Thursday, 16 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      स्थलांतरित कामगारांसाठी निवास भोजन आणि आरोग्य सुविधा निश्चित करण्याच्या राज्य सरकारांना सूचना. 

·      १६ हजार शहरांत कोरोना चाचणीसाठी नमुना संकलन केंद्र; पाच लाख रॅपीड टेस्ट किट्स प्राप्त.

·      कोरोना बाधितांबाबतच्या दिशानिर्देशांचं उल्लंघन तसंच चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल एका वृत्तवाहिनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे राज्याच्या गृहविभागाचे निर्देश.

आणि

·      कोरोना प्रतिबंधासाठी लातूर जिल्ह्यात अँटी कोरोना फोर्सची निर्मिती.

****

स्थलांतरित कामगारांसाठी निवास, भोजन आणि आरोग्य सुविधा निश्चित करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांशी केलेल्या चर्चेनंतर या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि असं प्रत्येक शिबीर एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली असावं, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

दरम्यान, देशभरात १६ हजार शहरांमध्ये कोरोना बाधितांच्या चाचणीसाठी नमुना संकलन केंद्र उभारण्यात आली असून, पाच लाख रॅपीड टेस्ट किट्स प्राप्त झाल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

देशभरात गेल्या चोवीस तासात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ४१४ झाली आहे. गेल्या चोवीस तासात देशभरात १८३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, आतापर्यंत एक हजार चारशे एकोणनव्वद रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. देशभरात तीनशे पंचवीस जिल्ह्यांमध्ये आज एकही कोरोना सकारात्मक रूग्ण आढळला नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. 



कोरोना संसर्ग नसलेल्या भागात २० तारखेपासून लॉकडाऊनच्या नियमात सशर्त सूट दिली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन होणाऱ्या घटनांवर गृहमंत्रालय दररोज लक्ष ठेवून असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

दरम्यान, जगभरातल्या त्रेपन्न देशात तीन हजार तीनशे छत्तीस भारतीयांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, त्यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला असल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असलेल्या ५५ देशांना हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे औषध निर्यात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं वृत्तही पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

****

कोरोना विषाणूच्या साथीमुळे युपीएससी- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आणि मुलाखतींच्या नव्या तारखा संचारबंदी संपल्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाइटवर माहिती दिली जाईल, असं आयोगानं म्हटलं आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी वर्षभरासाठी मूळ वेतनात ३० टक्के कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे.

स्टाफ सिलेक्शन कमीशन - कर्मचारी निवड आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या काही परीक्षांच्या तारखांचा निर्णय तीन मे नंतर घेऊन या तारखा मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येतील, असं मंडळानं कळवलं आहे. आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन पंतप्रधान मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

****

कोरोना विषाणूच्या धोका दूर करण्यासाठी सरकारनं आकस्मिक तपासण्या सुरू करण्याची आवश्यकता असल्याचं, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी, या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण देशानं एकजूट होण्याचं आवाहन केलं. या संकटातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात साहित्य पुरवठा होण्याच्या गरजेवर गांधी यांनी भर दिला.

****

कोरोना बाधितांबाबतच्या दिशानिर्देशांचं उल्लंघन तसंच चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल एका वृत्तवाहिनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश राज्याच्या गृहविभागाने दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीसंदर्भात चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित वार्ताहर तसंच वृत्तनिवेदकाविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, वांद्रे रेल्वेस्थानक गर्दी प्रकरणी अटक झालेले एबीपी माझा वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे. पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ झाली आहे. आज तीन नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. यामध्ये शहरातल्या बायजीपुरा भागातल्या १७ वर्षीय कोरोना बाधित रूग्णाची गर्भवती आई आणि एका नातलगाचा अहवाल सकारात्मक आला आहे. बिस्मिल्ला कॉलनीतल्या एका ६५ वर्षीय महिलेचा अहवालही सकारात्मक आला आहे.

****

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रुग्णांना घरी जातांना टाळ्यांच्या गजरात आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी निरोप देत असून सोसायटी सदस्य सुद्धा गॅलरीत उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करत आहेत. अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून त्यामुळे उपचार करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि कोरोना बाधीत रुग्ण त्यांचे कुटुंबिय यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत आहे.

****

सामाजिक सुरक्षा अंतर राखणे आणि तोंडाला मास्क बांधणे ही आता जीवनशैली व्हावी अशी अपेक्षा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. फोनवरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना चाचणी करण्याची प्रयोगशाळा लातूर इथं लवकरच सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पुण्यात कोरोना बाधित तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला, यामुळे पुण्यातली कोरोनाबाधित मृतांची संख्या ४६ झाली आहे. या तिघांनाही आधीपासून विविध विकार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३७ झाली आहे.

****

नाशिक जिल्ह्यांत आणखी दोन कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या अठ्ठेचाळीस झाली असून यापैकी मालेगावच्या चाळीस रूग्णांचा समावेश आहे.

****

पालघर जिल्ह्यात कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या एकोणसत्तर झाली आहे. आज दुपार पर्यंत चौदा नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. एकूण रूग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

****

सैन्य दलात भरतीसाठी बीड जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढचा आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि परीक्षेचा अर्ज भरताना नोंदवलेल्या आपल्या इमेलवर येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावं, असं सैन्य दलानं म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात ‘अँटी कोरोना फोर्स’ची निर्मिती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावं, यासाठी पोलीस विभाग प्रभावी अंमलबजावणी करत आहे. परंतु या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अँटी कोरोना फोर्स काम करणार आहे. पोलीस तसंच सैन्य भरतीची तयारी करणारे तरूण, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसंच माजी सैनिक यांनी एकत्रित येऊन कोरोना पासून संरक्षणासाठी अँटी कोरोना फोर्सची स्थापना करावी असं जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लातूर इथं मास्क न लावता फिरल्याबद्दल आज दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, या नागरिकांकडून सुमारे साडे सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या ऊमरदरी गावात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मोफत अन्नधान्य वाटप योजना राबवण्यात येत आहे. गावात प्राधान्य कुटुंब योजनेत अकराशे एकोणावीस लाभार्थी तर अंत्योदय योजनेचे एकशे छपन्न लाभार्थी आहेत. सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच मोहनाबाई कोनापूरे यांनी केलं आहे.

****

लातूर इथं दरवर्षी प्रमाणे सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं गायक सुरेश भट यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी गझल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी स्पर्धकांना पारितोषिक न देता सर्व गझलकारांच्या शुल्क निधीत भर घालून १५००० रुपये पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले.

****

२५ मार्च ते ३ मे दरम्यान ज्या प्रवाशांनी विमानाचे तिकीट आरक्षित केली होती त्यांना काणतेही शुल्क वजा न करता संपूर्ण परतावा मिळाला पाहिजे असं नागरी उड्डयण मंत्रालयानं सांगितलं आहे. टाळेबंदीमुळे देशांतर्गत विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या उड्डाणांसाठी रोख परतावा न देता त्याऐवजी ती रक्कम भविष्यात होणाऱ्या प्रवासी खर्चात जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रवाशांनी सामाजिक माध्यमांवर तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर मंत्रालयानं हे निर्देश जारी केले आहेत.

****

No comments:

Post a Comment