Friday, 22 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22 MAY 2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२२ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसाठी तिकीट दर निश्चित; मार्गदर्शक सूचनाही जारी
** टप्प्याटप्प्यानं आणि स्थानिक आवश्यकतेनुसार रेल्वे तिकिट आरक्षण कार्यालय सुरू करण्याचे भारतीय रेल्वेचे क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश
** राज्यात काल आणखी दोन हजार ३४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद; ६४ जणांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरात तीन तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू, औरंगाबादमध्ये ६७ नवे रूग्ण
** बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी आणि जालना जिल्ह्यातही रूग्णांच्या संख्येत वाढ
** औरंगाबाद शहरात रमजान ईद घरामध्येच राहून साजरी करण्याचा निर्णय
** भारतीय जनता पक्षाचं आज 'माझे अंगण, माझे रणांगण' आंदोलन; महाविकास आघाडीची आंदोलनावर टीका
आणि
** रेड झोन वगळता राज्यात जिल्हातर्गंत परीवहन महामंडळाच्या बससेवेला आजपासून प्रारंभ
**
****
येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं तिकीट दर निश्चित केले आहेत. हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुढच्या तीन महिन्यांसाठी विमान प्रवासाचा दर कमीत कमी साडे तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतका असेल. विमान प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेच्या आधारावर हे दर ठरवण्यात आले आहेत. २४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे दर लागू असतील असं पुरी यांनी सांगितलं.
दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं विमान वाहतूक कंपन्या, विमानतळं तसंच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणं, विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल सिक्रिंग - तापमान तपासणी कक्षातून चालत येणं तसंच विमान सुटण्याच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक असून, विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांचं सामान निर्जंतुक करून घेणं आवश्यक आहे. विमानतळावर सगळीकडे एकमेकांमधलं अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करणं आवश्यक असणार आहे.
****
भारतीय रेल्वेनं टप्प्याटप्प्यानं आणि स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन तिकिट आरक्षण कार्यालय सुरू करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. यासोबतच टाळेबंदीशी संबधित सर्व नियमाचं आणि स्वच्छतेचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे. येत्या एक जूनपासून धावणाऱ्या शंभर रेल्वेगाड्यांसाठी तिकीट आरक्षण कालपासून सुरू झालं, पहिल्या दोन तासातच दोन लाख नव्वद हजार पाचशे दहा प्रवाशांनी तिकीटांचं आरक्षण केलं.
दरम्यान, राज्यात जिल्हा बंदीचे आदेश लागू असल्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रेल्वे तिकीटाचे आरक्षण करता येणार नाही. त्यामुळे राज्यात केवळ दुसऱ्या राज्यात जाण्यासाठीचं आरक्षण करता येणार असल्याचं रेल्वेच्या सूत्रानं सांगितलं. 
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी सात वाजता देशातल्या कम्युनिटी रेडिओंशी संवाद साधणार आहेत. या संवादादरम्यान ते कम्युनिटी रेडिओ केंद्रांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही देणार आहेत.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ३४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या ४१ हजार ६४२ इतकी झाली आहे. मुंबईत काल एक हजार ३८२ रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांचा आकडा २५ हजार ३१७ इतका झाला, तर पुण्यात काल २६५ नवे रुग्ण सापडल्यानं एकूण आकडा चार हजार ८०९ झाला आहे. राज्यात काल या आजारानं ६४ रुग्णांचा मृत्यू झाला, यात मुंबईत ४१, तर पुण्यात सात मृत्यूंची नोंद झाली. राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत एक हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर काल एक हजार ४०८ रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले. राज्यात आतापर्यंत ११ हजार ७२६ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
****
औरंगाबाद शहरात काल तीन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये आसेफिया कॉलनीतल्या ४८ वर्षीय, रहेमानिया कॉलनीतल्या ६५ वर्षीय आणि खडकेश्वर परिसरातल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, काल औंरगाबाद जिल्ह्यात आणखी ६७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या एक हजार १८६ इतकी झाली आहे. जयभीम नगर परिसरात १८, सिटी चौक परिसरात सहा, मुकुंदवाडी पाच, हुसेन कॉलनी चौथी गल्ली आणि पडेगाव इथल्या मीरा नगरात प्रत्येकी चार, उस्मानपुरा आणि कटक गेट इथं प्रत्येकी तीन, रहेमानिया कॉलनी, आझम कॉलनी, रोशन गेट, न्याय नगरमधली १८ वी गल्ली, खिवंसरा पार्क, उल्कानगरी, टाइम्स कॉलनी इथं प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. गरम पाणी, शिवराज कॉलनी, कैलास नगर, सौदा कॉलनी, हडको एन-१२, हुसेन कॉलनी गल्ली क्रमांक नऊ, खडकेश्वर, हर्सुल कारागृह, आदर्श कॉलनी, काबरा नगर, मकसूद कॉलनी, सिडको एन फाईव्ह, एन सेव्हन, कांचनवाडी, गारखेडा, भडकल गेट, यादव नगर, पिसादेवी, राम नगर, कन्नड तालुक्यातल्या धनगरवाडी आणि सिल्लोड इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यात काल आणखीन १३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं  स्पष्ट झालं आहे. या तेरा जणांपैकी माजलगाव तालुक्यातल्या नित्रुड इथं ११, सुर्डी इथला एक तर धारूर तालुक्यातल्या कुंडी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.  बीड जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या आता ३० झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यात उमरगा इथली एक महिला, वाशी आणि परंडा तालुक्यातला प्रत्येकी एक आणि लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथल्या चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १८ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल सहा कोरोनाविषाणू बाधित रूग्ण आढळून आले. शहरातल्या गाडीपुरा भागात दोन रुग्ण, तर मुखेड तालुक्यातल्या रावनकुळा इथं दोन आणि बिलोली तालुक्यातल्या केरूल इथला एक रूग्ण आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ११६ झाली आहे.
दरम्यान, गाडीपुरा भागात काल सापडलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात काल पाच कोरोनाविषाणू बाधित रूग्ण बरे झाले असून, त्यांना पुढचे सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. निलंगा आणि लातूर शहरात प्रत्येकी दोन, तर पानगाव आणि उदगीर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे.
****
परभणी जिल्ह्यात आणखी चार जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मिलींदनगर आणि मातोश्री नगरमध्ये प्रत्येकी एक, परभणी तालुक्यातल्या असोला आणि सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला. त्यामुळे परभणी जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २० झाली आहे.
****
जालना शहरात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत काल तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४४ झाली आहे. कोरोना विषाणूच्या नवीन बाधितांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे तिघं मुंबईहून घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगाव इथं आलेले आहेत. राज्य राखीव दलाच्या ११५ पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य ४३ जणांचे कोरोना विषाणू तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत.
दरम्यान, कोवीड रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरसह एक परिचारिका आणि रंगनाथनगर इथली महिला उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झाली आहे. या तिघींनाही काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी डॉक्टर आणि परिचारिकांनी त्यांना टाळ्या वाजून निरोप दिला.
****
हिंगोली इथले राज्य राखीव दलातले औरंगाबाद इथं उपचार घेत असलेले कोरोना विषाणू बाधीत पाच जवान काल उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात दहा बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात काल मालेगावमध्ये ११, तर नाशिक शहरात १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांचा आकडा ८९० वर पोहोचला आहे.
****
यावर्षी रमजान ईदचा सण घरामध्येच राहूनच साजरा करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. यासंदर्भात काल औरंगाबाद शहरात उलेमा, मौलाना, प्रतिष्ठित नागरिक यांची पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सहायक पोलिस उपायुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितलं. ते म्हणाले..
 
सर्वानुमते अस ठरवण्यात आलं की या वर्षीची रमजान ही २५ तारखेला होणार आहे ती घरी साजरी करायची घरीच आणि इबादत करायची शक्यतो बाहेर निघायचं नाही अशा पद्धतीच बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आणि त्यासाठी लागणारा तो बंदोबस्त आहे तो पोलीस आयुक्त साहेबांनी पुरवण्याचे आश्वासन दिलेलं आहे
****
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून, सरकारला जागं करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आज 'माझे अंगण, माझे रणांगण' आंदोलन करणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. आज राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या घराबाहेर काळे फलक आणि काळे कपडे परिधान करून निदर्शनं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटाच्या काळात भारतीय जनता पक्ष राजकारण करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या आजच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल भाजपने हे आंदोलन पुकारलं आहे. भाजपच्या प्रदेश शाखेचा हा बालिशपणा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील अशाप्रकारच्या आंदोलनाला मान्यता नसेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधल्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी, केंद्र सरकारवर मुंबई आणि महाराष्ट्राशी सापत्नभावानं वागत असल्याचा आरोप केला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत पुरवण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्येही महाराष्ट्राला डावलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळवण्याचा केंद्राचा कुटील डाव असून तो आम्ही हाणून पाडू, असा निर्धारही ठाकूर यांनी व्यक्त केला. 
****
कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार असून, त्याप्रमाणे पिकं घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत ते काल बोलत होते. मंत्रिमंडळातले सर्व मंत्री, सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीत उपस्थित होते. पिक कर्जाबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामासाठी पालकमंत्र्यांकडून आलेल्या सूचनांची दखल घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कृषी आणि सहकार विभागाला दिले आहेत. राज्यात तातडीने कापूस, ज्वारी, मका, धान खरेदीसाठी गती द्यावी, तसंच आवश्यक तेथे खरेदी केंद्र वाढवावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे प्रवासासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत. हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून बिहार इथल्या अरारिया आणि मुझफ्फरपूर साठी आज आणि उद्या विशेष श्रमिक रेल्वे रवाना होणार आहेत. आज अररियासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातले तर उद्या मुझफ्फरपूरला जाणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातले जवळपास तीन हजार दोनशे मजूर प्रवास करणार असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं. या दोन्ही विशेष श्रमिक रेल्वे सकाळी अकरा वाजता औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून रवाना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मजूरांचा प्रवास खर्च जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
जालना इथून आज बिहारमधल्या छपरा इथं विशेष श्रमिक रेल्वे आज रवाना होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ही रेल्वे सुटणार असून, सर्व मजुरांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात दुपारी एकवाजेपर्यंत प्रशासनाकडून तिकीटाचे वाटप केले जाणार आहे.
****
राज्यात आजपासून रेड झोन वगळता अन्य भागात राज्य परीवहन महामंडळाची आंतर जिल्हा बस सेवा सुरू होत आहे. प्रतिबंधित भागातही ही बससेवा असणार नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापूर्वी २२ मार्चपासून बससेवा बंद करण्यात आली होती. लातूर विभागात सकाळी सात ते रात्री सातपर्यंत जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होत असल्याची माहिती एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली. ते म्हणाले…

