Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
आपापल्या राज्यात
परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी परवा शनिवारी गरीब कल्याण योजनेला सुरुवात केली
जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणारी ही योजना पुढचे १२५
दिवस मिशन मोडवर चालवली जाणार आहे. बिहार, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड
आणि ओडिशा राज्यातल्या ११६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल. याअंतर्गत विविध २५
प्रकारच्या रोजगारातून सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा विकास होणं
अपेक्षित आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या
हस्ते आज देशभरातल्या ४१ कोळसा खाणींच्या लिलाव प्रकियेला प्रारंभ झाला. भारत हा कोळशाचा
सर्वात मोठा निर्यातदार व्हावा, अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. या कोळसा
खाणींमुळे सुमारे पावणे तीन लाखांवर कामगारांना रोजगार मिळणार आहे.
****
जालना
शहरातल्या लोधीमोहल्ला भागातल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा आज जिल्हा रुग्णालयात कोरोना
विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जालना जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या
मृतांची संख्या आता दहा झाली आहे. दरम्यान, शहरातल्या आणखी दहा जणांचा कोरोना विषाणू
चाचणी अहवाल बाधित आला. बाधितांमध्ये राज्य राखीव दलाच्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातल्या
कादराबाद भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण कोरोना विषाणू बाधित
रुग्णसंख्या तीनशे चोवीस झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी सत्तर कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
वाढ झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार एकशे सहा झाली आहे. यापैकी एक हजार सातशे नऊ
रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकशे सहासष्ट रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या
एक हजार दोनशे एकतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवल आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जय भवानी चौक- बजाज नगर इथं पाच, खोकडपुरा
आणि आझाद चौक या भागातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. तर लक्ष्मी कॉलनी,
जय भवानी नगर-गल्ली क्रमांक चार, एन आठ सिडको, एन नऊ सिडको, कैसर कॉलनी, नंदनवन कॉलनी,
नूतन कॉलनी, गणेश कॉलनी, बजाज नगर, इंदिरा नगर, पंढरपूर याभागात प्रत्येकी दोन कोराना
विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. तसंच घाटी हॉस्पीटल परिसर, नॅशनल कॉलनी, सिंधी कॉलनी,
पहाडसिंगपुरा, न्यू हनुमान नगर, पडेगाव, हर्सुल, जटवाडा, म्हसोबा नगर, मयूर पार्क,
महू नगर, गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा, शिवाजी नगर, गारखेडा, एन बारा, हडको, चिकलठाणा,
मिसारवाडी, गांधी नगर, मुकुंदवाडी, सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर, नागेश्वरवाडी, श्रीराम
नगर, रामेश्वर नगर, न्यू विशाल नगर, पुंडलिक नगर, स्वामी विवेकानंद नगर, हरीकृष्ण नगर,
बीड बायपास, श्रीविहान कॉलनी, शक्ती अपार्टमेंट, एमजीएम हॉस्पीटल परिसर, जाधववाडी,
नवीन मोंढा, साई नगर, सिडको, टीव्ही सेंटर, सावित्री नगर, चिकलठाणा, बन्सीलाल नगर,
औरंगपुरा, सुभाषचंद्र नगर, एन अकरा, जय भवानी नगर, गल्ली क्रमांक-एक, रामदेव नगर, सिडको
महानगर दोन तर बजाज नगर इथल्या त्रिमूर्ती चौक आणि सावरकर कॉलनी, या भागातही प्रत्येकी एक कोरोना विषाणू
बाधित रुग्ण सापडला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये एकतीस स्त्रिया आणि एकोणचाळीस पुरूष
रुग्णांचा समावेश आहे.
****
देशात गेल्या चोवीस तासात
बारा हजार आठशे एक्क्याऐंशी नवीन रुग्ण सापडले आहेत तर चौतीस जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे
देशातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या तीन लाख सदुसष्ट हजार झाली आहे, त्यामुळे
देशातले कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण त्रेपन्न टक्के झालं असल्याचं,
आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या संसर्गामुळे मृतांचा आकडा बारा हजार दोनशे
सदतीस झाला असल्यानं, मृत्यूचं प्रमाण तीन दशांश तेहेतीस टक्के इतकं झालं आहे.
कोव्हीड
-१९ च्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आता देशात नऊशे
त्रेपन्न प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या करण्यात येत असून यामध्ये सहाशे नव्याण्णव शासकीय
तर दोनशे चोपन्न खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
****
लद्दाखमध्ये
चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात वीरमरण आलेले हवालदार सुनीलकुमार यांच्या पार्थिव
देहावर आज बिहारमध्ये पाटणा जिल्ह्यात मनेर गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
आले. सैन्य दलाच्या तुकडीने यावेळी सुनीलकुमार यांना अखेरची सलामी दिली. या संघर्षात
हुतात्मा झालेल्या २० सैनिकांपैकी पाच सैनिक बिहारचे आहेत. उर्वरित चौघा सैनिकांचे
पार्थिव देह आज दुपारनंतर पाटणा इथं विमानाने आणले जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment