Sunday, 17 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 17 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
स्वावलंबी भारतासाठी सार्वजनिक क्षेत्रासाठी उद्योग धोरण आणली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. तसंच, राज्यांचं सकल घरगुती उत्पादन ३ टक्क्यांवरून वाढवत ५ टक्के केल्याचं आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर दिवाळखोरीद्वारे कारवाई होऊ नये, यासाठी सीमा एक लाखांहून एक कोटीपर्यंत वाढवल्याचंही त्यांनी घोषित केलं.
स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पाचवी आणि शेवटची पत्रकार परिषद घेतली. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे देखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही वक्तव्यांच्या उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी आपल्या घोषणांना सुरुवात केली. सरकार गरिबांना लवकरात लवकर आर्थिक मदत आणि खाद्यपदार्थ पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. २० कोटी जन-धन खात्यांत थेट १० हजार २२५ कोटी रुपयांचा लाभ पोहचवण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. तर ८ कोटी १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. २५ कोटी लोकांना मोफत गहू, तांदूळ पुरवण्यात आले. यासाठी एफसीआय, नाफेड आणि राज्यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं, असंही ते म्हणाले.
कंपनी कायद्यामध्ये सरकारनं काही बदल केले आहेत. त्यानुसार सीएसआर, बोर्डाच्या अहवालात कमतरता, दस्तावेजीकरण यासंदर्भातल्या छोट्या चुका, गुन्ह्याच्या यादीतून बाहेर करण्यात आल्या आहेत.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
रेडिओ, कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून शिक्षणासाठी मदत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष साहित्य, १०० सर्वोत्तम विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची परवानगी, अशा अनेक महत्वाच्या बाबी त्यांनी जाहीर केल्या. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'वन नेशन वन डिजिटल चॅनेल' सुरु केलं जाणार असून, ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही ते स्वयं-प्रभा डीटीएच सेवेद्वारे शिक्षण घेऊ शकतील. यासाठी तीन चॅनल आहेत, यात आणखी १२ नवीन चॅनल जोडले जातील, असंही त्यांनी जाहीर केलं. जिल्हा स्तरावर रुग्णालयांत संक्रमणातून होणाऱ्या आजारांशी लढण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जाईल, ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा उभारली जाईल, असंही त्या म्हणाल्या.
***
नांदेड जिल्ह्यात आज तेरा जणांचा वैद्यकीय अहवाल कोरोनाविषाणू बाधित असा आला आहे. हे सर्व रूग्ण कोविड केयर सेंटरमध्ये विगीकरण कक्षातले असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितलं. यात ९ रूग्ण प्रवासी यात्रेकरू आहेत, तर नांदेड शहरातल्या अबचलनगर इथले दोन, करबला इथला एक आणि मुदखेड तालुक्यातल्या बारड कोविड केअर सेंटर मधला एक रूग्ण आहे. हा रूग्ण मुंबई इथून आलेला आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची एकुण संख्या आता सत्त्याण्णव इतकी झाली आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रूग्ण लाळेचा नमुना दिल्यानंतर उपचार न घेताच फरार झाले आहेत. २६ रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन, घरी सात दिवस विलगीकरणात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
***
परभणी शहरात मिलिंद नगर भागात एक कोरोना बाधित महिला रुग्ण आढळली आहे. मुंबई इथून आपल्या नातेवाईकासह काही दिवसांपूर्वी ही महिला टेम्पोनं प्रवास करुन परभणीत आली. या महिलेच्या संपर्कातल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वतीनं मिलिंदनगर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून, सुपरमार्केट पारिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. परभणीतली कोरोनाबाधितांची संख़्या आता ४ झाली आहे.
***
हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं मुंबईतून आलेल्या सतरा जणाना शासकिय विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. या पैकी ८ जणांच्या वैद्यकीय अहवालावरुन त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं आज स्पष्ट झालं.  हिंगोली जिल्ह्यातल्या ९१ कोरोना बाधितांपैकी ८४ जण  कोरोनामुक्त झाले होते. बाधितांपैकी केवळ ७ जणांवर उपचार सुरु होते. मात्र आजच्या ८ नवीन रुग्णांमुळे १५ कोरोनाबाधित हिंगोलीत आहेत.
***
सांगली जिल्ह्यात आणखी चार जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं काल प्राप्त झालेल्या अहवालांवरुन स्पष्ट झालं आहे. सांगलीत आतापर्यंत ५० कोरोनाबाधित आढळले असून एकाचा कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे.
***
पुण्याहून भंडारा इथं आलेल्या दोन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याबरोबरच या दोघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.
***


No comments:

Post a Comment