Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –28 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२८
मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातली सत्ताधारी महाविकास
आघाडी आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षातला राजकीय संघर्ष सुरूच; दोघांचेही एकमेकांवर
आरोप - प्रत्यारोप
** राज्यात काल सर्वाधिक
१०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू; दोन हजार १९० नवे रूग्ण
** औरंगाबाद शहरातही सहा
जणांचा मृत्यू तर ३२ नवे रूग्ण
** जालना आणि उस्मानाबादमध्येही
रूग्णांच्या संख्येत वाढ
** शाळा -महाविद्यालयं सुरू
करण्यासाठी परवानगी दिली नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
** दहावीच्या भूगोल विषयात
विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा परीक्षा मंडळाचा निर्णय
आणि
** विदर्भात अमरावती आणि
भंडारा जिल्ह्यात टोळधाडीमुळे पिकांचं नुकसान
****
राज्यात सत्ताधारी महाविकास
आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातला राजकीय संघर्ष कालही सुरूच राहिला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरूद्ध केलेल्या आरोपांना महाविकास
आघाडीनं काल उत्तर दिलं. त्यानंतर लगेचचं पुन्हा फडणवीस यांनीही फेसबुक लाईव्हवरून
आघाडीनं केलेले आरोप फेटाळून लावले.
महाविकास आघाडीचे नेते राज्य
सरकारमधले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परीवहन मंत्री अनिल परब आणि जलसंपदा मंत्री
जयंत पाटील यांनी काल पत्रकार परीषद घेऊन फडवणीस यांनी केंद्र सरकारनं राज्य सरकारला
केलेल्या मदतीची आकडेवारी चुकीची असल्याचं सांगत राज्याला केंद्राकडून पुरेशी मदत मिळाली
नसल्याचं सांगितलं. विरोधकांकडून सहकार्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत
असल्याची टीका महसूलमंत्री थोरात यांनी केली. परब यांनी सर्व आकडेवारी खोडून काढत केंद्र
सरकारकडून राज्याला २८ हजार कोटी रूपये नव्हे तर सहा हजार ६५९ कोटी रूपयेचं मिळाल्याचं
सांगितलं. या उलट राज्याचे ४२ हजार कोटी रूपये केंद्राकडे थकित असल्याचं त्यांनी सांगितलं.
रेल्वे मंत्रालयाकडूनही रेल्वे सोडण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करून राज्य सरकारची
प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परब यांनी केला.
जयंत पाटील यांनी यावेळी
बोलताना, कोविड उपचार आणि प्रतिबंधासंदर्भात देशात सर्वोत्तम काम महाराष्ट्रात झाल्याचं
सांगितलं. शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातली स्थिती नियंत्रणात असून, रोग
प्रसार तसंच मृत्यू दरावर यंत्रणेनं मोठं नियंत्रण मिळवलं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
राज्यातल्या युवकांच्या कौशल्याबद्दल फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असल्याचं
पाटील यांनी नमूद केलं. पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपनं राज्यातल्या मुख्यमंत्री
सहायता निधीत एक रूपयाही जमा केला नाही, त्यांनी आपली मदत पीएम केअर्स निधीत दिल्याचं
सांगत भाजप हा राज्याचा शत्रू आहे का मित्र असा प्रश्न उपस्थितीत केला. केंद्र सरकारनं
राज्यांना बिनव्याजी किंवा अत्यल्प व्याजदरानं पैसे उपलब्ध करून देण्याची मागणीही पाटील
यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या या पत्रकार
परिषदेनंतर काही वेळातच फडणवीस यांनीही सामाजिक माध्यमावर पत्रकार परीषद घेऊन तीन मंत्र्यांनी
एकत्र येऊन विसंगत माहिती दिल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व
आरोप फेटाळून लावले. अन्न सुरक्षा योजना, कापूस खरेदीसाठी लागणारा पैसा केंद्र सरकार
देत आहे. राज्य सरकार दरवेळेस केंद्र सरकारकडून येणारा आभासी आकडा सांगत असल्याचा आरोप
त्यांनी केला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव संकटाच्या काळात राज्य सरकारमधले मंत्री काम
करायचं सोडून स्वत:चीच पाठ थोपटून घेत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. राज्यातल्या
जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे माहित असल्याचं सांगत फडणवीस यांनी सरकारला मदत
करण्याचीच विरोधी पक्षाची भूमिका आहे, मात्र सरकार खोटी आकडेवारी सांगत असेल, तर ते
जनतेसमोर आणावंच लागेल, असं सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र विकास आघाडीची बैठक झाली. भारतीय जनता पक्षाकडून
सुरु असलेल्या राजकारणाला यापुढे आक्रमकपणे उत्तर द्यावं, तसंच सरकारकडून केल्या जाणाऱ्या
कामांची दररोज माहिती दिली जावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसंच आघाडीतला
समन्वय वाढवण्याचा आणि एकसंघपणे काम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगण्यात
आलं.
