Saturday, 18 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीचा ओघ. 

·      राज्यातील अर्थव्यवस्थेला टप्प्याटप्प्यामध्ये चालना देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.

·      राज्य सरकार बांधकाम मजुरांना आर्थिक मदत देणार.

आणि

·      कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत मानवता विजयी होईल - पंतप्रधानांना विश्र्वास.

****

सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर एडल वाइज कंपनीतर्फे पन्नास लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनेक हातांनी केलेल्या मदतीमुळे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत २५१ कोटी रुपये जमा झाले आहेत. दाऊदी बोहरा समाजाच्यावतीनं देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत आठ लाख ३३ हजार २४३ लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचं ट्रस्टच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करताना सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोना विषाणुच्या संकटावर नक्कीच मात करू असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या मुरुम इथल्या विठ्ठलसाई साखर कारखानाच्या वतीनं अकरा लाख रुपये तसंच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज देण्यात आले. विठ्ठलसाई कारखान्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे हे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लागू टाळेबंदीच्या या काळामधे राज्यातील अर्थव्यवस्थेला टप्प्याटप्प्यामध्ये चालना देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईच्या नियमांचं पालन करत येत्या सोमवारपासून राज्यातील काही औद्योगिक तसंच व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली होती. त्या पार्श्र्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी आज ही माहिती दिली आहे. तीन मे पर्यंत असलेल्या या टाळेबंदी दरम्यान रेल्वे, लोकल सेवा बंद राहील तसंच सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक सण साजरे करू दिले जाणार नसल्याचं पवार यांनी या वेळी सांगितलं. टाळेबंदी कठोरपणे पाळली जाईल पण त्याच वेळी कोरोना विषाणू संबंधी नियमांचं पालन करत अत्यावश्यक सेवा विनाखंड सुरू रहाव्यात, कृषी संबंधी उपक्रम वेळेवर सुरू व्हावेत तसंच अर्थव्यवस्थेला गती मिळावी हे पाहिलं जाईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सरकार या काळात तुर दाळ, कापूस, हरभरा खरेदी करेल तसंच दुध, मत्स्योत्पादनं आणि मनरेगाची कामं सुरू करायलाही परवानगी देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी आणि संबंधित उपक्रमांवर कोणतेही निर्बंध टाकण्यात आले नसून योग्य खबरदारी घेण्याच्या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

टाळेबंदीच्या काळात राज्यातल्या बांधकाम कामगारांना काम मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संबंधीची घोषणा आज केली. ते म्हणाले -

या बांधकाम कामगारांना की जे मंडळाकडे नोंदीत आहेत आणि सक्रीय आहेत, अशा सर्व कामगारांना प्रत्येकी दोन हजार रूपये एवढे अर्थसहाय्य थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात डीबीटी पध्दतीने जमा करण्याच्या संदर्भाने निर्णय घेतला आहे. याचा फायदा जवळ जवळ १२ लाख नोंदीत आणि सक्रीय कामगारांना होईल. महाराष्ट्र इमारत बांधकाम आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला आदेश देण्यात आलेले आहेत.

****

पुण्यातील ससून रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. हे सरकारी रुग्णालय ‘कोवीड नाइन्टीन’ अती दक्षता केंद्र म्हणून कार्यरत असून इथं आतापर्यंत चाळीस रुग्ण कोरोना विषाणू संबंधित आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कार्यरत तीन परिचारिकांनाही विषाणूची लागण झालेली आहे. पुण्यातील एक पोलिस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीलाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या पाचशे पासष्ट झाली असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अठ्ठेचाळीस आहे.

