Friday, 29 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 29 MAY 2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –29 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातल्या सात जिल्ह्यातल्या साडे चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामासाठी आशियाई विकास बँकेकडून १७ कोटी ७० लाख डॉलर्सचं कर्ज
** स्थलांतरित कामगारांच्या प्रवासाचा खर्च संबंधित राज्यांनी द्यावा तर प्रवासादरम्यान भोजन पुरवण्याची जबाबदारी रेल्वेनं सांभाळण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
** टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्यांना मदत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचं 'स्पीक अप इंडिया' ऑनलाईन आंदोलन
** राज्यात कोरोना विषाणू संसगाचे दोन हजार ५९८ नवे रूग्ण; ८५ जणांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरात आणखी तीन जणांचा मृत्यू तर ४५ नवे रूग्ण
** मराठवाड्यात परभणी वगळता अन्य सर्व जिल्ह्यातल्या रूग्णांच्या संख्येत वाढ
आणि
** मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी एन देशमुख यांचं निधन
****
राज्यातल्या सात जिल्ह्यातल्या साडे चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामासाठी आशियाई विकास बँकेकडून १७ कोटी ७० लाख डॉलर्स एवढं कर्ज मिळणार आहे. या करारावर काल केंद्रीय वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव समीर खरे आणि आशियाई विकास बँकेचे स्थानिक संचालक केनिची याकोयामा यांनी स्वाक्षरी केली. दोन प्रमुख जिल्हे आणि ११ राज्यमार्गांचं दुहेरीकरण करण्याचं काम या निधीतून केलं जाणार आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातली दळणवळण सुविधा बळकट होईल तसंच ग्रामीण समुदायांना बाजारपेठ, रोजगाराच्या संधी आणि सेवा अधिक चांगल्याप्रकारे मिळू शकतील.  या रस्त्यांमुळे राष्ट्रीय महामार्ग, आंतरराज्यीय मार्ग, बंदरे, रेल्वे स्टेशन, जिल्हा मुख्यालय औद्योगिक क्षेत्रांशी संपर्काची सुविधा निर्माण होईल, असं खरे यांनी यावेळी सांगितलं.
****
स्थलांतरित कामगारांचा मूळ राज्यात जातानाचा बस आणि रेल्वे प्रवासाचा खर्च संबंधित राज्य सरकारांनी द्यावा, कामगारांकडून या प्रवासाचं भाडं घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत. या कामगारांना रेल्वेस्थानकावर जेवणाची व्यवस्था राज्य सरकारनं करावी, तर प्रवासादरम्यान भोजन पुरवण्याची जबाबदारी रेल्वेनं सांभाळावी, असेही  न्यायालयानं आदेश दिले आहेत. कामगारांच्या बस आणि रेल्वे प्रवास खर्चासंबंधी निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत दाखल एका याचिकेवरच्या काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. बुधवारपर्यंत तीन हजार ७०० विशेष श्रमिक रेल्वे तसंच रस्ते मार्गाने ९१ लाख कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकाकडून यावेळी देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्रातून आतापर्यंत ६९६ रेल्वेगाड्यांमधून ९ लाख ८२ हजार कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यात आलं असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
****
टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या गरजवंत गोरगरीबांसाठी केंद्र सरकारनं आपली तिजोरी उघडावी, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस पक्षानं काल 'स्पीक अप इंडिया' हे ऑनलाईन आंदोलन केलं, त्या अंतर्गत गांधी यांनी एका चित्रफितीद्वारे हे आवाहन केलं. पुढच्या सहा महिन्यांसाठी प्रत्येक गरजू कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा साडे सात हजार रुपये थेट द्यावेत, या मागणीचा गांधी यांनी पुनरुच्चार केला. ग्रामीण भागात कामगारांच्या हाताला काम मिळावं, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कामाची हमी दोनशे दिवसांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे.
मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी स्पीक अप इंडिया या ऑनलाईन आंदोलनात सहभाग घेतला.
****
कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या देशभरातल्या १३ महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची काल केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या १३ शहरांमध्ये देशातले एकूण रूग्णांच्या जवळपास ७० टक्के बाधित रूग्ण आहेत. यामध्ये राज्यातल्या मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांचा समावेश आहे. बैठकीत कोरोना विषाणुचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.
****
राज्यात काल दोन हजार ५९८ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. यामुळे राज्यातल्या एकूण रूग्णांची संख्या ५९ हजार ५४६ एवढी झाली आहे. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या ८५ रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतल्या ३८ तर पुण्यातल्या १० रूग्णांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत या आजारामुळे एक हजार ९८२ रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. या आजाराचे रूग्ण जरी वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. काल दिवसभरात ६९८ रूग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत या आजाराचे १८ हजार ६१६ रूग्ण विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद शहरात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये सादात नगरमधला ७२ वर्षीय पुरुष, हुसेन कॉलनीतल्या ६७ वर्षीय पुरुष आणि रहेमानिया कॉलनीतल्या ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६८ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, काल जिल्ह्यात आणखी ४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या एक हजार ४०७ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये हमालवाडी इथं चार, रोकडिया हनुमान कॉलनी, सिडको एन फोर इथं प्रत्येकी तीन, बायजीपुरा, नारळीबाग, रेल्वे स्टेशन परिसर, सिडको एन सहा संभाजी कॉलनी, जय भवानी नगर इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. बुढीलेन, समता नगर,  मिसारवाडी, बजाज नगर, संजय नगर, शहागंज,  हुसेन कॉलनी, कैलास नगर, उस्मानपुरा, इटखेडा, सिटी चौक, नाथ नगर, बालाजी नगर, साई नगर एन सहा, करीम कॉलनी रोशन गेट, अंगुरी बाग, एन अकरा हडको, पुंडलिक नगर, रहेमानिया कॉलनी, शहा बाजार, राणा नगर, कांचनवाडी आणि उस्मानपुरा या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
काल जिल्ह्यात १४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत ९०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
यशस्वी उपचारानंतर घरी परतलेल्या रूग्णांमध्ये गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातल्या तीन जणांचा समावेश आहे. याविषयी नोडल अधिकारी डॉ. सुदाम लगास यांनी माहिती दिली. ते म्हणाले..

३ patients ला discharge झालेले आहे सर्व ८ patients ला पण सुट्टी केली आहे त्यांची दहा दिवशी treatment करून सर्व patients तब्येत चांगली होती पण दहा दिवशी शरीरातला  virus पूर्ण कमी होतो त्या नियमाप्रमाणे आपण त्यांची सुट्टी दिलेली आहे आता सध्या स्थितीमध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये patients ३ ऍडमिट आहे आणि गंगापूरहून एका patients सिविल हॉस्पिटलला रेफेर केला होता अशा प्रकारे  १२ कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते त्यामध्ये एक मालुंजा येथे औरंगाबादहून गहू घेण्यासाठी आला होता त्याच्या  infection ने ३ patients निघाले होते त्याचप्रकारे औरंगाबाद पोलीस कर्मचारी घरी भेटण्यासाठी आली होती त्यानुसार गावामध्ये ७ patients झाले होते
****
जालना जिल्ह्यात काल आणखी २९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात अंबड तालुक्यातल्या मठ पिंपळगाव इथले सहा, काटखेडा इथले पाच, अंबड शहरातल्या शारदा नगरातले पाच, बदनापूर, मंठा, परतूर, नुतनवाडी इथं प्रत्येकी एक, राज्य राखीव दलातला एक पोलीस कर्मचारी आणि कोविड सुश्रुषा केंद्रातल्या आठ जणांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या आता ११५ झाली आहे. काल २५ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान, जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाने जिल्ह्यात आजपासून तीन दिवस संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.
****
उस्मानाबाद शहरात काल आणखी दहा जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. पापस नगर इथं सात, उमरगा इथले दोन तर कारी इथला एक रुग्ण आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातला एकूण रुग्णांचा आकडा ६२ झाला आहे.
दरम्यान, काल १२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 
****
बीड जिल्ह्यात काल आणखी पाच जणांना कोरोना विषाणुची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. पाटोदा तालुक्यातल्या कारेगाव इथले तीन, तर पाटोदा आणि धारुर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. बीड जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ६१ झाली आहे. काल तीन जण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान,  शहरात लागू केलेल्या संपूर्ण संचारबंदी आदेशात सुधारणा करून यात दूध विक्रेते आणि परवनाधारक भाजीपाला तसंच फळ विक्रेत्यांना वगळण्यात आलं आहे. शहरात फिरते दूध विक्रेते तसंच घरोघरी पुरवठा करणाऱ्या दूध विक्रेत्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र दूध विक्रीची दुकानं उघडता येणार नाहीत असा आदेश जिल्हादिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या गिरगाव इथं आणखी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण मुंबईहून आला होता. हिंगोली जिल्ह्यातही एकूण रुग्णसंख्या १६६ झाली आहे. दरम्यान, वसमत तालुक्यातले पाच जण काल कोरोना विषाणू मुक्त होऊन घरी परतले.
****
लातूर शहरातल्या मोती नगर भागात काल एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडला.
****
नांदेड जिल्ह्यात काल एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १३८ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ८६ रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत, तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात काल आणखी ५० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या एक हजार १०८ झाली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात काल चार नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. काल जिल्ह्यातून चार जण कोरोना विषाणू मुक्त होऊन घरी परतले.
****
नैॠत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवाहाला सध्या पोषण वातावरण निर्माण झाल्यानं हीच परिस्थिती राहीली तर एक जूनला केरळमध्ये मोसमी पावसाचं आगमन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असून, कोकण किनारपट्टीसह राज्यातल्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्ये पावसाचं आगमन झाल्यानंतर आठवडाभरात राज्यात पावसाचं आगमन होतं.
****
वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिल्या आहेत. महावितरणच्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या विविध कामांचा आढावा काल राऊत यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतला, त्यावेळी ते बोलत होते.   वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळण्यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवावी, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वाधार योजना आता तालुक्यासाठीही लागू करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागानं घेतला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनजयं मुंडे यांनी काल ही माहिती दिली. या योजनेत पूर्वीच्या पाच किलोमीटरच्या जिल्हा मर्यादेत आता १० किलोमीटरपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले..

यापूर्वी कधी तालुकास्तर या स्वाधारी योजनेमध्ये नव्हता तालुक्याला सुद्धा पाच किलोमीटरचा  आपण त्यात अंतर्भूत केला ज्या तालुकास्तरावर पाच किलोमीटरच्या अंतरात कॉलेजेस आहेत अशा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आमच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातल्या त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता यात स्वाधार योजनेचा फायदा होणार आहेत पूर्वी फक्त पंचवीस हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा मिळत होता आता तो तीस हजार विद्यार्थ्यापर्यंत फायदा देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने दिलेला आहे
****
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात उन्हाळ्यातही संकरीत ज्वारी, उन्हाळी भूईमुग, भाजीपाला या सारखी पीकं शेतकरी घेत आहेत. या दुष्काळी भागात मागील काही वर्षांत जलसंवर्धन झाल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
****
परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना या पदावरून त्वरित मुक्त करावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून योजना आखावी आणि सर्व रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावं, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुरवठा करणार आहे. बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली. शेतकरी सभासदांना भेडसावणारी ऊस तोडणी मजुरांची टंचाई विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ऊस उत्पादक सभासदांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत कर्ज पुरवठा होत असे, आता साखर कारखान्यांन शिफारस केलेल्या ऊस उत्पादक सभासदांना थेट पतपुरवठा होणार आहे. लातूर जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकारात कार्यरत असलेल्या साखर कारखाना सभासदांना याचा लाभ मिळणार आहे
****
औरंगाबाद शहरातली टाळेबंदी शिथील करण्याबाबतचा निर्णय एक जून नंतर घेण्यात येणार असून ग्रामीण भागातल्या उद्योग व्यवसायांना यापूर्वीच परवानगी असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. त्यांनी काल सामाजिक माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याविषयी माहिती देतांना ते म्हणाले..

७ ते २ ही वेळ आहे ही अजून आपण वाढवू १ तारखेनंतर वाढवू  वाढवून आणि ७ ते ५ किंवा  ७ ते ७ करण्याचा प्रयत्न करू शहराच्या बाबतीतला निर्णय हा महापालिका आयुक्त आणि कमिश्नर पोलिस यांच्या सहमतीने घेणार मला याठिकाणी स्पष्ट करायचं आहे ग्रामीण भागातील सर्व उदयोग सर्व व्यवसाय यांना सरकारने permission दिलेली आहे तुम्ही जे उदयोग ग्रामीण भागातील बंद केलेले होते ते सुरु करावे आपल्याला त्याठिकाणी कोणत्याही बंधन नाही तर इतकं नाही तुम्हाला कोणत्याही शासकीय ऑथॉरिटी घेण्याची गरज नाही सर्व ई – महासेवाकेंद्र किंवा आपल्या सेवाकेंद्रांना तातडीने सुचना देतो आपण तातडीने ग्रामीण भागात सुरु करा
आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात पल्स ऑक्सिमीटरद्वारे पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या ऑक्सिजन मात्रेची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीला व्यापक स्वरूप देण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले. राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत शाळा महाविद्यालयं बंदच राहणार आहेत. मद्यविक्रीला जिल्ह्यात पूर्णत: बंदी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या व्यापारी संकुलातल्या व्यापारी गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नियमांच्या अधीन राहून राज्य शासनाकडे ठराव पाठवावे, अशी सूचना आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यात टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प असल्याने, दुकानांचे या काळातले भाडे रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे, त्याअनुषंगानं पाटील यांनी ही सूचना केली आहे.
