Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 May
2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात
काल कोरोना विषाणू बाधित आढळलेल्या सात रुग्णांपैकी एका ६५ वर्षीय महिलेचा आज पहाटे
उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
अन्य सहा रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालयातल्या कोवीड-19 कक्षात उपचार सुरू आहेत. या
सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ थोरात यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं एका ६५ वर्षीय
कोरोना विषाणूग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मदनी चौक परिसरात राहणाऱ्या या पुरुषाला १६
मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता अशी माहिती घाटी रुग्णालयातले डॉक्टर अरविंद
गायकवाड यांनी दिली. यामुळे औरंगाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्या
रुग्णांची संख्या ३२ झाली आहे.
****
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू
बाधा झालेले तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये धुळे शहरात देवपूर परिसरातल्या एका
३५ वर्षीय व्यक्तीचा समावेश असून, शिरपूर तालुक्यात अर्थे इथल्या राज्य राखीव पोलिस
दलातल्या एका पोलिसच्या आई आणि वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. धुळे जिल्हयात
कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६९ झाली आहे.
****
अलिबाग तालुक्यातल्या चौल
ग्रामपंचायतीनं बाहेर गावांहून येणाऱ्यांसाठी गृह विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. या
विलगीकरण कक्षात चाकरमान्यांच्या राहण्याची, स्वच्छतेची, आरोग्याची काळजी घेतली जात
आहे. या व्यवस्थेमुळे गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद
तालुक्यातील तेलंगणा सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार यांच्यावतीने सॅनिटायझर देण्यात आलं. वीज
महावितरण कंपनीचे हे कर्मचारी बिदराळी आणि बेल्लूर इथं कार्यरत आहेत.
****
अमरावती जिल्ह्यातल्या युवकांनी
कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात हंगामी व्यवसाय करण्यास
पसंती दर्शवली आहे. फळविक्री तसंच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास या युवकांनी
सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मेळघाट इथं तयार होणाऱ्या खव्याला बाजारात मोठी मागणी
असते. मात्र, संचारबंदीच्या काळात आवश्यक साधनं उपलब्ध नसल्यानं, खवा व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं असून, या वर्गाला मदत करावी अशी
मागणी केली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशभरातल्या कामगारांच्या
समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने उद्या देशव्यापी निदर्शनं करण्यात येणार आहेत.
पक्षाचे राज्य सचिव राम बाहेती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. स्थलांतरित
कामगारांसाठी अधिकाधिक रेल्वे आणि बससेवा पुरवली जावी, प्रवासादरम्यान भोजनाची सोय
असावी, सर्व मजूरांना प्रत्येकी १० हजार रुपये प्रवास भत्ता द्यावात, महात्मा गांधी
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे दिवस वाढवले जावेत, कोणत्याही अटी शर्ती
विना राशन द्यावे, कामगार कायद्यांत कोणतीही छेडछाड करू नये, अल्प उत्पन्न गटाला टाळेबंदीच्या
काळात दरमहा साडे ७ हजार रुपये मदत द्यावी,
आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.
****
आधारभूत किंमतीनुसार कापूस
खरेदीत होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ शेतकरी
संघटनेने येत्या शुक्रवारी २२ मे रोजी मूठभर कापूस दहन आंदोलन पुकारलं आहे. शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली आहे. या आंदोलनात राज्याच्या कापूस
उत्पादक जिल्ह्यातले कापूस उत्पादक शेतकरी आपल्या घरासमोर मूठभर कापूस जाळून शासनाचा
निषेध करतील. विदर्भ तसंच मराठवाड्यात शेतकऱ्यांनी लाखो क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजार
समितीत नोंदणी केली आहे. मात्र भारतीय कापूस परिषद - सीसीआय तसंच पणन महासंघाच्या वतीनं
सुरू असलेली संथ खरेदी प्रक्रिया पाहता, मोठ्याप्रमाणावर कापूस शिल्लक राहण्याची भीती
व्यक्त केली जात आहे.
एफएक्यू दर्जाचा असूनही नाकारल्या
गेलेल्या कापसाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे
करण्यात येणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या
महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रम मालिकेत देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६५ वा भाग असेल. नागरिकांनी येत्या २५ मे पर्यंत या
कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार १८०० ११ ७८०० या मोफत दूरध्वनी क्रमांकावर नोंदवावेत.
माय गव्ह ॲपवर किंवा नमो ॲपवरही नागरिकांना आपले विचार मांडता येतील. १९२२ या क्रमांकावर
मिस कॉल देऊन आलेल्या लिंकवरही नागरिकांना संदेश पाठवता येणार आहे.
****
No comments:
Post a Comment