लातूर विभागातील पाच बसस्थानकावरून बसेस धावणार आहे सद्यस्थितीमध्ये ४० बसेस चालवत आहोत आणि बसेस मध्यवर्ती महामंडळ त्याठिकाणी न चालवता  बस स्थानक क्रमांक २ याठिकाणावरून  चालवत आहोत तरी सर्व प्रवाशांनी आवश्यक ती काळजी घेऊन आपण स्वतः प्रवास करावा लागणार आहे  आपलं नेहमीचं जे भाडे आहे तेच  राहणार आहे त्यामध्ये कसल्या प्रकारची  वाढ नाही परंतु सुरक्षित अंतर ठेऊनच आपण प्रवास करणार आहोत  आणि २२ प्रवासी बसमध्ये घेणार आहोत आणि त्यांना आपण  निश्चित स्थळी सोडणार आहोत
****
औरंगाबाद जिल्ह्यात रेड झोन असलेल्या औरंगाबाद महानगरपालिका हद्द वगळता तालुक्याच्या ठिकाणी आजपासून बस सेवा सुरू होत आहे. जिल्ह्यातल्या पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, आणि सोयगाव या तालुक्यांअतर्गत एसटीच्या एकूण १७८ फेऱ्या नियोजित असल्याचं महामंडळानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या बसमध्ये एकमेकांमधलं अंतर राखण्याच्या नियमाचं पालन बंधनकारक असून, एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातही बीडहून अकरा तालुक्यात दर एक तासास एक बस या प्रमाणे बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं विभागीय नियंत्रकांनी कळवलं आहे. जालना आणि हिंगोली जिल्ह्यांतही आज बससेवेला सुरूवात होत आहे. हिंगोली जिल्ह्यात १२६ तर नांदेड जिल्ह्यात ८० बस फेऱ्या आजपासून सुरू होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात काही भागातले रस्ते अन्य जिल्ह्यातून जात असल्यामुळे या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार नसल्याचं महामंडळाच्या सूत्रानं सांगितलं.
****
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला हाफकिन महामंडळानं सामाजिक दायित्व निधीतून सात नवीन व्हेंटिलेटर्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत. सध्या या रुग्णालयात १३ व्हेंटिलेटर्स असून यापैकी तीन व्हेंटिलेटर हे खास कोरोना विषाणू ग्रस्त  कक्षासाठी राखीव आहेत.
****
जालना जिल्ह्यात टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातले सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळात जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.
****
केंद्र सरकारनं भारतीय डाक घराच्या गाव पातळीपर्यंत असलेल्या डाक सेवेच्या कार्यालयातून सरकारी योजनेचे पैसे काढण्याची व्यवस्था निर्माण केल्यामुळे बॅंकामधली गर्दी आणि रांगा कमी झाल्या आहेत. याशिवाय बँकांपर्यंत न जाता नजिकच्या टपाल कार्यालयात पैसे मिळाल्यामुळे लाभार्थीही आनंद व्यक्त करत आहेत. लातूर जिल्ह्याच्या रहिवाशी रुपाबाई शिंदे आणि अलका ऐतबोणे यांनीही रांगेत उभे न राहता गावातच पैसे मिळाल्याच समाधान व्यक्त केलं.

सूर्यवंशी प्रदिप माधवराव पोस्टमास्टर गंगापूर ग्राहकांना फायदा असा आहे की कोरोना मध्ये सोशल डिस्टन्स वापरणे आणि शहरी भागात जाऊन बँकेत गर्दी न करणे आतापर्यंत जवळपास आठशे ते हजार खातेदाराला वाट केले
नाव रुपाबाई शिंदे राहणार गंगापूर इथली रहवाशी आहे इथ मला दोन वेळा पैसे उचलण्याची संधी मिळाली आणि जाण्या – येण्याचं तिकीट पण वाचलं  आणि गर्दी न जाण्याचं टाळलं
मी लातूरला एक जाऊन पैसे उचलणार होतो ते आता इथे गंगापूरला पोस्टमध्ये भेटत आहेत त्याच्यापासून आमचा खूप फायदा झालेला आहे येण्याजाण्याचे पैसे वाचलेले आहे
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या माळीवाडा इथल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नागरी महिला पतसंस्थेच्यावतीनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० हजार रुपयांची मदत दिली आहे.
पूर्णा इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध जयंती उत्सव मंडळाच्यावतीनं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गोळा केलेल्या निधीतून शहरातल्या ५०० गरीब कुटुंबांना धान्याचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर शहरात नगराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर यंत्र बसवण्यात आलं आहे. शहरातल्या सुभेदार रामजी नगर प्रभागाच्या नगरसेविका कांचन अजनीकर यांच्या पुढाकारातून आणि प्रभागातल्या युवकांच्या सहकार्यानं हे यंत्र बसवण्यात आलं आहे.
****
नांदेड शहरात विना परवानगी कपड्याचं दुकान उघडून शासनाच्या नियम अटींचा भंग केल्याप्रकरणी नऊ व्यापाऱ्यांना महानगर पालिकेच्या पथकानं प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारला. शहरातले अन्य आठ व्यापारी विना मास्क वापरता आढूळन आल्यानं त्यांना प्रत्त्येकी १५० रूपये दंड आकारण्यात आला.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना काल त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट संदेशाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक सूचना देणारा फलक दर्शनी भागात लाऊन जनजागृती केली आहे. याविषयी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी माहिती दिली. ते म्हणाले…

जिल्ह्यात जवळपास दोन ते तीन हजार दुकानांमध्ये  बोर्ड  लावण्यात आलेला आहे बोर्डच्या माध्यमातून लोकांनी दुकानांमध्ये येताना काय काळजी घ्यावी दुकानदारांनी काय काळजी घ्यावी याचं सविस्तर वर्णन करण्यात आलेला आहे या माध्यमातून जिल्हा व्यापारी महासंघ  एकच आवाहन करतात ते दुकानावर येणाऱ्या ग्राहकाने पण काळजी घ्यावी त्यांनी दुकानदाराला पण सहकार्य करावे त्यामुळे आपण सगळे सुरक्षित राहू उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये कायम ठेवण्यात यशस्वी होतो
****
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये नियमित करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवणार असल्याचं, परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी म्हटलं आहे. याबाबतची शिफारस शासनाकडे लवकरच करण्यात येणार असल्याचं आश्वासन केंद्रे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं प्रमाण वाढत असतानाही, वस्तू खरेदीसाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. यावेळी नागरिकांकडून एकमेकांमधलं अंतर राखण्याचा नियम पाळला जात नसल्याचं निदर्शनास येत आहे.
****
टाळेबंदीमध्ये नांदेड शहरात विठोबा नैसर्गिक भाजीपाला विक्री केंद्रामार्फत शेतकरी ते थेट ग्राहक असा भाजीपाला पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेला शहरातल्या ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या गटाच्या प्रमुख सविता पावडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या…..

समुहामध्ये मालेगाव, चिखली, डेरला, पावडेवडी अशा गावातील शेतकरी व महिला शेतकरी आहोत आम्ही सर्वजण आपल्या शेतात रासायनिक खते व केमिकल विरहित भाजीपाला शेतमालाचे उत्पादन घेतो कोरोना परिस्थितीत अटी व नियम पाळून ग्राहकांना सेवा देण्यात येत आहे तसेच घरपोच भाजीपाला पुरविण्यात येत आहे यात ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत शेतकरी ते ग्राहक या विक्री व्यवस्थेतून शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळत असून ग्राहकांना नैसर्गिक भाजीपाला सुरक्षितपणे मिळत आहे
****
प्रसिद्ध लोकगीत गायक छगन चौगुले यांचं काल मुंबईत निधन झालं. मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विविध लोकगीतं गायलेले चौगुलं यांचं ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ हे गाणं विशेष लोकप्रिय झालं होतं.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या खरबडा शिवारात अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकानं काल पकडले. ट्रॅक्टर चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस दहा कोटी ७४ लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ सुनिल कदम यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या तरतुदी आणि कर रक्कमा वजा जाऊन बँकेस सहा कोटी ९० लक्ष रुपये निव्वळ नफा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १५ लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
****
जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी नगराध्यक्षपदासाठी दिल्या जाणाऱ्या मानधनातून मिळालेले एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत.
****

No comments:

Post a Comment