Wednesday, 20 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० मे २०२० दुपारी १.०० वा.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळी आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ४१ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जालना शहरातल्या एका खासगी रूग्णालयातल्या एक डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं, त्यांच्या संपर्कात अनेक कर्मचारी आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. याआधी दोन कर्मचारी बाधित झाल्याचं आढळून आल्यानंतर पुन्हा चार जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले. मुंबईहून अंबड तालुक्यात शिरनेर इथ परतलेली एक व्यक्तीही बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. आतापर्यंत सात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, सध्या रुग्णालयात ३४ रुग्णांवर उपचार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात तेवीस वर्षीय युवक कोरोना विषाणू बाधित आढळून आला आहे, त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या एकशे पंधरा झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण शंभर रूग्ण आढळले असून त्यापैकी ८५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सापडलेला रुग्ण हा वसमत इथं मुंबईहून परतलेल्या रुग्णांसोबत कामाला होता. तो हिंगोलीतील भिरडा या गावचा रहिवासी असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत ४१ ने वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या एक हजार ११७ झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं  कळवलं आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये साताऱ्यातल्या खंडोबा मंदिर परिसरातलं गणेश नगर, पुंडलिक नगर मधली सातवी गल्ली, मित्र नगर मधली लिमयेवाडी, शरीफ कॉलनी, न्याय नगरमधली पहिली गल्ली, इंदिरा नगर, खडकेश्वर, माणिक नगर, जिल्हा सामान्य रुग्णालय, संजय नगर, सिटी चौक, बालाजी नगर, आणि आझम कॉलनी या भागात प्रत्येकी एक रुग्ण, न्याय नगरमधली सातवी गल्ली, पोलिस कॉलनी, उस्मानपुऱ्यातली मराठा गल्ली, जुना मोंढ्यातल्या भवानी नगरातली पाचवी गल्ली, शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, तसंच बालाजी नगर परिसरात प्रत्येक दोन कोरोना विषाणूग्रस्त आढळले आहेत.
मुकुंदवाडीतलं रोहिदास नगर तसंच कैलास नगरातल्या दुसऱ्या गल्लीत प्रत्येकी तीन, जयभीम नगरात ४ तर पुंडलिक नगर परिसरात ५ रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात बाबरा इथल्या भिवसने वस्तीत दोन रुग्ण तर कन्नड तालुक्यात औराळा इथल्या धनगरवाडीत एक रुग्ण आढळला आहे. 
****
देशात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण साडे ३९ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तीन हजार १२४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले. आतापर्यंत देशभरात ४२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना विषाणू बाधा झालेले पाच हजार ६११ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे आता देशभरातल्या रुग्णांची संख्या एक लाख सहा हजार ७५० झाली आहे. गेल्या चोवीस तासांत यापैकी १४० रुग्णांचा मृत्यू     झाला असून, एकूण मृतांची संख्या तीन हजार ३०३ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता असलेल्या एक लाख आठ हजार १२१ नमुन्यांची चाचणी करण्यात आल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था - आयसीएमआरने सांगितलं आहे. आतापर्यंत २५ लाख १२ हजार ३८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणी प्रयोगशाळांची संख्या वाढवली जात असून, सध्या देशात ३९१ सरकारी तर १६४ खासगी प्रयोगशाळांना कोविड चाचणीची मान्यता देण्यात आली आहे
****
राज्यात गेल्या २४ तासात एक हजार दोनशेहून अधिक जणांना विविध रूग्णालयात कोरोनावर उपचार घेतल्यानंतर सुटी देण्यात आली.एका दिवसात बरे होणाऱ्या रूग्णांची ही सर्वात जास्त संख्या आहे
****
आयुष्मान भारत योजनेशी निगडित सर्व डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. दोन वर्षांपेक्षाही कमी काळात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपेक्षा अधिक झाली आहे. या योजेनेने समाजाच्या गरीब वर्गाचा विश्वास संपादित केला असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात टाळेबंदीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामं सुरु असून त्यावर लाख ९२ हजार ५२५ मजूर काम करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन ही कामं केली जात आहेत. दरम्यान, मागेल त्याला काम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत
****
परभणीचे महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नगर विकास संचालनालयातील उपसंचालक देविदास पवार यांची परभणी महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली असून पवार यांना परभणी इथून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान रमेश पवार हे दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या बदलीच्या नव्या ठिकाणाबाबत मात्र माहिती कळाली नाही, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****


No comments:

Post a Comment