****

जग कोरोना विषाणूशी एकत्रितपणे लढा देत असून कोरोना विषाणूच्या महामारीवर मानवता निश्चित मात करेल, असा विश्र्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. विविध मंत्रालयांकडून टाळेबंदीच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचीही पंतप्रधानांनी आज आपल्या संदेशात प्रशंसा केली आहे.   विविध केंद्रीय मंत्र्यांनी जारी केलेल्या संदेशांना उत्तर देताना पंतप्रधानांनी मंत्रालयांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व ९ संशयित रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. या रुग्णाच्या घरकाम करणाऱ्या बहिणीचा अहवाल ही नकारात्मक आला. त्यामुळे ही महिला घरकाम करत असलेल्या आणि विलगीकरण करण्यात आलेल्या ५ कुटुंबांमधल्या १८ जणांना दिलासा मिळाला आहे.

****

लातूरमध्ये महापालिकेतर्फे फार गरज नसताना घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या फिरण्यावर आळा घालण्यासाठी दोन दिवसांपासून मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. महापालिका कर्मचाऱ्यानी १४२ जणांविरुद्ध कारवाई करुन २८ हजार ४०० रुपये दंड कालपर्यंत वसूल केला आहे.

****

औरंगाबाद इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना बाधित गर्भवती महिलेची शर्थीचे प्रयत्न करत प्रसुती केली आहे. देशातील अशी ही दुसरी प्रसुती आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी या संबंधी अधिक माहिती दिली -

कोविड पॉझिटिव्ह डिक्लेअर झाल्यानंतर नऊ महिने पण पूर्ण होत आले होते तिचे गर्भावती अवस्थेचे आणि तिला आम्ही नॉमर्ल करण्याचा जो आमचा प्रयत्न होता तो अयशस्वी ठरला. म्हणून मग सिझर अँड सेक्शन करण्याचं डिसीजन घेतलं. आणि आज तिचं सिझर अँड सेक्शन करून मुलीला जन्म दिला. आणि ती जी मुलगी आहे तिचं साधारण तीन किलो १२० ग्रॅम वजन आहे. बाळ आणि बाळांतीण दोघही सुखरूप आहेत. त्यांना स्पाईनल अनेस्थेशिया मध्ये आम्ही सर्जरी केली. आणि सगळं व्यवस्थित आहे. बेबीचेपण सॅंपल कलेक्ट केले. जेणे करून आम्ही तपासणी करून घेणार की तिला कोरोनाची लागण आहे किंवा नाही.

ही महिला चार दिवसांपूर्वी मुंबईहून रुग्णवाहिकेतून प्रसुतीसाठी औरंगाबाद शहरातल्या बायजीपुरा भागात आली होती. काही दिवसांपूर्वीच तिला आणि तिच्या १७ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली होती.

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सीमा ओलांडून लोकांना नांदेड जिल्ह्यात येण्यापासून थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनानं जिल्ह्यात पंधरा ठिकाणी नाकेबंदी केली आहे. या भागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

****

आज चैत्र वद्य तृयोदशी, म्हणजे वैराग्य महामेरू संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतीथी. एकादशीपासून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथं गोरोबा काका समाधी उत्सव सुरू होतो. यंदा टाळेबंदीमुळे प्रथमच हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला असुन फडकरी, दिंडीकरी, वारकऱ्यांनी आहे तिथुनच सेवा करून वारी पूर्ण करावी असं आवाहन मुख्य पुजाऱ्यांनी केलं आहे.

****

एल्गार परिषद- माओवाद्यांशी संबंधांच्या संशयावरून अटकेत असलेले कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांची राष्ट्रीय तपास संस्थेची कोठडी पंचवीस एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयानं आज हे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तेलतुंबडे यांनी गेल्या चौदा तारखेला राष्ट्रीय तपास संस्था- ‘एनआयए’च्या कार्यालयात शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मधल्या श्री नागनाथ संस्थानच्या वतीनं या भागातल्या गरजवंत असणाऱ्या तीन हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील २१ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सकाळी घेण्यात आलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. सामाजिक अंतराचे नियम पाळून हे बैठक घेण्यात आली.

****

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जालना शहरातल्या नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नये यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतला आहे. शिवसेनेच्या वतीनं शहरातल्या प्रत्येक वार्डात गरजुंना मोफत भाजीपाला वाटप करण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment