Friday, 29 May 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.05.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 May 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२० सायंकाळी ६.००

****

·      कोरोनाचे संकट दीर्घकाळ राहण्याची शक्यता लक्षात घेता टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही - मुख्यमंत्र्यांचे संकेत

·      छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

·      निवृत्त न्यायमूर्ती बी एन देशमुख यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

आणि

·      मराठवाड्यात कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या पाहता संचारबंदी कडक करण्याचा प्रशासनाचा निर्णय 

****

कोरोनाचे संकट दीर्घकाळ राहण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यसरकार टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही असं, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची राज्यातली सद्यस्थिती, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेली तयारी आदींची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांशी अनौपचारिक संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही भूमिका व्यक्त केली.  कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या गाठण्याच्या जवळपास राज्य पोहोचलं असून, ३१ तारखेला केंद्र सरकार टाळेबंदीबाबत काय निर्णय घेईल त्यावरही हा निर्णय अवलंबून असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.



****

बंधपत्रित -बॉण्डेड डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार आता आदिवासी भागातल्या बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजार रुपयांऐवजी ७५ हजार रूपये, आदिवासी भागातल्या बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टरांना ७० हजार रुपयांऐवजी ८५ हजार रूपये आणि इतर भागातल्या एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजार रुपयांऐवजी ७० हजार रुपये तसंच विशेषज्ञ डॉक्टरांना ६५ हजार रुपयांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासोबतच कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचाही निर्णयही घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंधासाठीच्या लढाईत देशभरातून ३८ हजारावर डॉक्टर्स स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. यापैकी अनेक जण सशस्त्र सेना दलातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या २५ मार्च रोजी सरकारने डॉक्टरांना सहकार्यासाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर देशभरातले ३८ हजार १६२ डॉक्टर रुग्णसेवेत रुजू झाले आहेत.

****

एक मे पासून आतापर्यंत देशभरात ३ हजार ८४० विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या, या माध्यमातून ५२ लाखांवर स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यात आलं आहे. रेल्वे मंडळाकडून आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राज्यांकडून आता रेल्वेची मागणी कमी होत असून, सध्या ४५० रेल्वेंची मागणी विविध राज्य सरकारांनी केली असल्याची माहिती रेल्वे मंडळाकडून देण्यात आली.

****

दिल्लीत झालेल्या तबलिगी जमात कार्यक्रमासंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं प्राथमिक तपास सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी केलेले रोख रकमांचे संशयास्पद व्यवहार आणि परदेशी देणग्यांची दडवलेली माहिती यासंदर्भात ही चौकशी असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं आज निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यानं गेल्या ९ मे पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, आज दुपारी हृदयगती बंद पडून त्यांचं निधन झालं. प्रशासकीय सेवेतून काँग्रेस पक्षामार्फत राजकारणात आलेले अजित जोगी नोव्हेंबर २००० मध्ये छत्तीसगढ राज्याची स्थापना झाल्यावर पहिले मुख्यमंत्री झाले होते. २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत, जेसीसी - जनता काँग्रेस छत्तीसगढ या पक्षाची स्थापना केली होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जोगी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

****

निवृत्त न्यायमूर्ती बी एन देशमुख यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांचं आज पहाटे निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. इंग्लंडहून वकिलीचं शिक्षण पूर्ण करून परतलेल्या देशमुख यांची १९७२ साली शेतकरी कामगार पक्षाकडून विधान परिषदेवर निवड झाली होती. १९८६ ते १९९७ अशी अकरा वर्ष ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले आहेत.

देशमुख यांच्या निधनानं समाजाच्या सर्वच स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. विधी क्षेत्रासह सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणारे न्यायमूर्ती देशमुख यांच्या निधनानं मराठवाड्याची मोठी हानी झाली असल्याचं, पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

मराठवाड्यात कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या पाहता संचारबंदी कडक करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

जालना जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड शहरात चार जूनपर्यंत लागू केलेल्या संपूर्ण संचारबंदी आदेशात सुधारणा करून, दूध विक्रेते आणि परवानाधारक भाजीपाला तसंच फळ विक्रेत्यांना त्यातून वगळण्यात आलं आहे. शहरात फिरते दूध विक्रेते तसंच घरोघरी दूध पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र दूध विक्रीची दुकानं उघडता येणार नाहीत असा आदेश जिल्हादिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने उद्या आणि परवा संपूर्ण जिल्हाभरात “जनता कर्फ्यू” चे आदेश दिले आहेत. या दोन्ही दिवसांत नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केलं आहे. जनता कर्फ्यू च्या दरम्यान रुग्णालयं, औषधी दुकानं तसंच दूध विक्रीचे दुकानं, सुरू राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होईल. बाकीच्या सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातली जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि बाजारपेठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत सुरु राहणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात सामाजिक संपर्क माध्यमावरून येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

तीन दिवसाच्या संचारबंदीनतर परभणी जिल्ह्यात आज शिथिलता देण्यात आली. मात्र बाजार पेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सगळीकडे सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन केलं नसल्याचं आढळून आलं.

दरम्यान, जिंतूर तालुक्यात वाघीबोबडे इथं मुंबईहून आलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे आता परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ६८ झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत ४८ ने वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या एक हजार ४५५ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

****

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाजार समिती आवारात शिल्लक असल्यामुळे तो बाहेर घेऊन जाण्यासाठी उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार बंद राहणार आहेत. हे व्यवहार सोमवारपासून पुन्हा सुरू होतील अशी माहिती सभापती ललितकुमार शहा यांनी दिली आहे.

****

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात काल पुन्हा ७ जण कोविड पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या १३२ झाली आहे. शिरपूर शहरात आज पासून २ जून या पाच दिवसांच्या काळात जनता जीवनावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील.

****

औरंगाबाद शहरात राहणाऱ्या तृतीयपंथीयांना आमदार अंबादास दानवे यांच्या वतीनं अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात आलं. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक प्रभागात व्यवसाय बंद असलेल्या रिक्षाचालकांना औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी जीवनावश्यक साहित्याचं वितरण केलं.

****

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातले सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांना मारहाण केल्याप्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे निरीक्षक युवराज मोहिते यांनी पीटीआयला ही माहिती दिली. शेरकर यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याची तक्रार बोऱ्हाडे यांनी दिली होती, त्यानुसार शेरकर यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ३२३, ३२४ नुसार गुन्हा दाखल केल्याचं, पोलीस निरीक्षक मोहिते यांनी सांगितलं.

****

टाळेबंदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैध मापन शास्त्र विभागाने राज्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत एकूण ८८६ स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ग्राहकांना वस्तू वजनात कमी दिल्यासंबंधी दोन आणि इतर नियमांच्या उल्लंघनाबाबत ७७ असे एकूण ७९ खटले नोंदवण्यात आले आहेत.

****

खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन आणि भत्ते दिले जावे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याचं निवेदन भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या वतीनं आज औरंगाबाद शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यात आलं. शासकीय नियमाप्रमाणे शिक्षक - शिक्षकेतरांना पूर्ण वेतनश्रेणी आणि भत्ते मिळतात की नाही हे पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी, या समितीचे कामकाज पाहण्यासाठी उपशिक्षणाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमावं यासह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

****

ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात पुरुष संघाचे चार टी ट्वेंटी, चार कसोटी तसंच एकदिवसीय सामने होणार आहेत. तर महिला संघ फक्त एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पुरुष संघाचा पहिला टी ट्वेंटी सामना ११ ऑक्टोबरला होणार आहे, टी ट्वेंटी मालिकेनंतर कसोटी मालिका होईल, तर महिला तसंच पुरुष संघांचे एकदिवसीय सामने पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहेत.

****

No comments:

Post a Comment