Wednesday, 3 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 03 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळानं आपली दिशा बदलली असून ते आता अलिबाग ऐवजी मुरुड च्या दिशेनं सरकलं आहे. दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान हे वादळ मुरुड किनाऱ्यावर धडकेल अशी शक्यता आहे. वादळामुळे होणारं संभाव्य नुकसान लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
वादळामुळे श्रीवर्धन, मुरुड, हरिहरेश्वर किनाऱ्यावर जोराचे वारे वाहत असून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.. मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, रेवदंडा, किहिम, अलिबाग या ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे काही झाड उन्मळून पडली आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड, पावस, हेदवी या भागात वाऱ्यांचा वेग ९० किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त आहे, तर जयगड किनाऱ्यावर हा वेग ११० किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि मदतीची गरज असेल त्यावेळी आपत्ती निवारण यंत्रणेशी संपर्क साधावा, असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्या माध्यमातून मुंबई लगतच्या समुद्र किनाऱ्यावरच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. जुहू आणि वेसावे कोळीवाड्यातल्या नागरिकांनाही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
****
निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता, किनारपट्टीलगतच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. वादळाची तीव्रता कमी झाल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असंही पवार यांनी म्हटल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान मुंबईहून सुटणाऱ्या अनेक विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळा या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आल्या असून, विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ५७७ बोटींपैकी ५६४ बोटी परतल्या असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पुण्याच्या प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेने अर्थात diat ने कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी नवीन ऑनलाईन तंत्र विकसित केलं आहे. संशयित रुग्णाच्या छातीच्या एक्स रे वरुन रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे या यंत्राच्या माध्यमातून लक्षात येतं, त्यासाठी रुग्णाच्या लाळेच्या तपासणीची गरज नाही. संस्थेनं हे tool मोफत उपलब्ध केलं असून ते diat.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या एक हजार सहाशे शहाण्णव झाली आहे. यापैकी एक हजार पंचाऐंशी रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात सध्या ५२६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनानं कळवलं आहे.  मृतांमध्ये आज सकाळी मरण पावलेल्या ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हा रुग्ण सिडको एन 4 भागातला रहिवासी असल्याचं समजतं. दरम्यान, आज सकाळी आढळलेल्या ४७ रुग्णांमध्ये शिवशंकर कॉलनी ५, मिल कॉर्नर ४, खोकडपुरा, समता नगर, समृद्धी नगर, लेबर कॉलनी, भावसिंपुरा, आणि सुराणा नगर भागात प्रत्येकी दोन तर जसवंतपुरा, संजय नगर, मुकुंदवाडी, अजिंक्य नगर, एन-4 सिडको, जय भवानी नगर, हमालवाडी, रेल्वे स्टेशन, पिसादेवी रोड, कटकट गेट, सिल्लेखाना नूतन कॉलनी, बारी कॉलनी, उल्का नगरी, सिडको एन-6 संभाजी कॉलनी, शरीफ कॉलनी, कैलास नगर, स्वप्न नगरी, गारखेडा परिसर, भवानी नगर, जुना मोंढा, पुंडलिक नगर रोड गारखेडा, तसंच विद्यानिकेतन कॉलनी या भागात प्रत्येकी एकेक, आणि अन्य भागात ३ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण शहरात यशवंत नगर इथं ३ तर सिल्लोड इथं अब्दुलशहा नगरात एक रुग्ण आढळला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १५४ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत १२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या वीस रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
सोलापूर शहरात आज सकाळी कोरोना विषाणू बाधा झालेले नवे ४० रुग्ण आढळून आले. यात महापालिकेच्या पदाधिकारी आणि त्यांचे पती तसंच शहरातल्या एका आमदारांच्या बंधूंचा समावेश आहे. शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे एक हजारहून अधिक रुग्ण झाले आहेत. यामध्ये महापालिकेचे तीन अधिकारी आणि १५ हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
****

No comments:

Post a Comment