Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जून २०२० सायंकाळी ६.००
****
Ø टाळेबंदीच्या काळात कामगारांना
पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई न करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची
१२ जूनपर्यंत मुदतवाढ
Ø मुंबई महानगर प्रदेशांतर्गत आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी; इतरत्र बंदी कायम
Ø
औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात
कोविडचे ६३ नवे
रुग्ण; जालन्यात ११, नांदेड ७ तर परभणीत आणखी दोघांना कोरोना विषाणू संसर्ग
आणि
Ø
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक
बासू चॅटर्जी यांचं आज मुंबईत निधन
****
टाळेबंदीच्या काळात कामगारांना पूर्ण वेतन न देणाऱ्या
कंपन्यांविरोधात कारवाई न करण्याच्या आपल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने १२ जूनपर्यंत
मुदतवाढ दिली आहे. गृहमंत्रालयानं गेल्या २९ मार्चला परिपत्रक जारी करत, कामगारांना
टाळेबंदीच्या काळातलं पूर्ण वेतन देण्याचे निर्देश कंपन्यांना दिले होते, त्या परिपत्रकाविरोधात
दाखल याचिकांवरचा निर्णय न्यायालयानं आज राखून ठेवला. कामगारांना त्यांचा पगार मिळायलाच
हवा, मात्र कंपनीकडे कामगारांचे पगार करण्यासाठी पुरेसा पैसाच नसेल, अशीही परिस्थिती
उद्भवू शकते, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकारनं या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र
दाखल करून, पगार करण्यास सक्षम नसलेल्या कंपन्यांना आपला ताळेबंद सादर करण्यास सांगितलं
होतं. २९ मार्च रोजी काढलेलं हे परिपत्रक १८ मे पासून निष्प्रभ झालं असल्याचं, केंद्र
सरकारकडून न्यायालयाला सांगण्यात आलं आहे.
****
राज्य शासनानं मुंबई
महानगर प्रदेशांतर्गत आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिली आहे. या निर्णयानुसार मुंबई
शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागातल्या नागरिकांना
याच जिल्ह्यांतर्गत प्रवास करता येणार आहे. याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले. या
व्यतिरिक्त राज्यात इतरत्र आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात
स्पष्ट नमूद आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात
६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोना विषाणू
बाधितांची संख्या १ हजार ७६७ झाली आहे. यापैकी १ हजार ११३ रुग्ण बरे झाले असून, ५६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. काल
रात्री एका कोरोना विषाणूग्रस्ताचा मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यात या आजारामुळे मृतांची
संख्या ८९ झाली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
मंठा तालुक्यात अकरा जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यामध्ये नानशी इथले ८,
केंधळी इथले दोन आणि वैद्य वडगाव इथला एक अशा एकूण अकरा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या
कोरोना विषाणूग्रस्तांची एकूण संख्या आता १७० झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज ७ कोरोनाविषाणू
बाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १८२
झाली आहे. जिल्ह्यात १२६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर या संसर्गामुळे आतापर्यंत
आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८ कोरोनाविषाणू बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्ह्यात आज सकाळी दोन जणांचा कोरोना विषाणू
संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे, यामुळे परभणी जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची संख्या
आता ८९ झाली आहे. या नव्या रुग्णांमध्ये परभणी शहरातल्या मिलिंद नगर इथल्या एका रुग्णाचा
तसंच पाथरी तालुक्यातल्या रामपुरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. रामपुरी ग्रामपंचायत
हद्द प्रतिबंधित श्रेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन
दिवसात तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये नवी मुंबईतल्या वाशी
डॉकयार्डहून जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात भोयनी इथं आलेली ६० वर्षीय महिला, नवी
दिल्लीहून कारंजा तालुक्यातल्या दादगाव इथं आलेली ३६ वर्षीय महिला आणि मध्य प्रदेशात
शिक्षणासाठी जाऊन आलेल्या एका विद्यार्थिनीचा समावेश आहे.
****
धुळे इथं हिरे रुग्णालयात उपचार
घेत असलेला तीन वर्षाचा बालक आणि त्याची आई
कोरोनाविषाणू संसर्गातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ रुग्ण कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात नवीन ६
रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यात धुळे शहरातले ५ आणि शिंदखेडा तालुक्यातल्या
एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १७७ झाली आहे.
