Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत
आठ विविध क्षेत्रांसाठी योजना जाहीर;
** संरक्षण उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरुन ७४ टक्क्यांपर्यंत
वाढवण्याचा निर्णय
**
राज्यात आणखी एक हजार ६०६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण, ६७
रुग्णांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरात ५९ रूग्ण वाढले तर कोरोना विषाणू मुक्त
असलेल्या बीड जिल्ह्यातही दोन रूग्ण
** राज्यात सशस्त्र पोलिस दलाच्या
नऊ तुकड्या पाठवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी
** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, रेड झोनमध्ये टाळेबंदी कायम ठेवण्याचा राज्य सरकाचा विचार; औरंगाबाद शहरात २० मे पर्यंत टाळेबंदी कायम
** आणि
**
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात 'अटल इन्क्युबेशन सेंटर' स्थापन करण्यासाठी नीती आयोगाकडून दहा कोटी रुपये निधी मंजूर
****
स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आठ विविध क्षेत्रांसाठी योजना जाहीर केल्या. यामध्ये कोळसा, खनिज, संरक्षण उत्पादन, नागरी हवाई
वाहतूक, विद्युत कंपन्या, अंतराळ क्षेत्र
आणि अणु ऊर्जा क्षेत्राचा समावेश आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९
टक्क्यांवरुन ७४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी शस्त्रं आणि त्यांच्या भागांची आयात केली
जाणार नसून, याचं उत्पादन देशातच केलं जाणार असल्याचं सीतारामन
यांनी सांगितलं. सरकार यासारख्या आयातीला थांबवण्यासाठी वार्षिक
आधारावर एक योजना तयार करणार आहे. शस्त्रांच्या पुरवठ्यासंबंधी
निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आयुध उत्पादन मंडळाची स्थापना करण्याची
घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
कोळसा क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या सहभागाची घोषणा अर्थमंत्र्यांनी
यावेळी केली. यामुळे कोळसा क्षेत्रात पारदर्शकता येऊन स्पर्धा
वाढेल, तसंच कोळसा खाणींचा लिलाव आणि त्याला खुल्या बाजारात विक्रीचा
मार्ग मोकळा होईल, असं त्या म्हणाल्या.
नागरि हवाई वाहतूक क्षेत्रात सुधारणांची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी
भारतीय हवाई क्षेत्रात केवळ ६० टक्के जागा व्यावसायिक उड्डाणांसाठी उपलब्ध असून, अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी निर्बंधात सवलत दिली जाईल,
असं सांगितलं. या निर्णयामुळे व्यावसायिक उड्डाणांसाठी
इंधन आणि वेळेची बचत होईल, त्यामुळे या क्षेत्राला एक हजार कोटी
रुपयांचा लाभ होईल, असं त्या म्हणाल्या. देशातल्या आणखी सहा विमानतळांचा सार्वजनिक खासगी भागीदारी - पीपीपी अंतर्गत लिलाव केला जाईल, यामुळे एक हजार कोटी
रुपयांची गुंतवणूक होईल, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आणखी १२ विमानतळांमध्ये खासगी गुंतवणूकीला परवानगी देण्याची घोषणा
त्यांनी केली.
सरकार वीज वितरण कंपन्यांसाठी लवकरच एक दरपत्रक धोरण जाहीर करेल
ज्यामुळे ग्राहकांचा अधिकार, वीज उद्योगाला चालना देणं
आणि या उद्योगाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं जाईल.
रुग्णालयांसारख्या सामाजिक पायाभूत प्रकल्पांमध्ये खासगी क्षेत्राच्या
गुंतवणुकीला चालना देण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. यासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भारतीय अवकाश क्षेत्राची सुरुवात करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी
यावेळी केली. अवकाश संबंधित कामात खासगी सहभाग वाढवला जाईल,
असं त्या म्हणाल्या. खासगी क्षेत्राला भारतीय अवकाश
संशोधन संस्था - इस्रोच्या सुविधा आणि इतर मालमत्ता वापरण्याची
परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अंतराळाची भविष्यातली
योजना आणि बाह्य अंतराळ यात्रेतही खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यात येणार आहे.
अणु ऊर्जा क्षेत्रासाठी घोषणा करताना सीतारामन
यांनी, वैद्यकीय संबंधी उपकरणांच्या उत्पादनासाठी सार्वजनिक खासगी
भागीदारी तत्वावर अणुभट्ट्यांची स्थापना करणार असल्याचं सांगितलं. यामुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर परवडणारी उपचार पद्धती विकसित होईल,
असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्तवला आहे.
