Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
२० लाख कोटी रूपयांच्या स्वावलंबी भारत अभियानातल्या योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची
मंजुरी
**
दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी
**
देशांतर्गत विमानसेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार; रेल्वेच्या आरक्षणास आजपासून
प्रारंभ
**
राज्यात काल आणखी दोन हजार २५० कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले; ६५ जणांचा मृत्यू
**
औरंगाबाद शहरात तीन रूग्णांचा मृत्यू तर ४३ नवे रूग्ण
**
जालना, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोलीतही रूग्ण वाढले
आणि
**
औरंगाबाद शहरात आजपासून जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीला परवानगी; नांदेड शहरातलीही काही
दुकानं सुरू, तर उस्मानाबाद जिल्ह्यात उद्यापासून राज्य परीवहन महामंडळाची बससेवा सुरू
होणार
**
****
कोविड
१९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच टाळेबंदीनंतरच्या परिणामांमधून देशाची अर्थव्यवस्था
सावरण्यासाठी सुरु केलेल्या २० लाख कोटी रूपयांच्या स्वावलंबी अभियानात सरकारनं जाहीर
केलेल्या योजनांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
यामध्ये
स्थलांतरित कामगारांना धान्य वाटपाच्या योजनेचा समावेश आहे. या सर्व कामगारांना मे
आणि जून महिन्यासाठी प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत दिलं जाणार आहे. या धान्याची वाहतूक,
साठवण तसंच वितरकाचा खर्चही केंद्र सरकारकडून वहन केला जाणार आहे. देशभरातल्या आठ कोटी
मजुरांना या योजनेचा लाभ होणार आहे.
ज्येष्ठ
नागरिकांना उतार वयात नियमित मासिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या तसंच सामाजिक सुरक्षा देणाऱ्या
प्रधानमंत्री वय वंदना योजनेलाही तीन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला
आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्यान्वित असेल. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ
नागरिकांना जमा रकमेवर चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक चाळीस शतांश टक्के व्याज मिळेल,
व्याजाचा दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी निर्धारित करण्याचे अधिकार अर्थमंत्र्यांना
देण्यात आले आहेत.
बँकेतर
वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना अधिक तरलता देण्यासाठी अर्थमंत्रालयानं
मांडलेला विशेष तरलता योजनेचा प्रस्तावही मंत्रिमंडळानं काल मंजूर केला. याअंतर्गत
आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपन्यांना सरकार अतिरिक्त हमी देणार आहे.
सूक्ष्म,
लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जीवनदान ठरणारी तसंच संकट काळात तातडीनं वित्तपुरवठा करु
शकणारी विनातारण कर्ज योजना सुरु करण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याला
मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुद्रा योजनेच्या लाभधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
ही कर्ज देणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय पत हमी कंपनीमार्फत शंभर टक्के हमी कवच मिळणार
आहे. सरकारी बँकांकडून इतर वित्तपुरवठा संस्थांना दिलेल्या कर्जावर २० टक्के जादा अंशतः
हमी देणारा प्रस्तावही मंत्रिमंडळानं मंजूर केला.
देशभरातल्या
अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहभागातून
वित्त पुरवठा करण्याच्या योजनेलाही मान्यता देण्यात आली. अन्न प्रक्रिया उद्योगांना
उत्पादनाचा दर्जा वाढवायला मदत करणं, साठवण आणि वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध
करुन देणं, विशेषतः अभिनव उपक्रमांना आणि महिला उद्योजकांना आधार देणं ही या योजनेची
उद्दिष्टं आहेत.
प्रधानमंत्री
मत्स्य संपदा योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मत्स्योद्योग क्षेत्रात जबाबदार
आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून नील क्रांती
आणणं हा या योजनेचा उद्देश आहे. येत्या पाच वर्षांत ही योजना कार्यान्वित होणार आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई, भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र - आयसीएसई आणि
इतर राज्य शिक्षण मंडळाना टाळेबंदीदरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय
गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य
सचिवांना पाठवलेल्या पत्रात, देशव्यापी टाळेबंदी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष
बसची सोय करायला सांगितलं आहे. पण प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही परीक्षा केंद्राला
परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. परीक्षा केंद्रात शिक्षक, विद्यार्थी
आणि कर्मचाऱ्यांनी मास्क घालावा आणि सुरक्षित अंतराच्या निकषांचं काटेकोर पालन करावं,
थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जंतुकीकरणाच्या सोयीही परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असतील.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर परीक्षेचं वेळापत्रक
जाहीर करावं, असं गृह सचिवांनी सर्व शिक्षण मंडळांना सांगितलं आहे.
****
केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम येत्या पाच जूनला जाहीर होणार आहे.
प्रवेश परीक्षेची तारीखही तेव्हाच ठरवली जाईल, असं आयोगानं सांगितलं आहे. यंदा ७९६
पदांसाठी ही परीक्षा होणार आहे.
****
देशांतर्गत
विमानसेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह
पुरी यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. सर्व विमानतळं तसंच हवाई वाहतूक कंपन्यांनी
यासाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रवासी वाहतुकीसंदर्भातली कार्यप्रणाली
लवकरच जारी करणार असल्यासं पुरी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
****
एक
जूनपासून सुरु होणाऱ्या २०० रेल्वे गाड्यांच्या तिकीटांची नोंदणी आज सकाळी १० वाजेपासून
सुरु होणार आहे. सामान्य -जनरल डब्यासाठीदेखील आरक्षण करावं लागणार आहे. केवळ आरक्षण
धारक प्रवाशांनाच या रेल्वेमधून प्रवास करता
येईल, आरक्षण नसलेल्या किंवा प्रतिक्षा यादीतल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार
नाही.
मेल,
जलद प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे सेवा बंदच राहणार आहेत.
****
राज्यात
काल आणखी दोन हजार २५० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात
एकूण रुग्णांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे. मुंबईत काल एक हजार ९७२ नव्या रुग्णांची
भर पडली, त्यामुळे मुंबईत एकूण रुग्णसंख्या २३ हजार ९३५ झाली आहे. तर पुण्यात काल आणखी
१७४ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यात एकूण रुग्णांचा आकडा तीन हजार ९३२ इतका झाला
आहे. राज्यात काल या आजारानं ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत ४१, तर पुण्यात १४ मृत्यूची
नोंद झाली. राज्याभरात आतापर्यंत एक हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ६७९ रुग्णांना
उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद
शहरात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रहेमानिया कॉलनीतली ५० वर्षीय
महिला, इंदिरा नगरमधल्या ८० वर्षीय पुरुष, तर जयभीम नगरमधल्या ५५ वर्षीय पुरुषाचा काल
शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ बाधितांचा मृत्यू
झाला आहे.
दरम्यान,
औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी ४३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडल्यानं एकूण रुग्णांची
संख्या एक हजार ११९ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये पुंडलिक नगर पाच, जयभीम नगर
चार, मुकुंदवाडीतलं रोहीदास नगर, कैलास नगरमधल्या गल्ली क्रमांक दोन मध्ये प्रत्येकी
तीन रुग्ण आहेत. न्याय नगर गल्ली क्रमांक सात, पोलिस कॉलनी, उस्मानपुऱ्यातली मराठा
गल्ली, जुन्या मोंढ्यातलं भवानी नगर, शिवशंकर कॉलनी तानाजी चौक, तर फुलंब्री तालुक्यातल्या
बाबरा इथल्या भिमसने वस्तीत प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. सातारा परिसरातल्या गणेश नगरमध्ये,
मित्र नगर, शरीफ कॉलनी, न्याय नगर, इंदिरा नगर, खडकेश्वर, माणिक नगर, जिल्हा सामान्य
रुग्णालय, संजय नगर, सिटी चौक, बालाजी नगर, आझम कॉलनी, आसेफिया कॉलनी,
रहेमानिया कॉलनी, टॉऊन हॉल आणि कन्नड तालुक्यातल्या धनगरवाडी इथं प्रत्येकी एक रुग्ण
सापडला आहे.
****
जालना
जिल्ह्यात काल सकाळी आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यात
बाधितांची एकूण संख्या ४१ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जालना शहरातल्या एका खासगी रूग्णालयातल्या
एक डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं होतं, त्यांच्या
संपर्कात अनेक कर्मचारी आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. याआधी दोन कर्मचारी बाधित झाल्याचं
आढळून आल्यानंतर पुन्हा चार जणांचे अहवाल बाधित असल्याचे आले आहे. मुंबईहून अंबड तालुक्यात
शिरनेर इथं परतलेली एक व्यक्तीही बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. आतापर्यंत सात रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या
रुग्णालयात ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात काल आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. यामध्ये
सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव इथले सहा जण, गंगाखेड तालुक्यातल्या नागठाणा, पुर्णा तालुक्यातल्या
माटेगाव आणि परभणी तालुक्यातल्या पिंपळगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला. परभणी जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या १६ झाली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात आणखी चार बाधित रूग्ण आढळले आहेत. मुखेड, भोकर, श्रीनगर आणि सांगवीमधले हे
रूग्ण आहेत. आता नांदेड जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ११०झाली आहे. काल सहा
रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत जिल्ह्यात पाच रूग्ण मृत्यू पावले
आहेत. तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत.
****
बीड
जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. पाटोदा तालुक्यातल्या वाहली
या गावात दोन, पाटोदा आणि वडवणीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला. त्यामुळे जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या २३ झाली आहे.
जिल्हा
प्रशासनानं पाटोदा आणि वडवणी परिसरातली गावं तात्काळ बंद केले असून, अनिश्चित कालावधीसाठी
संचारबंदी लागू केली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात एक तेवीस वर्षीय युवक कोरोना विषाणू बाधित आढळून आला आहे, त्यामुळे जिल्ह्यात
रुग्णांची संख्या एकशे पंधरा झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण शंभर रूग्ण आढळले असून
त्यापैकी ८५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल सापडलेला रुग्ण हा वसमत इथं मुंबईहून
परतलेल्या रुग्णांसोबत कामाला होता. तो हिंगोलीतल्या भिरडा या गावचा रहिवासी आहे.
****
कोरोना
विषाणू संकटाचा सामना करताना बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता
घेण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. राज्यपालांनी काल करोना
विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगानं राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा
काल एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या जून आणि जूलै
महिन्यात कोरोना विषाणू बाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य
यंत्रणा सक्षम करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
नियमांचं
काटेकोर पालन करुन मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु
करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास विचार करता येईल असं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते,
कलाकारांशी काल मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला,
त्यावेळी ते बोलत होते. चित्रपटनगरीत सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत,
लोककला, तमाशा कलावंत यांना जगवणं यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल, असं आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
****
औरंगाबाद
शहरात आजपासून ते ३१ मे पर्यंत सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अन्नधान्य, किराणा,
भाजीपाला आणि दूध खरेदी- विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नियुक्त
करण्यात आलेल्या नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक काल पार पडली, त्यावेळी ही माहिती देण्यात
आली. ठोक भाजी विक्रीचा बाजार असलेल्या जाधववाडीत फक्त ठोक खरेदीदारांनाच प्रवेश मिळणार
आहे. या परिसरात पोलिस आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. शहरात भाजी
खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावं, तसंच मास्कचा वापर करावा, गर्दी
होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड
शहरातही आजपासून काही दुकानं आणि व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर
यांनी परवानगी दिली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत वकीलांची
कार्यालयं, कर सल्लागारांची कार्यालयं, बेकरी, जीवनावश्यक वस्तुंची दुकानं, मिठाईची
दुकानं, फर्निचर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरियलच्या सर्व साहित्यांची दुकानं सुरु
होणार आहेत. शनिवार आणि रविवारी ही दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
उस्मानाबाद
आणि तुळजापूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचे
आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत.
दरम्यान,
उस्मानाबाद, कळंब आणि तुळजापूर ही नगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात उद्या शुक्रवारपासून
राज्य परीवहन महामंडळाची बस वाहतूक सेवा सुरू करण्यास तसंच मद्य विक्रीची दुकानं सुरु
करण्यास जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे यांनी परवानगी दिली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी
आठ ते दुपारी दोन या वेळेत मद्य विक्री सुरु राहणार आहे. राज्य परीवहन महामंडळानं भूम,
परंडा आगारातून ५० टक्के आसन क्षमतेवर सतरा गाड्यांच्या ब्याण्णव फेऱ्या सोडण्यास मान्यता
दिल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात आमदार प्रशांत बंब यांच्या सहकार्यातून गरजू
कुंटुंबासाठी पंचवीस हजार किराणा सामानाच्या किटचं वाटप करण्याचं काम काल सुरू झालं.
गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातली सर्व लहान गावं, वाड्या आणि वस्त्यांमधल्या गरजू
लोकांना या किराणा किटचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबईहून औरंगाबादच्या दिशेनं पायी
येणाऱ्या कामगार कुटुंबांसाठीही आमदार बंब यांनी लासूर स्टेशन, नागपूर - मुंबई महामार्गावरील
ए एस क्लब चौफुली तसंच औरंगाबाद इथल्या महावीर चौक परिसरात गेल्या एक महिन्यापासून
भोजनाची सोय केली आहे.
****
परभणी
जिल्ह्यात मानवत इथल्या गजानन महाराज मंदीर संस्थानच्या वतीनं कामगारांना दोन वेळ जेवणाचे
डबे घरपोच देण्याचं कार्य सुरु आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….
लॉकडाउन सुरु झाल्यामुळे
मानवत शहरातील मजुरांचा रोजगार बंद झाला त्यामुळे त्यांच्या जेवनाचा प्रश्न गंभीर
बनला मानवतच्या गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने दर गुरुवारी देण्यात येणारे अन्नदान
बंद केले आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती किराणा असोसिएशन यांच्या मदतीने मंदिर
परिसरात अन्न शिजवून बाराशे जेवनाचे डब्बे १५ एप्रिलपासून सकाळ आणि संध्याकाळी सेवाकरामार्फत
मजुरांना पोचविली जातात गजानन महाराज मंदिर संस्थानचा उपक्रम अन्य संस्थानासाठी दिशादर्शक
होय आकाशवाणी बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
लातूरच्या
शिवछत्रपती शिक्षण संस्थेनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १५ लाख रुपयांचा धनादेश काल
जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे सुपुर्द केला.
परभणीत
श्री होमिओपॅथिक क्लिनिकच्या वतीनं पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती
वाढवणारं अर्सेनिक अल्बम ३० हे औषध मोफत वाटप करण्यात आलं. नांदेड शहर भारतीय जनता
पक्षाच्या वतीनं काल नांदेड इथं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात ५८ जणांनी रक्तदान
केलं.
****
उस्मानाबादचे
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या
सूचना केल्या. प्रतिबंधित क्षेत्रातून जाणाऱ्या तसंच येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार
करण्यात यावी, प्रशासनाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, नागरिकांनी सूचनांचे
पालन करावं, असं आवाहन खासदारांनी केलं. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व १३ रुग्णांची
प्रकृती स्थिर असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
****
नांदेड
शहरातल्या १३ व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियम आणि अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याकडून
प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने
यांनी सांगितलं. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि निश्चित केलेल्या नियम,
अटी न पाळणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त विलास भोसीकर आणि सुधीर इंगोले
यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
टाळेबंदीमुळे
पुण्याहून परभणी जिल्ह्यातल्या गावाकडे पायी निघालेल्या एका ४० वर्षाच्या व्यक्तीचा
बीड जिल्ह्यातल्या धानोरा या गावी मृत्यू झाला. पिंटू पवार असं या व्यक्तीचं नाव आहे.
गेल्या आठ तारखेला पुण्यातून निघालेल्या या व्यक्तीचा अतिश्रम आणि शरिरातली पाण्याची
पातळी घटल्यानं मृत्यू झाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात चप्पल, बूट विक्री दुरुस्तीची दुकानं उघडण्याची परवानगी देण्याची मागणी राष्ट्रीय
चर्मकार महासंघाच्या मानवत शाखेनं केली आहे. दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्यानं
चर्मकारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं महासंघानं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं
आहे.
****
लातूर
जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या व्यक्तींकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य
आणि वैद्यकीय शिक्षण यंत्रणेकडून आरोग्य तपासणीची विशेष मोहिम हाती घेण्यात यावी, असे
निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. टाळेबंदीच्या तिसऱ्या आणि चौथ्या
टप्प्यात मोठ्या प्रमाणावर लोक लातूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
****
परभणी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या आवाहनाला प्रतिसाद
देत स्वच्छ भारत अभियान विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाचं
वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं आहे. १७ हजार ३८८ रुपयांचा धनादेश स्वच्छ भारत
मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम व्ही करडखेलकर यांनी पृथ्वीराज बी पी यांच्याकडे
काल सुपूर्द केला.
****
बीड
जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या पारगाव घुमरा इथं विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, गरीब,
गरजू अशा वंचित महिलांना बचत गटातील महिलांनी धान्य जमा करून तसचं इतर अत्यावश्यक किराणा
सामान बचतीतून उपलब्ध करून दिलं आहे. टाळेबंदीच्या काळात माणुसकीचं हे उत्तम उदाहरण
पारगाव घुमरा या गावाचं घालून दिलं आहे. याविषयी बचतगट सदस्या प्रतिभा देशमुख आणि ध्रुवतारा
सानप या लाभार्थी महिलेनं सांगितलं…..
माझं नाव
प्रतिभा देशमुख राहणार तालुका पाटोदा जिल्हा बीड माझ्या समूहाचे नाव अनुसया महिला स्वयंसहाय्यता
समुह त्यामध्ये मी सदस्य आहे आमच्या गावांमध्ये
४० गट आहेत आणि गटाच्या ४०० महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन विचार
केला आणि गरजू महिला गावातल्या विधवा असतील अपंग असतील त्यांच्यासाठी मी आपल्याला काय
मदत करता येईल विचार करून धान्य – राशन जमा करून यांना देण्यात आले
माझं नाव
ध्रुवतारा सुख सानप पारगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड परिस्थिती फार बिकट आहे शेतीत
काम नाही हाताला लेकराला कसं जगावं ह्याची पंचाईत आहे म्हणून ग्राम संघामार्फत आम्हाला
अन्नधान्य वाटप केले किराणा पण वाटत केलाय त्यामुळे मी त्यांचे आभार मानते
****
जालना
औद्योगिक वसाहतीमधल्या एका गोदामावर काल दुपारी छापा टाकून पोलिसांनी सुमारे ५० लाख
रुपये किंमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त केला. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी
पथकासह केलेल्या या कारवाईत तीन वाहनंही जप्त करण्यात आली असून, दोन संशयितांविरुद्ध
चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,
अंबड पोलिसांनी काल पहाटे केलेल्या अन्य एका कारवाईत अंबड रोडवरील एका आश्रमातल्या
खोल्यांमधून तसंच जामखेड इथल्या एका व्यक्तीच्या घरातून १२ लाख रुपये किमतीचा गुटखा
जप्त केला. या प्रकरणी संशयित व्यक्तीविरूद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात
आला आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात सात हजार ४४ कामगारांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत
काम मिळालं असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली आहे. एप्रिल
महिन्यापासून या कामगारांच्या मजुरीत ३२ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. याविषयी अधिक
माहिती देतांना त्या म्हणाल्या,
एकूण अकराशे
७३ काम सुरू आहे सर्वांत जास्त मुजर वैजापूर मध्ये एकूण तेराशे मजूर उपस्थिती आहे सिल्लोड,
पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित कोणत्याही प्रकारे मजुरांना कामाची आवश्यकता मजुरांनी
आप – आपल्या ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत किंवा जवळ पंचायत समिती कार्यालय तहसील
कार्यालय यापैकी कुठेही मागणी नोंदवली तर काम उपलब्ध होऊ शकतं जिल्हा प्रशासनाच्या
वतीनं आव्हान आहे कुणालाही कामाची आवश्यकता असेल तर मग्रारोहयो अंतर्गतच्या कामाचा
लाभ घ्यावा
****
परभणीचे
महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नगर विकास
संचालनालयातले उपसंचालक देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. आहे. प्रशासकीय कारणास्तव
ही बदली करण्यात आली असून पवार यांना परभणीतून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. पवार हे
दोन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या बदलीच्या नव्या ठिकाणाबाबत मात्र
माहिती कळली नाही.
****
दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा दलाच्या विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या
जवानांना विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन विनू देव यांनी सात नवीन बुलेट मोटार सायकल उपलब्ध
करून दिल्या आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, उपिंदरसिंग यांच्याहस्ते या मोटार सायकल
काल जवानांना सुपुर्द करण्यात आल्या.
****
No comments:
Post a Comment