****
सार्वजनिक बांधकाम
मंत्री अशोक चव्हाण यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चव्हाण यांना
उपचारासाठी मुंबईतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना आज सुटी देण्यात आली.
दरम्यान राज्यात
आजपर्यंत ७४ हजार ८६० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, यापैकी ३२ हजार ३२९ रुग्णांची
प्रकृती बरी झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
राज्यात आतापर्यंत
३० पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी १८ पोलीस मुंबईत कार्यरत
होते. या आजाराची लागण झालेल्या पोलिसांची संख्या अडीच हजारावर पोहोचली असून, यापैकी
१ हजार ५१० पोलिसांवर सध्या विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत, या रुग्णांमध्ये १९१ पोलीस
अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
अकोला शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या कोविड १९ कक्षातल्या उपचार व्यवस्थेचा
आढावा घेतला. जिल्ह्यात प्रादुर्भावाची वाढती संख्या पाहता खाजगी दवाखाने कोविड हॉस्पिटल
म्हणून अंकित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून ग्लोबल हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल
म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सर्वोपचार रुग्णालय, महिला रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातल्या रिक्त जागांवर येत्या तीन ते चार दिवसात पदभरती करण्याचे आदेश आरोग्य
उपसंचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं आज
मुंबईत निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. वृद्धावस्थेमुळे गेल्या काही दिवसांपासून ते
अस्वस्थ होते, आज पहाटे झोपेतच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर सांताक्रूझ
इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यमवर्गीयांच्या दैनंदिन जीवनातला
संघर्ष आपल्या चित्रपटातून सजीव करणारे बासू चॅटर्जी यांनी एका दैनिकात व्यंगचित्रकार
म्हणून प्रारंभी काम केलं, राजकपूर आणि वहिदा रहमान अभिनीत तीसरी कसम या चित्रपटाचे
सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेले चितचोर, पिया
का घर, खट्टा मिठा, बातों बातोमें आदी चित्रपट आणि त्यातली सुमधूर गाणी आजही रसिकांच्या
स्मरणात आहेत. बासू चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी
दु:ख व्यक्त केलं आहे.
****
निसर्ग चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये पुणे जिल्ह्यात
तीन जणांचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात एक पुरुष आणि त्याच्या आईचा अंगावर भिंत
पडून मृत्यू झाला, तर हवेली तालुक्यात एका घरावरचे उडून जाणारे पत्रे पकडताना एक पुरुष
दगावल्याचं वृत्त आहे.
****
निसर्ग
चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. पालकमंत्री अदिती तटकरे
यांनी जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात मालवण तालुक्यात चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं. विजेचे खांब कोसळल्यानं
खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला प्रयत्न सुरू असल्याचं, अधीक्षक
अभियंता विनोद पाटील यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उंबडगा इथं मंगळवारी
वादळी वाऱ्यासह पावसानं झालेल्या नुकसानाची औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पाहणी
केली. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या
घरातील बी बियाणं आणि खतांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं बोगस बियाण्यांची
विक्री करणाऱ्या दोघांना
पोलिसांनी कृषी विभागाच्या मदतीनं ताब्यात घेतलं आहे. या दोन्ही आरोपींना २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने दिले आहे.
****
राज्य
परिवहन महामंडळानं बसमधून प्रवासी वाहतूकी सोबतच मालवाहतूकही करण्याचा निर्णय घेतला
आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब, उस्मानाबाद, भूम, परांडा, तुळजापूर, उमरगा या
सहा आगारातल्या काही बसमधली आसनं काढून त्यातून मालवाहतुक केली जाणार आहे. या बसमधून
शेतमाल, फळं तसंच किराणा व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक राज्यात केली जाणार आहे.
****
लातूर
शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं ६ नियंत्रण क्षेत्रातील सर्व नागरिकांची
ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करण्यात येत आहे. ऑक्सिमीटरचा वापर केल्याने अधिक प्रभावी
सर्वेक्षण करता येत असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत
बिराजदार यांनी दिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या १० जून रोजी आपला
२१ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मात्र यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
पक्ष कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असं आवाहन
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केलं आहे.
*****
No comments:
Post a Comment