****
राज्यात काल आणखी एक हजार ६०६ कोरोना विषाणू नाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा ३० हजार ७०६ झाला आहे. काल या आजारानं राज्यात ६७ रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात
एकूण मृतांचा आकडा एक हजार १३५ झाला आहे. तर काल ५२४ रुग्ण यशस्वी
उपचारानंतर बरे झाले. राज्यात आतापर्यंत सात हजार ८८ रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नऊशे एक झाली आहे. काल दिवसभरात ५९ नवे रुग्ण आढळले असून यात ३३ पुरुष आणि २५ महिलांचा समावेश
आहे. यामधे बायजीपुरा इथले दहा, शंभूनगर
सात, सादात नगर आणि हुसेन कॉलनी प्रत्येकी चार, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय, राम नगर, तसंच संजय नगर मधली सहावी गल्ली इथले प्रत्येकी तीन, मकसूद कॉलनी आणि एन आठ सिडकोमधल्या अमर को- ऑपरेटिव्ह
सोसायटी इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. हनुमान चौक चिकलठाणा,
जालान नगर, एमआयडीसी, किराडपुरा,
बजाज नगर, जिन्सी, जुन्या
मोंढ्यातलं भवानी नगर, गल्ली क्रमांक पाच, जहागीरदार कॉलनी, आदर्श कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, चाऊस कॉलनी,
जाधववाडी, न्यू बायजीपुऱ्यातली तिसरी गल्ली,
सिडको एन- सहा मधील संभाजी कॉलनी, कटकट गेट, सिटी चौक, लेबर कॉलनी,
जटवाडा, राहुल नगर आणि जलाल कॉलनी इथं प्रत्येकी
एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबाद इथं कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत
२६ जणांना प्राण गमवावे लागले तर काल सायंकाळपर्यंत २७९ जण कोरोना विषाणू
मुक्त झाले असल्याची माहितीही प्रशासनानं दिली आहे.
****
जालना जिल्ह्यात आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाली
आहे. यामध्ये एका खासगी रुग्णालयातल्या प्रशासकीय
अधिकाऱ्यासह मंठा तालुक्यातल्या पेवा इथल्या एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. ही बाधित महिला चार दिवसांपूर्वी मुंबईहून परतल्यानंतर तिला मंठा इथल्या कोवीड
रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. जालना जिल्ह्यातल्या रुग्णांची
एकूण संख्या आता २५ झाली असून कोरोना विषाणू मुक्त झालेल्या सात जग्णांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल कोरोना विषाणूचे नवे अठरा रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमध्ये तेरा जण यात्रेकरू आहेत, तर चार रुग्ण नांदेड शहरातल्या करबला भागातले आणि एक रुग्ण कुंभार गल्लीतला
आहे. यामुळे आता जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या ८४ झाल्याची
माहिती उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत या विषाणू संसर्गामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत. सव्वीस रुग्ण उपचारांनंतर
बरे झाले आहेत. असं शेळके यांनी सांगितलं.
दरम्यान, नांदेड शहरातल्या कुंभार
गल्लीत कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर कुंभार गल्ली आणि लगतचा भाग प्रतिबंधीत
क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला असून, या भागाच्या सर्व सीमा
बंद करण्यात आल्या आहेत.
****
आतापर्यंत एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसलेल्या बीड जिल्ह्यात
काल दोन बाधित रुग्ण आढळून आले. यात एक रूग्ण हा गेवराई
तालुक्यातल्या इटकूरचा तर दुसरा माजलगाव तालुक्यातल्या हिवरा बुद्रुकचा आहे.
ईटकूर इथली व्यक्ती मुंबई इथून, तर हिवरा बुद्रुक
इथली व्यक्ती पुणे इथून आली होती. या दोघांच्याही संपर्कातल्या लोकांचा शोध सुरु आहे. याचबरोबर प्रशासनानं रूग्ण आढळलेली गावं तसंच आजुबाजूची
३० गावं बफर आणि प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात कोरोना विषाणुची लागण झालेले तीन रुग्ण आढळल्यानं बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातली
आठ गावं बंदिस्त करण्यात आली आहेत. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल
या संदर्भातील आदेश जारी केले. या आदेशानुसार सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा, भोपळा, हादगाव, सुर्डी
आणि बोरगांव ही सर्व गावं अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी
लागू करण्यात आली असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल उदगीरमध्ये आणखी दहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे
लातूर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ झाली आहे.
****
सोलापूरमध्ये काल कोरोना विषाणूचे १७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातल्या
रुग्णांची संख्या ३६० झाली आहे.