****
कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांवर
मोफत किंवा माफक दरात उपचार करता येतील, अशी खासगी रुग्णालयं अंकित करावीत, असं सर्वोच्च
न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोरोना विषाणूग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर
नियंत्रण आणण्यासंदर्भात एका याचिकेवर काल सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या
पीठासमोर, दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत सुनावणी झाली. देशात अनेक खासगी तसंच धर्मदाय
रुग्णालयांना सरकारनं मोफत किंवा नाममात्र दरानं भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या
रुग्णालयांनी कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असं न्यायालयानं म्हटलं
आहे. आपत्तीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची उपचार दरासंदर्भात लूट केली
जात असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे. शासकीय आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा नसलेल्या
कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांचा खासगी रुग्णालयातला उपचार खर्च सरकारनं वहन करावा, अशी
मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
****
टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं
शिथिल करताना नागरिकांना काय सुरू केले जात आहे, याची स्पष्ट कल्पना देण्याच्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातली
रुग्ण संख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत. स्थलांतरीत आणि प्रवास
करणाऱ्या लोकांमुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढत असून, या भागातही खाटांची मागणी वाढत
असल्याचं ते म्हणाले. सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य
या योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश
टोपे यावेळी म्हणाले.
****
राज्यात काल एका दिवसात सर्वाधिक
१०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईतल्या ३२ रुग्णांचा समावेश
आहे. राज्यात आतापर्यंत या आजारानं एक हजार ८९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात काल आणखी
दोन हजार १९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ५६ हजार
९४८ इतकी झाली आहे. काल ९६४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात
आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद इथं काल सहा कोरोना
विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इंदिरा नगरमधला ५६ वर्षीय पुरूष, हुसेन
कॉलनीतला ३८ वर्षीय पुरूष, रहीम नगर इथला ५५ वर्षीय पुरूष, मकसूद कॉलनीतल्या ६५ वर्षीय
पुरूष, गारखेडा परिसर विजय नगर इथली ७६ वर्षीय महिला आणि रोशन गेट इथल्या ६४ वर्षीय
पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल
नवीन ३२ रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १ हजार ३६० झाली आहे.
काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सुभाषचंद्र बोस नगर परिसरात चार, जय भवानी नगर तीन, शिवशंकर
कॉलनी, जहागीरदार कॉलनीत प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. तर मिसारवाडी, सिध्देश्वर नगर,
जाधववाडी, शहानवाज मशीद परिसर, सादात नगर, भवानीनगर-जुना मोंढा, जुना बाजार, ईटखेडा
परिसर, जयभीम नगर, अल्तमश कॉलनी, शिवनेरी कॉलनी एन-९, टिळक नगर, सिडको एन-फोर, रोशन
गेट परिसर, सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर, हमालवाडी, भाग्यनगर, समता नगर, बीड बायपास
या भागात, त्याचबरोबर कन्नड, गंगापूर तसंच सिल्लोड इथंही प्रत्येकी एक रुग्ण आढळला
आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल
५६ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ८६७
जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या कोरोना
विषाणू बाधित रुग्णांपैकी एकोणीस जणांच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा झाल्यामुळे
त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले. बाधितांमध्ये जुना जालन्यातल्या एका खाजगी रुग्णालयातल्या
तीन, जालना तालुक्यातल्या नूतनवाडी इथली एक महिला, चांदई एक्को इथला एक पुरुष आणि त्यांची
१२ वर्षीय मुलगी, छत्तीसगडहून आलेला आणि मूळचा खापरदेव हिवरा इथला एक तरुण, अंबड तालुक्यातल्या
पीर गैबवाडी इथल्या एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
८५ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या ६३ कोरोना
विषाणू बाधितांवर उपचार सुरू आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
आणखी नऊ जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५४ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात सात कोरोना
विषाणू बाधित रुग्णांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ८६
रूग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील दोन महिला
रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयानं सांगितलं आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाविषाणू संसर्गामुळे आता पर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
बीड शहरात भाजी मंडई परिसरात
असलेल्या विवेकानंद हॉस्पिटल, पॅराडाईज हॉस्पिटल, दिशा डायग्नोस्टिक सेंटर आणि त्यांचा
परिसर प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. पाटोदा तालुक्यातल्या
कारेगाव इथं सापडलेला कोरोना विषाणू बाधित रुग्ण गेल्या आठवड्यात या तीन रुग्णालयामंध्ये
उपचार आणि तपासण्या करण्यासाठी गेला होता.
