Saturday, 6 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.06.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२० दुपारी १.०० वा.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे नवे नव्वद रुग्ण आढळले आहेत. यात हर्सुल कारागृहात एकोणतीस नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार नऊशे छत्तीस झाली आहे. यापैकी एक हजार एकशे चोपन्न रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील सहाशे श्यहाऐंशी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. आज पिंपळगाव देवशी, गंगापूर , राधास्वामी कॉलनी , भारतमाता नगर, एन 12 , हर्सुल परिसर, राधास्वामी कॉलनी, भारतमाता नगर, एन 12, हर्सुल परिसर, अहिंसा नगर, शिवशंकर कॉलनी, आकाशवाणी परिसर, न्याय नगर इथं प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे. कैलास नगर, बीड बायपास, हनुमान नगर, गादिया विहार, शंभू नगर, तोफखाना- छावणी, जुनी मुकुंदवाडी, पदमपुरा, समता नगर, युनुस कॉलनी, जुना बाजार, जय भीम नगर, गौतम नगर, देवडी बाजार, वेदांत नगर, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी, अल्तमश कॉलनी , पैठण गेट,  रेहमानिया कॉलनी, पिसादेवी रोड इथंही प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे. मिल कॉर्नर, भवानी नगर, आंबेडकर नगर, एन 11 टी.व्ही सेंटर, एन आठ- सिडको, भीमनगर, भावसिंगपुरा, संजय नगर, नॅशनल कॉलनी, याभागात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. गारखेडा परिसर, हुसेन कॉलनी, पीर बाजार उस्मानपुरा, लेबर कॉलनी इथं प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. रोशन गेट परिसरात पाच नवे रुग्ण आढळल्याची माहितीही प्रशासनानं दिली आहे. एकूण नव्वद नव्या रुग्णांमधे २१ महिला आणि ६९ पुरुष रुग्णांचा समावेश असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.
****

 जालना जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे नवे अकरा रुग्ण आढळले आहेत. जालना शहरातल्या पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पाच तर क्रांतीनगर, मोदीखाना इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मंठा तालुक्यातल्या नानशी आणि आकणी इथं प्रत्येकी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. जालना जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता १८५ झाली आहे. घनसावंगी तालुक्यातल्या पांगरी इथल्या ६५ वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा आज जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे.
****

 भारतात कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा विस्फोट झाला नसला तरी त्याचा धोका कायम असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. देशातील टाळेबंदी उठवली जात असताना रुग्णांची संख्या सध्या तीन आठवड्यांमधे दुप्पट होत असल्याचं संघटनेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीसारख्या उपायांमुळे देशात विषाणूचा प्रसार होण्यावर नियंत्रण राहिलं परंतू टाळेबंदी उठल्यानंतर लोकांची हालचाल सुरू होईल तेंव्हा हा आजार पुन्हा बळावण्याचा धोका असेल, असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****

 देशात कोरोना विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुमारे अठ्ठेचाळीस टक्के असुन गेल्या चोवीस तासांमधे चार हजार सहाशे अकरा रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दोन लाख छत्तीस हजार, सहाशे सत्तावन्न झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये नऊ हजार आठशे सत्त्याऐंशी नवे रुग्ण आढळले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे.

 गेल्या चोवीस तासांमधे देशात कोरोना विषाणूमुळे दोनशे चौऱ्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या सहा हजार सहाशे बेचाळीस झाली असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
****

 अंमलबजावणी संचालनालयाच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्र्वभूमीवर नवी दिल्लीतील या कार्यालयाच्या मुख्यालयाला आज अठ्ठेचाळीस तासांसाठी टाळं ठोकण्यात आलं आहे. या रुग्णांमधे एक विशेष संचालक दर्जाचा अधिकारी असून दोन कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
****

 कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथला आषाढी यात्रा सोहळा रद्द करण्यात आल्यामुळे बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथल्या संत गहिनीनाथ महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरनं पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. माजी आमदार भीमराव धोंडे आणि गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी ही माहिती दिली आहे. पालखी सोहळ्या खंड पडू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. येत्या तीस जूनला पादुका प्रस्थान सोहळा होणार असून, या संबंधी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती भीमराव धोंडे यांनी दिली आहे.
*****

No comments:

Post a Comment