****
यवतमाळ इथं वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोना
विषाणूच्या ४५ रुग्णांपैकी ३८ जण १४ दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी ३ जणांना संस्थात्मक विलागिकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित
३५ जण त्यांच्या घरातच विलगीकरणात राहणार आहेत.
****
वाशिम जिल्ह्यातल्या एका कोरोना विषाणू बाधिताला काल रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. उत्तर प्रदेश मधील ट्रक चालक असलेल्या या रुग्णाचा
साथीदार गेल्या दोन मे रोजी कोरोना विषाणू संसर्गानं मरण पावला होता. वाशीम जिल्ह्यात सध्या मुंबईहून गावी परत आलेली एक महिला कोरोना विषाणू बाधित
असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली इथंही कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या ९१ रुग्णांपैकी ८१ जणांना उपचारानंतर
प्रकृती सुधारल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
यापैकी राज्य राखीव दलाचे तीन पोलिस औरंगाबाद इथं एका खासगी रुग्णालयात
दाखल होते, या रुग्णालयात हिंगोली इथले आणखी सहा पोलिस दाखल असल्याचं,
हिंगोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यात सशस्त्र पोलिस दलाच्या नऊ तुकड्या पाठवण्यास मंजुरी दिली आहे. राज्यानं
पोलिसांवरचा भार हलका करण्यासाठी तसंच टाळेबंदीच्या नियमांचं काटेकोरपणे
पालन करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारकडे सशस्त्र पोलिस दल पाठवण्याची
मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं नऊ तुकड्या
पाठवण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये शीघ्र कृती दल - आर ए एफच्या चार, केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफच्या दोन, आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
- सीआयएसएफच्या तीन कंपन्यांचा समावेश आहे. यात एकूण ९०० जवान
असणार आहेत.
****
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्याची मुदत आज संपते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याचं सुतोवाच केलं
आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, राज्यसरकारनेही रेड झोनमध्ये असलेल्या भागात टाळेबंदी कायम ठेवण्याचा विचार
असल्याचं सांगितलं आहे.
औरंगाबाद शहरात २० मे पर्यंत टाळेबंदी कायम राहणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल हे आदेश जारी केले. या टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासन,
महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. कंन्टेनमेट झोन - प्रतिबंधित क्षेत्रामधून नागरिकांचं
येणं जाणं बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले
आहेत. नागरिकांनीही सहकार्य करुन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यास
मदत करण्याचं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे.
दरम्यान, केंद्रेकर यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालय - घाटीला भेट दिली. कोरोना
विषाणू संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक रुग्णाचं अध्ययन करुन मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं
ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातल्या प्रतिबंधित
क्षेत्रामध्ये शासनाच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची
नियुक्ती केली आहे. नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या
क्षेत्राला दिवसातून चार वेळा भेट द्यायची असून, संबंधित यंत्रणेवर
देखरेख ठेवणं आवश्यक आहे.
****
परभणी जिल्ह्यात २५ मेपर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांनी घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सूट देण्यात
आलेली आस्थापने सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहणार असून बाकी सर्व आस्थापनं
बंद राहणार आहेत.
****
टाळेबंदीमुळे राज्यातल्या तीन हजार ८८४ निवारागृहात अडकलेल्या तीन लाख ७१ हजार
३१० परप्रांतीय मजूरांपैकी दोन लाख ४५ हजार परप्रांतीय कामगारांना आतापर्यंत १९१ रेल्वे
गाड्यांनी त्यांच्या राज्यात सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
दिली आहे. ते म्हणाले..
त्यामध्ये उत्तर प्रदेश राजस्थान कर्नाटका मध्यप्रदेश उडीसा
जम्मू-काश्मीर आणि झारखंड या सर्व राज्यांमध्ये
Train सोडण्यात येत आहेत West Bengal ची पहिली गाडी गेली त्याचबरोबर बिहारची सुद्धा
गाडी गेलेली आहे याच्यामध्ये पुढील काळामध्ये आपल्याला West Bengal मध्ये फार मोठ्या
प्रमाणात आणि बिहारमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात रोज जवळ – जवळ १० Train सोडण्याची
आवश्यकता आहे या सर्व परप्रांतीय मजुरांना
पाठवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून पंचावन्न कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री
साहेबांनी मान्य केलेले आहे आणि त्यामध्ये कोणत्याही कामगारकडून तिकीटचे पैसे घेण्यात
येत नाही
****
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर इथं टाळेबंदीमुळे अडकलेल्या मध्यप्रदेशातल्या ४७
आणि छत्तीसगडमधल्या २२ मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं त्या
त्या राज्यांच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात आलं आहे. वैजापूर
इथं या मजूरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांची
वैद्यकीय तपासणी करुन त्यांना काल रवाना करण्यात आल्याचं तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी
म्हटलं आहे. पैठणमधुनही आतापर्यंत ३५
बसमधून ९७८ मध्यप्रदेशातल्या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात
आलं आहे.
