Tuesday, 2 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 02 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०२ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
हिंगोली जिल्ह्याला आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. तीन पूर्णांक ४ दशांश रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे कळमनुरी, वसमत, आणि औंढा तालुक्यातल्या वीस ते पंचवीस गावातले नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सकाळी ७ वाजून ९ मिनिटांनी हा धक्का जाणवला. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात भूगर्भातून आवाज येऊन भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे
****
कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण वाढतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ५५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या १ हजार ६४२ झाली आहे. यापैकी १ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात आणखी २५ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्या मुळे जिल्ह्यातल्या  एकूण रुग्णांची संख्या आता १५३ झाली आहे. दरम्यान, शहरातल्या मोदीखाना भागातल्या एका ६० वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यामुळे जालना जिल्ह्यात आता कोरोना संसर्गामुळे मृत पावलेल्यांची  संख्या दोन झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज सकाळी दोन कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची  संख्या आता १५१ झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णात एक सात वर्षे वयाची मुलगी तर एका ४ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे.
****
यवतमाळ इथं आज कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवीन १७ रुग्ण आढळले. उमरखेड तालुक्यातल्या नागापूर गावातले हे रुग्ण असून, त्यापैकी १३ जण एकाच कुटुंबातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आता यवतमाळ जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ३६ झाली आहे.
****
गेल्या २४ तासात देशात आठ हजार १७१ लोक कोरोना विषाणू संक्रमित आढळले. त्यामुळे देशात आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या एक लाख ९८ हजार ७०६ झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे २०४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९५ हजार ५२७ जण आतापर्यंत बरेही झाले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****


No comments:

Post a Comment