Saturday, 23 May 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.05.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 May 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मे २०२० सायंकाळी ६.००

****

·      देशांतर्गत मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी सरकारचे सर्व ते प्रयत्न.

·      औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे पंचवीस रुग्ण.

·      मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधे राज्यातील परिस्थीतीवर आढावा बैठक.

आणि

·      नजिकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नाही - केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची माहिती.

****

देशांतर्गत मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत असल्याचं रेल्वे मंडळानं म्हटलं आहे. सर्व राज्य सरकारांसमवेत यासंबंधीचा कार्यक्रम तयार करण्यात आला असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आज रेल्वे मंडळानं दिली. या सेवेअंतर्गत आतापर्यंत दोन हजारहून अधिक रेल्वे गाड्यांमधून सुमारे ४५ लाख जणांनी प्रवास केला आहे. गेल्या चार दिवसांत २६० प्रवासी गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे विभागातर्फे खाद्य पदार्थांची सुमारे ४७ लाख पाकिटं वाटण्यात आली असल्याची माहिती रेल्वे मंडळानं यावेळी दिली आहे.

****

औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून आज बिहारच्या मुजफ्फरपूरसाठी एक विशेष श्रमिक रेल्वे रवाना झाली. यातून एक हजार ४६४ मजूर आपल्या गावी जात आहेत. लातूर जिल्ह्यातील १७६ मजुरांपैकी १३६ मजुरांच्या हातांवर घरीच विलगीकरणाचे शिक्के असल्याचं यावेळी निदर्शनास आलं होतं. त्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी हस्तक्षेप केल्यानं निवळली. वैद्यकीय तपासणीवेळी हे शिक्के चुकून मारले गेल्याची माहिती समोर आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं आतापर्यंत उत्तर प्रदेशसाठी चार, मध्यप्रदेशसाठी तीन, बिहारसाठी दोन तर झारखंडसाठी एक अशा एकूण दहा विशेष श्रमिक रेल्वे रवाना केल्या आहेत. मराठवाडा विभागात अडकलेल्या सुमारे सोळा हजार परप्रांतीय मजुरांच्या जाण्याची सोय या माध्यमातून झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर बानापूरे यांनी याबाबत दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे नवे पंचवीस रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता १२४३ झाली आहे. औरंगाबाद शहरातील ठाकरे नगर, पुंडलिक नगर इथं प्रत्येकी दोन, न्याय नगर, बजरंग चौक एन सात इथं प्रत्येकी तीन नवे रुग्ण आढळले आहेत. सकाळच्या सत्रात २३ नवे रुग्ण आढळल्यानंतर दुपारच्या सत्रात त्यामधे दोन रुग्णांची भर पडल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. 

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत एका बैठकीमधे कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात निर्माण परिस्थितीचा आढावा घेतला. या दोन नेत्यांमधे या विषयावर आठ दिवसांत झालेली ही तिसरी बैठक होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुख्य सचिव अजोय मेहता या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एका संदेशाद्वारे दिली आहे. राज्यातील आर्थिक हालचाली पुन्हा टप्याटप्प्यानं सुरू व्हाव्या तसंच राज्यांतर्गत रस्ते वाहतुकीला प्रारंभ व्हावा या बाबत पवार आग्रही असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं आपल्या या संदर्भातील वृत्तात म्हटलं आहे.

****

शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, असं राज्यपालांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकार योजत असलेल्या उपायांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी गेल्या बुधवारी एक बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीला अऩुपस्थित राहिले होते, त्या पार्श्र्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. विरोधी पक्ष भाजपनं या आठवड्याच्या प्रारंभी राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यात अपयशी ठरत असल्याची तक्रार केली होती. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणताही वाद नाही तसंच त्यांचे संबंध एखाद्या पिता आणि पुत्रासारखे असून ते तसेच राहतील, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

****

नजिकच्या भविष्यकाळात भारतामधे कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार नसून कोरोना प्रादूर्भावानंतरच्या जगात बंद दाराआडच्या क्रीडा स्पर्धांची सवय लावून घ्यावी लागणार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं तेरावी आयपीएल क्रिकेट स्पर्धा तात्पुरती थांबवून ऑस्ट्रेलियातील टीट्वेंटी विश्र्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमधे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएल संदर्भात सरकार निर्णय घेईल, असंही रिजीजू यांनी या संदर्भात एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

