून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातल्या इतर सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, जोगेश्वरीत आता कोरोनाबाधितांची संख्या आठ झाली आहे.

****

केंद्रीय सुरक्षा दलाच्या खारघर इथल्या ६ सैनिकांचे कोरोना विषाणू चाचणीचे अहवाल सकारात्मक आले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या ५ सैनिकांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर, काल १४६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळंबोली इथल्या एमजीएम रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. या दलातल्या एकूण अकरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

****

संचारबंदी असतानासुद्धा, मिरज इथं सामुहिक नमाज पठण केल्या प्रकरणी ३६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ३२ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर चार जण अल्पवयीन आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड शहरात भाजपचे नगरसेवक विनोद आडेपवार मित्र मंडळाच्या वतीनं आज वीस वंचितांना अन्नधान्याची मदत करण्यात आली. भाजपचे विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांनी स्थानिक विकास निधीतून बिलोली आणि नायगाव इथल्या ग्रामीण रूग्णालयांना चाळीस लाख रूपयांचा निधी देत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना दिलं आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या उस्माननगर इथं रोजंदारी करण्याऱ्या पाच कुटुंबांना पोलीस अधिकारी थोरे यांनी दत्तक घेतले असून त्यांना अन्नधान्य, किराणा सामान पुरवण्यात येणार आहे.

दरम्यान,कोरोना विषाणू प्रतिबंध आणि उपचारासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे स्थानिक विकास निधीतून पन्नास लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

****

जिंतूर इथं भाजी मार्केट तसेच किराणा दुकान याठिकाणी व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी तंतोतंत होतांना दिसून येत आहे. जिंतूर शहरात नाकाबंदी करण्यात येऊन चेकपॉईंन्ट उभारण्यात आले आहेत.

****

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून एका खासगी रुग्णालयात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अमृता ब्लॅड बँकच्या सहकार्यानं घेतलेल्या या शिबिरात १०१ दात्यांनी कोरोना संसर्ग होणार नाही याची योग्य दक्षता घेत सुरक्षित रक्तदान केलं.

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं आज घेतलेल्या रक्तदान शिबीरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले

****

परभणी इथं कम्युनिटी किचन या उपक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी सुरुवात केली. शहरातील २५ गरजू कुटुंबांना पुढचे १५ दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्याचं आज वाटप करण्यात आलं. शहरातील बेघर तसंच गरजु नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणीही करण्यात आली.

****

जालना इथं शिवसेनेच्या वतीनं गरजू नागरिकांना पाच किलो धान्य आणि जीवनाश्यक साहित्याच्या कीटचे वापट केलं जात आहे.

****

No comments:

Post a Comment