Thursday, 18 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारत चोख प्रत्युत्तर देईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
** भारत - चीन संघर्षावर उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
** देशाची परिस्थिती आणखी सामान्य बनवून आर्थिक व्यवहार सुरु करण्याचे पंतप्रधानांचे संकेत
** राज्यात काल आणखी तीन हजार ३०७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ११४ जणांचा मृत्यू
** औरंगाबाद जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू तर १०४ नवे रुग्ण
** जालना, उस्मानाबाद, हिंगोली आणि बीडमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ
** पेट्रोल- डिझेलच्या दरात सलग अकराव्या दिवशी वाढ, पेट्रोल ५५ पैसे तर डिझेल ६० पैसे प्रतीलिटरनं महाग
आणि
** राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांनाही दरमहा मानधन, सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने लांबणीवर
****
देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही भारत चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत शांतीप्रिय देश असून, नेहमीच शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा भारताचा प्रयत्न राहिला आहे, मात्र देशावर आलेल्या संकटाला सडेतोडपणे उत्तर देण्यासही आपला देश तयार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. चीनशी परवा झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही, असं सांगून पंतप्रधानांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवला आहे. नियंत्रण रेषेवरुन दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याचा आणि संघर्ष थांबवण्याचा निर्णय सहा जूनला दोन्ही देशांच्या वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या घडामोडींचा उभय देशांमधल्या संबंधावर गंभीर परिणाम होईल, म्हणून दोन्ही देशांच्या सैन्यानं झालेल्या करारांचा सन्मान राखला पाहिजे, सीमा पाळल्या पाहिजेत, आणि त्यात बदल करण्यासाठी एकतर्फी कारवाया करु नयेत, असंही जयशंकर यांनी सांगितलं.  
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल एक बैठक घेऊन लडाखमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया आणि नौदलप्रमुख अॅरडमिरल करमवीरसिंह सहभागी झाले होते.
****
चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत प्रवेश कसा केला, आणि चिनी सैन्याच्या हल्ल्यात वीस भारतीय सैनिक कसे काय मारले गेले, याबाबत पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी, असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. चीनने भारताचा किती भाग ताब्यात घेतला आहे, आणि आता केंद्र सरकारचं याबाबत काय धोरण आहे, अशी विचारणाही गांधी यांनी केली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण देश शत्रूशी मुकाबला करण्यासाठी एकजूट होईल, तसंच काँग्रेस पक्ष या परिस्थितीत सरकार, भारतीय सैन्य, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं गांधी यांनी नमूद केलं आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या शुक्रवारी दूर दृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष भाग घेणार असून पंतप्रधान यावेळी भारत-चीन सीमेच्या परिस्थितीविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत.
****
दरम्यान, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, गृहमंत्री अमित शहा यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. देशाच्या सीमेचं रक्षण करताना दिलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी देश सदैव त्यांचा ऋणी राहील, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. चीनसोबतच्या या झटापटीत जखमी झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, असंही शहा यांनी म्हटलं आहे.
या संघर्षात एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले असून, त्यांचे पार्थिव काल त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले.
****
संयुक्त राष्ट्र परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी भारताची निवड झाली आहे. भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली. भारत आपल्या कार्यकाळात बहुपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा देण्यांचं काम करेल, असं संयुक्त राष्ट्रातले भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी म्हटलं आहे. भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे या देशांचीही सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
****
देशाची परिस्थिती आणखी सामान्य बनवून आर्थिक व्यवहार सुरु करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टाळेबंदी उठवण्याच्या दुसऱ्या टप्प्याबाबत नियोजन करण्यास सांगितलं आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासंदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत चर्चेदरम्यान, ते काल बोलत होते. काल या बैठकीत महाराष्ट्रासह कोरोना विषाणूचा प्रभाव अधिक असलेल्या १५ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. विषाणूला रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा जलद शोध घेणं आणि चाचण्यांची केंद्रं वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. अधिकाधिक नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी टेलीमेडिसीन सुविधेसाठीचा पायाभूत आराखडा विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अशासकीय संघटना आणि खासगी क्षेत्रासह सर्व संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी टाळेबंदी उठवण्याच्या पहिल्या टप्प्यात मिशन बिगिन अगेनच्या माध्यमातून राज्यात कशा प्रकारे व्यवहार सुरु करण्यात आले, याची सविस्तर माहिती दिली.  गेल्या दोन अडीच महिन्यात राज्यानं मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असतांना मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली असल्याचं ते म्हणाले.
विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धतीस मान्यता मिळावी, ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा, केंद्रानं व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा, जेणे करून सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल, आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे यावेळी केल्या. 
****
राज्यात काल आणखी तीन हजार ३०७ कोरोरना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख १६ हजार ७५२ इतकी झाली आहे. काल या आजारानं ११४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत पाच हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात एक हजार ३१५ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ५९ हजार १६६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथला ६० वर्षीय पुरुष, बायजीपुऱ्यातल्या ७५ वर्षीय पुरुष, कटकटगेट इथल्या ६५ वर्षी्य आणि जय विश्वभारती कॉलनीतल्या ५६ वर्षीय स्त्री रुग्णाचा यात समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आतापर्यंत १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी १०४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३६ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये ९२ जण शहरातले आहेत. तर ग्रामीण भागात नारेगावमध्ये तीन, पळशी, बजाज नगर आणि सिडको वाळूज महानगर इथं प्रत्येकी दोन, तर रांजणगाव, चिकलठाणा, वडगाव कोल्हाटी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार ७०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या एक हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.      
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुका व्यापारी महासंघानं उद्यापासून तीन दिवस जनता संचार बंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार तीन दिवस पूर्णपणे बंद असणार असल्याचं व्यापारी महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले. तर जालना तालुक्यातल्या जामवाडी इथल्या एका साठ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना विषाणू संसर्गामुळे काल मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या नऊ झाली असून कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या तीनशे सोळा झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. हे पाचही रुग्ण भूम इथल्या लक्ष्मी नगर इथले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या १५९ झाली आहे. त्यापैकी १२५ जण बरे झाले असून, पाच जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या २९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. केज तालुक्यातल्या माळेगाव इथळे चार, तर बीड शहरातल्या हिनान नगरमधला एक रुग्ण आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. जवळाबाजार, कळमनुरी तालुक्यातल्या टव्हा, इथला प्रत्येकी एक, तर राक्य राखीव पोलिस दलाचे दोन जवान काल बाधित आढळून आले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २३३ झाली आहे. तर काल आठ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २०० रुग्ण बरे झाले आहेत.  
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर काल चार बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत १३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी इथं काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
मुंबईत काल आणखी एक हजार ३५९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ७७ जणांचा मृत्यू झाला, पुणे जिल्ह्यात ५५० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५ जणांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात काल नवीन सात रुग्ण, भंडारा जिल्ह्यात पाच, सोलापूर १८, नाशिक ११७, सांगली ११ तर सातारा जिल्ह्यात सात नवे रुग्ण आढळले. धुळे जिल्ह्यात काल एकतीस, अहमदनगर जिल्ह्यात सहा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाले.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग अकराव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल ५५ पैसे प्रतीलिटर दर डिझेल ६० पैसे प्रतीलिटरनं महागलं आहे. सतत अकरा दिवस झालेल्या वाढीनंतर पेट्रोलच्या दरात लीटरमागे सहा रुपये दोन पैसे, तर डिझेलच्या दरात लिटरमागे सहा रुपये चार पैसे वाढ झाली आहे.
****
राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिजाऊंना अभिवादन केलं. राजमाता जिजाऊ या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मूर्ती होत्या, त्यांच्या नजरेतील स्वराज्य आणि सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबरच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात आलं आहे. लोकसंख्येनुसार एक ते दोन हजार रुपये मानधन उपसरपंचांना दिलं आहे. राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झालं आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सहकार संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. ज्या प्रकरणी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, अशा सहकारी संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा परिषद - आय सी एस ईने दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित परीक्षेच्या गुणांकनाबाबत पर्यायी आराखडा सादर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. परिषदेनं याबाबत न्यायालयात दाखल याचिकेवर उत्तर देताना, ज्या विद्यार्थ्यांना प्रलंबित परीक्षा द्यायची नसेल, त्यांना पूर्व परीक्षेच्या आधारावर गुणांकन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र या प्रस्तावामुळे मुले कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पत्करून परीक्षा देण्याचा पर्याय निवडतील, अशी भीती पालकांच्या वकिलांनी व्यक्त केली. त्यामुळे परीक्षा सरसकट रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी वकिलांनी केली आहे. त्यावर न्यायालयानं परिषदेला इतर पर्याय देण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं काल सर्वोच्च न्यायालयात बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ असं सांगितलं. सीबीएसईच्या बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहे. या संबंधातली पुढील सुनावणी २३ जूनला होणार आहे.
****
राज्यातल्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता, या ग्रामपंचायतींमध्ये सध्या जे पदाधिकारी आहेत त्यांनाच मुदतवाढ द्यावी, असा ठराव लातूर जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. लातूर इथल्या दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्या शेजारीच दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचाही पुर्णाकृती पुतळा उभा करण्याचा ठरावही या बैठकीत पारित करण्यात आला. दोन्ही नेत्यांच्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या सभेत काल आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ५७६ कोटी ७६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास सूचना आणि दुरुस्त्यांसह मान्यता देण्यात आली. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल ही सभा पार पडली. यावेळी नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी विरोधात एकमतानं ठराव पारित करण्यात आला, याला भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांनी विरोध केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या गणोरी इथं शेतकरी क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं बांधावर खत मिळावं या मागणीसाठी काल आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी फसव्या घोषणा करून दिशाभूल करत असल्याचा आरोप मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी केला. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे घेणं कठीण झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
परभणी जिल्ह्यात खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्याभावाने होणारी विक्री थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीनं पाथरीच्या तहसीलदारांना काल दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
****
हिंगोली पोलीस दलाच्या वाहतूक शाखेतर्फे टाळेबंदीच्या काळात रुग्णांना इस्पितळात ने-आण करण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. दोन मे ते पंधरा जून या काळात सहाशे ऐंशी रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. पोलिसांच्या सुविधेबद्दल हिंगोलीतील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….

पोलीस अधीक्षक योगेश कुमार वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी रुग्णांच्या सेवेसाठी ही वाहनसेवा उपलब्ध करून दिली दोन मे ते पंधरा जुन काळामध्ये हिंगोली शहर परिसरातील  ६८० रुग्णांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे या  २५२ वयोवृद्ध १६२ गर्भवती महिला इतर २६६ रुग्णाचा एकूण ६८० रुग्णांना मोफत सुविधा मिळाली आहे त्यांना आरोग्य सेवेचा लाभ त्यामुळे घेता आला पोलिसांच्या सुविधेबद्दल हिंगोलीकर यांनी आभार मानले असून पोलिसांचा सेवाभाव कायम राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आकाशवाणी बातम्यासाठी रमेश कदम हिंगोली

****
चीन हा कायम भारताला शत्रु मानत असून, कोणत्याही भारतीयाने चीनी वस्तू खरेदी करु नये, असं आवाहन शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेच्या बीड शाखेनं केलं आहे. भारतीय नागरिक फक्त थोड्या स्वस्त दरामुळे चीनी वस्तू खरेदी करुन चीनची ताकद वाढवत असल्याचं संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी म्हटलं आहे.
****
परभणी तालुक्यातल्या मौजे सोना इथं शेतकऱ्यांना वरंबा आणि सरी पद्धतीनं सोयाबीनच्या पेरणीचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं हे प्रशिक्षण देण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या योजनेच्या माध्यमातून अरुणा भूमकर या महिलेनं पिठाची गिरणी, तांदूळ निर्मिती,  तिखट, पापड, शेवया निर्मिती हा उद्योग सुरू केला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे देशभर लागू असलेल्या टाळेबंदीत गावातल्या दहा महिलांना या उद्योगामध्ये हक्काचं काम मिळालं आहे. याविषयी बोलताना अरुणा भूमकर म्हणाल्या…

लॉकडाउनच्या काळाध्ये पूर्ण देश बंद होता पण माझा उद्योग चालू होता ग्रामीण भाग असून सुध्दा पाच – पन्नास बायका येत होत्या सर्व मशिनी चालू होती, गिरणी चालू होती शेवया,पापड हे सगळं आमचं चालूच होता बायकांना पण रोजगार भेटला  माझा उद्योग पण चालू राहिला त्यांचा फायदा झाला.

****
महिला सक्षमीकरणासाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ आणि नानाजी देशमुाख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेच्या माध्यमातून गटशेतीच्या इतर महिलांनी पुढे यावं, यासाठी हा प्रकल्प दाखवण्यात येत असल्याचं तालुका कृषी अधिकारी डी. आर जाधव यांनी सांगितलं. ते म्हणाले…

उन्नत शेती समृद्ध शेतकरी याच्यातून महिला सक्षमीकरण व्हावं हा प्रकल्प आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून गटशेती या याच्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन हे कराव हे दाखवण्यासाठी आम्ही अनेक गावांमधून तिथे महिला स्वत: भेट देत आहेत आणि यांचा आदर्श घ्यावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा बंद ना पडता सहा ते सात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि याचा भविष्यात फायदा होऊन महिला सक्षम होतील.

****
परभणी जिल्ह्यातून काही वाहनधारक जादा भाडं आकारुन बेकायदा वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं असून, या वाहनचालकांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातल्या ट्रॅव्हल्स असोसिएशननं केली आहे. जिल्हाध्यक्ष महेश भुतडा यांनी काल जिल्हा प्रशासनास यासंदर्भातलं निवेदन सादर केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या शेवडी इथं बौद्ध आणि मातंग समाज स्मशानभूमीसाठी प्रत्येकी पाच लाख आणि गावातल्या विद्युतीकरणासाठी पाच लाख रुपये निधी आमदार मोहन हंबर्डे यांनी दिला आहे. या कामांचा शुभारंभ काल त्यांच्या हस्ते झाला.
****
राज्याच्या पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनं कोरोना योद्धा पुरस्कार परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथले पत्रकार बाबासाहेब गर्जे यांना देण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्याच्या कासरखेडा इथं काल मराठवाडा अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या वतीनं प्रतिकार क्षमता वाढवणारं होमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम ३० चं नागरीकांना वाटप करण्यात आलं.
****





No comments:

Post a Comment