****
औरंगाबाद रेल्वे स्थानकाहून उत्तर प्रदशेच्या लखनौसाठी विशेष श्रमिक रेल्वे काल
रात्री आठ वाजता रवाना झाली. या रेल्वेमधून औरंगाबाद,
बीड आणि परभणी इथं टाळेबंदीत अडकलेले सुमारे एक हजार सहाशे मजूर प्रवास
करत असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात अडकून पडलेल्या केरळ राज्यातल्या नागरिकांना युवक काँग्रेसचे
नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी सर्व शासकीय कागदपत्रांची प्रक्रिया
पूर्ण करून, शुक्रवारी मध्यरात्री खाजगी बसने केरळकडे रवाना
केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता, संगमनेर आणि
कोपरगांव तालुक्यात अडकून पडलेले उत्तर प्रदेशातले एक हजार ५१९ कामगार काल साईनगर शिर्डी
रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेनं उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना झाले.
साईनगर शिर्डी इथून काल ही चौथी कामगारांची रेल्वे सोडण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येडशीच्या जनता विद्यालयातल्या माजी विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री सहायता
निधीला ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या रकमेचा धनादेश काल
जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला.
****
औरंगाबाद शहरातला कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधित भागात
असणारी स्वस्त धान्य दुकानं बंद करावीत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे
आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असलेल्या या दुकानांमुळे
अन्य भागांमधे लागण होण्याची शक्यता असल्यानं ही कारवाई करावी तसंच प्रतिबंधित भागांतील
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोहोच करावा असं त्यांनी सूचवलं आहे. या संदर्भातलं निवेदन चव्हाण यांनी
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रातल्या अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सेवेवर पाठवू नये, असंही चव्हाण यांनी या
निवेदनात म्हटलं आहे.
****
जालना शहरात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत परवाना धारकांना
घरपोच मद्यविक्री सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर फलक लावून त्यावर मागणी नोंदवण्यासाठीचे
दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातही मद्यविक्रीसाठी
परवानगी देण्यात आली आहे.
****
नांदेड शहरात प्रतिबंधित
क्षेत्रातील एका मद्यविक्री दुकानात काल मोठी गर्दी झाल्यानंतर हे दुकान बंद करण्यात
आलं. या दुकानावर ग्राहकांची गर्दी झाल्यानं, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याची दखल घेऊन, दुकान बंद करण्याचा
निर्णय घेतला.
****
बीड जिल्ह्यात
आतापर्यंत जवळपास पन्नास हजार ऊसतोड कामगार परत आले असून या सर्व कामगारांची आरोग्य
तपासणी करण्यात आली आहे. या कामगारांना सुरुवातीला संस्थात्मक आणि नंतर त्यांच्याच
घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या वतीनं या कामगारांच्या कुटुंबियांना दोन महिन्यांच्या किराणा सामानासह इतर आवश्यक
वस्तू पुरवण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या बिजेवाडी इथल्या वसंतराव नाईक शेतकरी गटाच्यावतीनं एकत्रित कृषि निविष्ठांची
खरेदी करून, शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर देण्याच्या योजनेचा
शुभारंभ काल आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते झाला. कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणीसाठी लागणारे बी
- बियाणे आणि रासायनिक खतं शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करून देण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे.
****
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येक गावात शेतकरी गटांना खत वाटप केलं
जात आहे. या योजनेला २८ शेतकरी गटांनी प्रतिसाद दिला आहे. या
गटांना ६५ मेट्रिक खतं तसंच १२८ क्विंटल बियाणं आतापर्यंत पुरवण्यात आलं आहे. या
योजनेबद्दल हिंगलाज वाडी इथल्या शेतकरी बचत गटाचे प्रमुख सुनील खुडे यांनी समाधान व्यक्त
केलं, ते म्हणाले....
सुनील खुडे हिंगलाज शेतकरी बचत गट १२८ पोते मागविलेत कोरोनाची
गर्दीची वाचविण्यासाठी शेतकरी बचत गटाच्या नावावर मागविले तर बियाणं हे परत मागविणार
आम्ही २०० बॅग मागविणार त्याच्यामुळे पैसा
वाचला आणि गर्दी कमी झाली दुकानदारांनी हमाली आणि वाहतूक भरली आम्हाला पोहच केले आणि
टाईम वाचला
****
ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल
सत्तार यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या विविध गावातल्या शेतकऱ्यांची
भेट घेतली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा बांधावर
देण्याचा निर्णय घेतला असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, कृषी केंद्र चालक चढ्या भावानं विक्री करत असल्यास त्यांची उपविभागीय अधिकारी
किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या तीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने
जिल्हा पुरवठा विभागानं निलंबित केले असून, नऊ दुकानांची अनामत
रक्कम जप्त करून त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य वितरणाची
तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले होते. या तपासणीत अंबड, घनसावंगी आणि मंठा इथल्या प्रत्येकी
एका दुकानात धान्य वितरणात अनियमितता आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या मंगरूळ इथं स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकानं अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी मुद्देमालासह रसायन जप्त करत सात जणांवर कारवाई केली.
****
पावसाळ्यात कोरोना विषाणू व्यतिरिक्त इतर संभाव्य रोगांना आळा घालण्यासाठी सज्ज
व्हावं अशी सूचना राज्य शासनाच्या या संदर्भातील एका विशेष कार्यदलानं केली आहे. डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांमुळे तसंच कावीळ,
अतिसारामुळे कोरोना विषाणूच्या काळात निर्माण झालेली स्थिती आणखी खालावण्याची
शक्यता या कार्यदलानं व्यक्त केली आहे.
****
मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी,
नांदेड, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण
आणि परिसरात काल अवकाळी पाऊस झाला. पैठण तालुक्यातल्या
विहामांडवा इथं जोरदार पाऊस झाला तर पाचोड, वाहेगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
परभणी जिल्ह्यात पूर्णा शहर आणि परिसरात काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह
जोरदार पाऊस झाला. सुमारे वीस मिनीट झालेल्या या पावसाने तापमान कमी होऊन, वातावरण आल्हाददायक झालं.
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, बिलोली,
कंधार आणि नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. लातूर शहर आणि निलंगा तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे शहरातल्या काही ठिकाणी विजेचे खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा खंडित झाला.
हिंगोली जिल्ह्यात तसंच उस्मानाबाद शहर तसंच तुळजापूर इथं काल अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जवळपास
अर्धा तास पाऊस पडला.
***
केंद्र सरकारच्या नीती आयोगानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठातील जमनालाल बजाज इनक्युबेशन सेंटरची 'अटल
इन्क्युबेशन सेंटर'साठी निवड केली असून या करता दहा कोटी रुपये
निधी मंजूर केला आहे. मराठवाड्यातल्या तरुणांमधे मोठी क्षमता
आणि गुणवत्ता असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य गरजेचं असल्यानं या केंद्राच्या
माध्यमातून त्यांच्यातील नवोन्मेषश आणि उद्योग कौशल्य विकसित करणं शक्य होईल,
अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी
दिली आहे. कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक
प्रश्न निर्माण होणार असले तरी अशा प्रकारच्या 'स्टार्टअप'
उद्योगांतून तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं कुलगुरु
डॉ. येवले यांनी नमूद केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
वाढू नये आणि नागरिकांमधले गैरसमज दूर व्हावे यासाठी परभणी जिल्ह्यात चित्ररथाद्वारे
जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीनं हा उपक्रम
राबवण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या पूर्णा इथं
काल पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आलं. यात १३२ जणांची तपासणी करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातल्या सर्व बँका आज रविवार सुटीच्या दिवशी सुरु
राहणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे
आदेश जारी केले. विषम दिनांकास बँक बंद राहील्या तर नागरिकांना
आर्थिक व्यवहार करण्यात अडचण येईल, त्यामुळे हा आदेश जारी करण्यात
आला.
****
कोरोना विषाणूच्या भीतीने मुंबईहून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या
काका- पुतण्याचा पुणे जिल्ह्यात इंदापूर जवळ अपघाती
मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातल्या मुक्रामाबाद इथले हे रहीवाशी
होते. कारचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला.
****
औरंगाबाद शहरात शहाबाजार चौकातल्या काली मशिदीजवळ फळ विक्रेत्यावर
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काल दगडफेक झाली. टाळेबंदीचं उल्लंघन करत शहाबाजार भागात फळ विक्रेते तसंच नागरिकांनी काल मोठी
गर्दी केली होती. त्यामुळे सिटी चौक पोलिस ठाण्यातले पोलिस कारवाई
करण्यासाठी गेले होते. या दगडफेकीत पोलिस वाहनाच्या काचा फुटल्या.
यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
****
No comments:
Post a Comment