****
जनुकीय सुधारित - जीएम बियाण्यांना परवानगी द्यावी या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने काल ई-मेल आंदोलन केलं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह, केंद्र तसंच राज्याचे कृषीमंत्री, पर्यावरण मंत्री आणि गृह मंत्र्यांना ई-मेल पाठवून, जी.एम बियाण्यांना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी या मागणीचे ई मेल केल्याचं, संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेत ई मेल केल्याचं, शेतकरी संघटनेच्या लातूर शाखेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी सांगितलं.
****
आताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी एन देशमुख यांचे आज पहाटे एक वाजता निधन झालं ते ८५ वर्षांचे होते १९६३ पासून मुंबई उच्च न्यायालयाचे वकील होते त्यानंतर १९८२ पासून ते औरंगाबाद मध्ये वकिली करू लागले १९८६ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश आणि १९८७ मध्ये कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली १९९७मध्ये ते निवृत्त झाले होते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती असताना त्यांनी साखर कारखान्यांनी ऊस झोन बंदी हटवून शेतकऱ्यांना भाव मिळेल तिथे ऊस देण्याचा निर्णय दिला होता याशिवाय अन्य काही महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी दिले होते मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातले असलेल्या देशमुख औरंगाबाद मध्ये स्थायिक झाले होते आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०१९ च्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तूर आणि कापूस या पिकासाठी ६३ कोटी ५० लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदीसाठी नोंदणी करण्याची मुदत १४ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी नोंदणी करण्याची मुदत ३१ मे ही होती. 
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या खडका आणि मोहाळा या दोन्ही गावांच्या परिसरातून होणारी वाळूची चोरटी वाहतूक त्वरीत बंद करावी अशी मागणी पोलीस पाटील वैजनाथ यादव यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आणि रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घराचं काम अद्यापही पूर्ण झालं नसल्यानं त्यांना भाड्याच्या घरात रहावं लागत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत या लाभार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये मदत देण्याची मागणी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कृती समितीचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रदीप फाले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
टाळेबंदीचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर होणारा परिणाम आणि त्यावरच्या उपाययोजनांबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासनानं एक समिती गठीत केली आहे. पणन संचालक सुनिल पवार हे या समितीचे अध्यक्ष असतील, तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांची समितीत सदस्य म्हणून निवड झाली आहे.  
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख यांना काल पाच हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी मंजूर झालेल्या अनुदानाचं बील काढण्यासाठी देशमुख यांनी तक्रारदाराला ही लाच मागितली होती.
****
नांदेड शहरातल्या वृतपत्र वितरकांठी चंद्रप्रभा होमिओपॅथी क्लिनिकचे प्रमुख डॉ. अशोक बोनगुलवार यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शन शिबीर घेतलं. महाराष्ट्र राज्य वृतपत्र वितरक संघटणेचे सरचिटणीस बालाजी पवार यांच्या हस्ते होमिओपॅथीक औषधी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचं वितरकांना वाटप करण्यात आलं.
***
परभणी जिल्ह्यात लागू असलेली संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवांसह यापूर्वी सुट दिलेल्या शेतमाल खरेदी, विक्री, बि- बियाणे, खते, कृषी विषयक साहित्य, कृषीपूरक अन्य जोड उद्योग, रस्ते, अन्य बांधकामे, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल अन्य सेवांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. ३१ मे पर्यंत हे नवे नियम लागू राहतील.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काल १३७ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं, सावरकर  जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आलं. सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करत रक्तदान करण्यात आल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं.
लातूर इथं केशवराज शैक्षणिक संकुलात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीकडे १० हजार मास्क सुपूर्द करण्यात आले.
सावरकर जयंतीनिमित्त शिवसेनेनं लातूर इथं घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात एकूण ५६ जणांनी रक्तदान केलं.
****
सिल्लोड तालुक्यातल्या बाभूळगाव फाट्याजवळ ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. काल संध्याकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.
****
बीड जिल्ह्यातल्या केज- कळंब रोडवर चारचाकी वाहनाचं टायर फुटून झालेल्या अपघातात पोलीस हवालदार विवेकानंद गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. ते कळंबचे पोलिस उपअधीक्षक सुरेश पाटील यांचे अंगरक्षक म्हणून कळंब इथं कार्यरत होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव इथल्या भारत जिनींग मिलला काल रात्री भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला असून, याठिकाणी भारतीय कापूस महामंडळाच्या वतीनं शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आलं होतं. आगीचं कारण अद्याप कळून शकलं नाही.
****


No comments:

Post a Comment