दरम्यान, या रूग्णांच्या
संपर्कात आलेल्या ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर बीड शहरासह तालुक्यातल्या
खंडाळा, चऱ्हाटा, पालवन, ईट, पाटोटा तालुक्यातल्या डोंगरकिन्ही, वैजाळा, वडवणी तालुक्यातल्या
देवडी, गेवराई तालुक्यातल्या खांडवी, मादळमोही, धारवंटा तसंच केज तालुक्यातल्या खरमाटा
आणि धारुर तालुक्यातल्या पारगाव या गावांमध्ये येत्या चार जूनपर्यंत संपूर्ण संचारबंदी
लागू करण्यात आली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून
आलेल्या तीन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं स्पष्ट झालं, आतापर्यंत अहमदनगर
जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून आलेल्या एकोणीस जणांना विषाणूची लागण झाली असून, जिल्ह्यात
एकूण रुग्णसंख्या ७५ झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव
राजा तालुक्यातला निमखेड इथला एक प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी कोरोना विषाणू बाधित
असल्याचं आढळून आलं. हा कर्मचारी मुंबईहून परत येताना लातूर इथल्या सहकाऱ्याच्या संपर्कात
आला होता.
****
नाशिक जिल्ह्यात काल आणखी
५८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये मालेगावमध्ये २५, ग्रामीण भागात
१९, तर नाशिक शहरात दहा रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार
५८ इतकी झाली आहे.
****
राज्यातल्या सांगली, सातारा,
जळगाव, धुळे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातही कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढली आहे.
****
देशभरातल्या शाळा -महाविद्यालयं
सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं केंद्रीय
गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. शाळा महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारनं
परवानगी दिल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर गृह
मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शाळा- महाविद्यालयं
बंदचा आदेश कायम असल्याचं मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ - सीबीएसई अभ्यासक्रमाचे दहावी तसंच बारावीचे विद्यार्थी टाळेबंदीच्या काळात स्वत:चा
जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात किंवा राज्यात गेले असतील, तर त्यांना ते असतील तिथल्या
परीक्षा केंद्रावरून परीक्षा देता येणार आहे. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयानं काल
आदेश जारी केले. एक जुलैपासून या परीक्षा होणार आहेत.
****
टाळेबंदीमुळे रद्द झालेल्या
इयत्ता दहावीच्या भूगोल विषयाच्या गुणांकनाची पद्धत निश्चित करण्यात आली आहे. इतर विषयांच्या
लेखी परीक्षांच्या गुणांच्या सरासरीइतके गूण, भूगोलाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार
असल्याची माहिती, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा, शकुंतला
काळे यांनी दिली आहे. भूगोलाच्या गुणपद्धतीचा तिढा सुटल्यानं, दहावीच्या अन्य विषयांच्या
उत्तरपत्रिका तपासणीच्या कामालाही वेग येणार आहे. याच पद्धतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या
कार्यशिक्षण विषयाच्या गुणांचंही वाटप केलं जाणार आहे.
****
कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर
कापूस खरेदीसंदर्भात आलेल्या अडचणी दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही
कापूस खरेदी येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.