****

सोलापूरमधे आज कोरोना विषाणूचे ३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १३५ जणांचे अहवाल तपासणीसाठी देण्यात आले होते त्यातून हे स्पष्ट झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

****

बारामती इथल्या मालेगांव साखर कारखान्यामधे वायू गळतीमुळं गुदमरलेल्या किमान बारा कामगारांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली असून यात गुदमरलेल्या कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाबळे यांनी दिली आहे. यापैकी दहा कामगारांची प्रकृती स्थीर आहे तर दोघा जणांना अती दक्षता विभागात दाखल करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अन्य राज्यांत तसंच जिल्ह्यांत असलेले बुलडाणा जिल्ह्यातले सुमारे एक लाख नागरिक गेल्या महिनाभरात स्वगृही परतले आहेत. याशिवाय गुजरात राज्यातून बुलडाण्यात येण्यासाठी पाच हजार ११० जणांना परवानगी देण्यात आली आहे. सध्या दररोज सुमारे दीड हजार नागरिकांना यासाठी परवानगी देण्यात येत आहे. पुणे, मुंबईला जावून परतण्यासाठी परवानगी मागणाऱ्यांची संख्या यात सर्वाधिक असल्याची माहिती बुलडाणा जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी शहरांतून परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात आलेल्यांना कोठाळा इथं शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या नागरिकांनी परिसर स्वच्छतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. शाळा स्वच्छ करणं तसंच परिसरातील झाडांची काळजी घेणं, त्यांना आळं करणं आणि नियमित पाणी घालणं आदी त्यांच्या उपक्रमांची या भागात प्रशंसा होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर ग्रामपंचायतीनं प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक साहित्य आणि उपकरणं खरेदी करून दिली आहेत. अठरा गावांना याचा लाभ होणार आहे. अद्ययावत तपासणी यंत्रांसह ‘पी पी ई कीट’ उपलब्ध झाल्यानं आरोग्य सेवकांना अधिक चांगले उपचार करणं शक्य होणार असून त्यांना वैयक्तिक सुरक्षा लाभणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

अश्या प्रकारे साहित्य घेणारी महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत गंगापूर आहे असं सांगून सरंपच बाबू खंदाडे म्हणाले की, गंगापूर गावासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील खंडापूर, पाखर सांगवी, चिंचोली, वासनगाव, खोपेगाव, पेठ, चांडेश्वर, कव्हा, अंकोली आदि १८ गावांनाही याचा फायदा होणार आहे. अरूण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर.

****

खाजगी रूग्णालयांमधील डॉक्टर, परिचारीकांना देखील शासनानं विमा संरक्षण द्यावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी या मागणीचं निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केलं आहे. खाजगी रूग्णालयांमधे कोरोना विषाणूसाठी खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्याच्या पार्श्र्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी ही मागणी केली आहे.

****

पुणे विभागात स्थलांतरित मजुरांसाठी ५० केंद्र चालवली जात आहेत. यापैकी जिल्हा प्रशासनातर्फे ३५, कामगार विभागातर्फे दहा तर साखर कारखान्यांमार्फत पाच केंद्र चालवले जात आहेत. या ठिकाणी एक हजार ६३१ मजूर राहत असून १८ हजार ६७७ मजुरांना जेवण दिलं जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुणे विभागात टाळेबंदीच्या काळात अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा मुबलक पुरवठा असल्याची माहितीही त्यांनी दिली. विभागात जवळपास नव्याण्णव लाख लिटरहून अधिक दुधाचं संकलन करण्यात आलं असल्याची माहितीही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी दिली आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या लोहारा इथले सेवानिवृत्त शिक्षक मनोहर हेरकर यांनी आपलं एक महिन्याचं निवृत्ती वेतन कोरोना विषाणू बाधितांसाठी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आज हा निधी पंतप्रधान निधीला दिला आहे.

****

जालना शहरात परराज्यातून तसंच अन्य जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांची नोंद घेण्यासाठी नगरपालिकेने कार्यदलाची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या संदर्भात सूचना केली होती. त्यानुसार मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी हे कार्यदल स्थापन केले असून यासाठी सर्व ३० प्रभागातल्या नगरसेवकांची मदत घेतली जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं.

****

No comments:

Post a Comment