▼

Saturday, 4 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      कोरानाविरुद्धची लढाई जिंकण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्र्वास.

·      शिस्त न पाळल्यास लॉकडाऊन वाढवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत.

·      पोलिसांचं न्यायालयीन काम न वाढवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश.

·      राज्य सरकारनं नियमित धान्य वितरणासह प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचं धान्य वितरित करण्याचं केंद्रीय मंत्री दानवे यांचं आवाहन.

आणि

·      गडचिरोली जिल्ह्यात सागवान तस्करीचा डाव उधळला.

****

कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्र्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज सामाजिक माध्यमाद्वारे जनतेला संदेश दिला. कोरोना आपली परीक्षा घेत असून दुहीचा विषाणू पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आणखी एक व्हायरस जो आपल्या समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतोय, समाजघातक हा व्हायरस आहे, नोटाला थुंकी लावून पसरवणं, वेगवेगळे काही इशारे देणं, असा जर का प्रयत्न केला तर कोविडपासून मी माझी जनता वाचवेन, पण तुम्हाला मी इशारा देतोय तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून या जर कोणी वृत्ती अगदी मस्तीत किंवा गमतीत जरी करत असेल तर त्या तात्काळ थांबल्या पाहिजेत.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याकरता लोक एकत्र येऊ नयेत म्हणून राज्यात कोणताही धार्मिक, क्रीडा उपक्रम पुढील सुचनेपर्यंत घेता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनासाठी राज्यभर स्वतंत्र रुग्णालयं सुरू करण्यात येत आहेत, चाचण्यांची केंद्र वाढवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपण चर्चा करत असल्याचं ते म्हणाले. सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन कोरोनाशी लढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत असल्याचं ते म्हणाले. सर्वधर्मीयांनी सण घरातच साजरे करावेत. लोकांनी सर्दी - खोकला असला तरच कोरोना रुग्णालयात जावं, घरात राहणं हाच कोरोनावर उपाय असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

****

राज्यातल्या लोकांनी शिस्त पाळली नाही आणि बाधितांची संख्या वाढली तर कोरोनामुळे देशामध्ये चौदा एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन कायम ठेवण्यात येईल, अशी शक्यता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यात केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. महानगरांमध्ये दाट लोकसंख्येच्या ठिकाणी राहणाऱ्यांनी प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक शिस्त पाळणं अत्यंत आवश्यक असल्याचं टोपे यांनी नमूद केलं. राज्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत आज सत्तेचाळीसनं वाढ झाली असून हा आकडा आता ५४५ झाली. राज्यात यामुळे आतापर्यंत २६ जण मृत्यूमुखी पडले आहेत.  

****

लातूर इथं काल घेण्यात आलेल्या २० पैकी आठ जणांच्या वैद्यकीय अहवालातून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं आज स्पष्ट झालं. हे नमुने पुणे इथल्या प्रयोगशाळेत काल रात्री पाठवण्यात आले होते. या सर्व रुग्णांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं असून त्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना बाधीत आठही जणांना निलंगा मधल्या जमबाग मशीदीतून काल ताब्यात घेण्यात आलं होतं.

****

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिस यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण आहे. न्यायालयीन कामं वाढवून त्यांचा ताण अधिक वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. कारागृहात असलेल्या आरोपींनी तातडीचे नसल्यास जामीनासाठी अर्ज दाखल करू नयेत, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. फसवणुकीच्या आरोपामध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीनं न्यायालयात जामीनासाठी केलेल्या अर्जाच्या पार्श्र्वभूमीवर न्यायालयानं हे आदेश दिले.

****

राज्य सरकारनं स्वस्त धान्य दुकानांतून नियमित धान्य वितरणासह प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यांचं मोफत धान्य वाटप करावं, असं केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. कोरानाच्या प्रादुर्भावर त्यांनी आज सामाजिक माध्यमाद्वारे संवाद साधला. ते म्हणाले...

दर महिन्याला नेहमीप्रमाणं, तीन लाख त्र्याऐंशी हजार टन धान्याव्यतिरिक्त तीन महिन्याचे फ्री राशन दिल्या जाणार आहे. हे अतिरिक्त धान्य जे फ्री मिळणार आहे, ते प्रत्येक व्यक्ति प्रति महिना पाच किलो इतकंय. २० लाख मेट्रीक टन कोठा, एफसीआय मार्फत आमच्याजवळ महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. आपण फ्री राशन आणि रेग्युलर राशन एकाच वेळेस उचलून ते जनतेपर्यंत पोहोचवावे, अन्न नागरी पुरवठा राज्य मंत्री म्हणून मी राज्य सरकारला विनंती करतो.

****

नागरिकांनी घरातच रहावं, रस्त्यावर येऊ नये यासाठी वारंवार आवाहन करण्यात येऊनही अनेकजण निष्काळजीपणा दाखवत रस्त्यावर येत असल्यामुळे परभणी जिल्हा प्रशासनानं कडक भूमिका घेतली आहे. परभणी शहरांतील रस्त्यांवर अडथळे लावून रस्ते बंद करण्यात आले असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. आज भाजी बाजार, किराणा दुकानदारांना सकाळी अकरा वाजता आस्थापनं बंद करण्यास भाग पाडण्यात आलं. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना वाहनांसह ताब्यात घेऊन कारवाई केली.

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य, स्वस्त धान्य वाटप तसंच विविध परिस्थितीचा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. गरजुंना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नसल्यामुळे पालकमंत्री गडाख यांनी यावेळी सामाजिक संस्थेच्यावतीनं प्रत्येकी एक किलो तांदूळ, साखर, अर्धा किलो दाळ असे एकूण ३० हजार पाकिटं देण्याचा निर्णय जाहीर केला.

****

जालना इथल्या राज्य राखीव बल -एसआरपीएफ गट क्रमांक तीनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. या जवानांनी आज रस्त्यालगत पाल ठोकून राहणाऱ्या गरजू कुटुंबांना जीवनाश्यक वस्तुंच्या तीनशे पाकिटांचं वाटप केलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली वन विभागांतर्गत पेडीगुडम वनपरिक्षेत्रातल्या जामगाव गावातून वनाधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची सागवान लाकडं जप्त केली आहेत. पेडीगुडम वनपरिक्षेत्र कार्यालयातल्या वनाधिकाऱ्यांनी दोन दिवस कारवाई करुन आठ हजार चारशे घनमीटर सागवान लाकडं जप्त केली. लॉकडाऊनचा गैरफायदा घेत सागवान तस्करांनी जंगलातून अवैधरित्या लाकडं तोडून ठेवली होती.

****

अहमदनगर इथं कोरोना बाधित रुग्णाच्या चाचण्या नकारात्मक आल्यानं त्याला आज घरी सोडण्यात आलं. उपचार घेऊन बरा झालेला अहमदनगर मधला हा दुसरा रुग्ण आहे. अहमदनगरमधील रुग्णालयात विलगीकरण कक्षात पंधरा कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यामधल्या कांडली गावात आज निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या सहा साखर कारखान्यांनी सॅनिटायजर निर्मिती सुरू केली आहे. सोलापुरात तयार होत असलेलं सॅनिटायजर आता परराज्यात पाठवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं हालचाली सुरू झाल्या आहेत.

****

सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेले एक्केचाळीस पुरुष, तेरा महिला अशा एकूण चोपन्न जणांचा अहवाल नकारात्मक आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी आज ही माहिती दिली आहे.

****

दिल्लीच्या मरकजमधून रत्नागिरीजवळच्या राजिवडा भागात गेल्या अठरा मार्चपासून वास्तव्याला असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचं काल निष्पन्न झालं. त्यामुळे राजिवडा परिसराचा तीन किलोमीटरचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. दिल्लीहून आलेल्या आणखी चार जणांना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राजीवडा भागातली आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी गेलेल्या आरोग्य पथकाला विरोध करणाऱ्या एका माजी नगरसेवकासह एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

No comments:

Post a Comment