****
टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या
संकटकाळात अनेक दानशूर व्यक्ती तसंच सेवाभावी संस्था गरीब गरजूंसाठी धान्यवाटप आणि
अन्नदानासारखे उपक्रम राबवत आहेत. मात्र सर्वसामान्य कामगारही या मदतकार्यात मागे राहिलेला
नाही. औरंगाबाद इथं कंपनी कामगार असलेल्या राहुल लबडे नावाच्या तरुणानं कंपनीतून पगार
बंद झाल्यानंतर, हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र गरजूंसाठी त्यानं
मोफत भाजी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या तीन दिवसांत शंभरावर गरजूंनी त्याच्या या मोफत
भाजी योजनेचा लाभ घेतला आहे.
अकोल्यात राहणारा रणजीत तायडे
हा सर्वसामान्य कामगार कुटुंबातला कला शाखेचा विद्यार्थी. त्यानेही कुटुंबाकडे जमा
असलेल्या शिलकीतून आपल्या परिसरातल्या आठ ते दहा कुटुंबांना किराणा आणि अन्य जीवनावश्यक
साहित्याची मदत केली.
****
लातूर जिल्ह्यात धनेगाव इथल्या
आधार फाउंडेशन आणि एडिएम अॅग्रो इंडस्ट्रीज, तसंच विजाग प्रायवेट लिमिटेड या कंपन्याकडून
चारशे गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था इथं १०५ किट, तसंच सारोळा इथंल्या १०९, वैशालीनगर बाभळगाव
इथं ८०, सिकंदरपूर इथं ६६ तर पोहरेगाव इथल्या ४० कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात
आलं आहे.
****
परभणीच्या जिल्हा शासकीय
रुग्णालयातल्या कोविड कक्षातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिकांना संरक्षणाच्या
दृष्टीने पुरेसे साहित्य प्रशासनाद्वारे उपलब्ध न केल्याबद्दल संतप्त परिचारिकांनी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना धारेवर धरलं. आरोग्य कर्मचारी गेल्या
अनेक दिवसांपासून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र त्यांना अद्याप पुरेशा प्रमाणात मास्क,
सॅनिटायझर्स, हॅन्डग्लोज किंवा पीपीई कीट्स वगैरे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
परिणामी मंगळवारी या रुग्णालयातल्या एका परिचारिकेला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं
स्पष्ट झालं. संशयितांचा कक्ष, कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा कक्षामध्ये अपुऱ्या सोयीसुविधांबाबत
तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी परिचारिकांनी नागरगोजे यांच्याकडे केली.
****
महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशासाठी
७०-३० चा नियम रद्द करावा अशी मागणी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली
आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे
लेखीपत्राद्वारे ही मागणी करण्यात आली असल्याची माहिती कव्हेकर यांनी दिली. मराठवाड्यात
फक्त पाच महाविद्यालयात सहाशे ऐंशी विद्यार्थी क्षमता आहे. यामुळे चांगले गुण मिळूनही
७०-३० टक्के पद्धतीमुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं या
पत्रात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी ३१ तारखेला सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा दुसऱ्या सत्रातला हा बारावा भाग आहे.
****
देश सध्या कोरोना विषाणूच्या
प्रादुर्भावाचा सामना करत असतानाचा विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये काल टोळधाड किडीनं
हैदोस घातला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ नुकसान झालं. लाखोच्या संख्येनं ही टोळधाड
काल अमरावती जिल्ह्यात दाखल झाली. या टोळधाडीनं
जिल्ह्यातल्या पिकावर तुटून पडत ते संपुष्टात आणलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे
अमरावतीचे वार्ताहर……
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून टोळधाड
किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे हे टोळधाड दूरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गावरील
वनस्पतींची हिरवी पाने, फुले, बिया. खांदी, पालवे आदींचा फरशा पाळते वरुड तालुक्यातील
पुसला, खापरखेडा या शिवारात सायंकाळी या किडीचा अथवा थांबलेल्या आढळल्याने ट्रॅक्टर
स्पेअर, अग्निशामक बंबाच्या सहाय्याने फवारणी करण्यात आली त्यामुळे सदर किडींचा अथवा
कमी होऊन पुढे नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्याचे समजते आकाशवाणीच्या बातम्यासाठी
अमरावतीहून आनंद गंभीर
अमरावतीहून निघालेली ही टोळधाड
भंडारा जिल्ह्यात आली आहे. टोळधाड किडीचा गेल्या २५ वर्षातला हा सर्वात मोठा हल्ला
असल्याचं सांगण्यात आलं. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
काल भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील
झालेली खुर्द, आंधळगाव, पाय डोंगरी या गावात टोळधाड किडीने प्रवेश केला आहे जिल्ह्यातील
शेतकरी चिंता यामुळे वाढली असून याकिडीमार्फत नुकसानीची क्षमता तीव्रता प्रचंड असल्याने
शेतातील उभे पीक तसेच भाजीपाला अन्य पिके व हिरव्यागार वृक्षांची नुकसान टोळधाड किडीद्वारे
केले जात असल्याचे आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडलेला
आहे माधव चंदनकर आकाशवाणी प्रतिनिधी भंडारा
दरम्यान, या टोळधाडीला रोखण्यसाठी
कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे.
****
माजी केंद्रीय ग्रामविकास
आणि संसदिय कार्य राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी काल राजकीय निवृत्ती जाहीर केली.
यापुढे आपण नवं नेतृत्व घडवण्यासाठी मार्गदर्शन करू असं त्यांनी सामाजिक माध्यमावरुन
जाहीर केलं. पाटील या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या.
त्या तीन वेळा लोकसभेवर आणि एकदा विधानसभेवर निवडून आल्या होत्या. ऑगस्ट २०१४ पासून
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
****
बीड जिल्ह्यात माजलगावच्या
विविध पक्षाच्या एकोणीस नगरसेवकांनी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरोधात जिल्हाधिकारी
कार्यालयात काल अविश्वास ठराव दाखल केला. यात भाजपाच्या पाच नगरसेवकांचा देखील समावेश
आहे. चाऊस हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत. २३ नगरसेवकांपैकी
१९ नगरसेवकांनी या अविश्वास ठरावासाठी स्वाक्षऱ्या करून मतदानाची मागणी केली आहे.
****
लातूरच्या विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या परिसरातल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल पूर्णपणे
सज्ज असून या हॉस्पिटलचा लवकरच शुभारंभ करण्याचे नियोजन प्रशासनानं करावं, अशी सूचना
पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. कोविड १९च्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करून जिल्हा प्रशासनाने
कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणला असल्याचं ते म्हणाले.
****
जालना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी
शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेऊन उत्पादकता वाढीसाठी
प्रयत्न करावेत, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. जालना इथं काल
खरीप हंगाम आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पीककर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये
असमर्थ ठरणाऱ्या, तसंच टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करावी, असंही त्यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना सांगितलं.
दरम्यान, या विभागीय बैठकीत
महाराष्ट्र फर्टीलायजर डिलर्स असोशिएशनच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५
लाख रुपयांचा धनादेश दादा भुसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
****
लातूर तालुक्यातल्या गंगापूरच्या
ग्रामस्थांनी लोकवाटा जमा करुन पाच -सहा वर्षापूर्वी बांधलेल्या शेततळ्याच्या माध्यमातून
मे महिन्याच्या शेवटीसुद्धा ग्रामस्थांना दहा दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे.
या शेततळ्यात दरवर्षीच्या पावसाळ्यात तीन कोटी ८० लाख लिटर पाणी साठतं. यामुळे गावात
टँकरची गरज भासत नसून, गाव पूर्णपणे टँकरमुक्त झाल्याचं सरपंच बाबू खंदाडे यांनी सांगितलं.
पुढचे साडे तीन महिने हे पाणी पुरेल असं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या नागरिकांनी
आपल्या घराजवळच्याच किराणा दुकानातून सामान खरेदी करावं, असं आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव
प्रसाद यांनी केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. जवळच जायचं असल्यानं पायीच जावं,
दुचाकीचा वापर करु नये, असं ते म्हणाले. दुचाकीवर विनाकारण भटकणाऱ्याविरुद्ध कारवाई
केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या विविध
बाजार समित्यांनी शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून ऑनलाईन कापसाची खरेदी सुरु केली असून,
याची चौकशी केली जाईल, असं आश्वासन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिलं आहे. जिल्ह्यात
कापूस खरेदी अत्यंत संथ गतीनं होत असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षानं एका निवेदनाद्वारे
केली आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचं
संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची
शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ करण्याची मागणी उस्मानाबादचे
जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी केली आहे. सरकारमध्ये
कोणातच ताळमेळ नसल्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवले जात नसल्याचं भोसले यांनी लिहिलेल्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment