Sunday, 21 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानं सहाव्या जागतिक योग दिनास प्रारंभ
** सर्वपक्षीय बैठकीतल्या पंतप्रधानांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा न करण्याचं पंतप्रधान कार्यालयाचं आवाहन
** राज्यात आणखी तीन हजार ८७४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १६० रुग्णांचा मृत्यू
** औरंगाबादमध्ये दहा रुग्णांचा मृत्यू तर १२२ नवे रुग्ण
** मराठवाड्यात हिंगोली वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ
** आणि
** दशकातलं पहिलं, सूर्यग्रहण आज पहायला मिळणार
****
सहावा जागतिक योग दिन आज उत्साहात साजरा होत आहे.  ‘घरी योग: कुटुंबासोबत योग’ ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. या दिवसाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानं झाली. घरीच राहून, सुरक्षित अंतर ठेवत कुटुंबातल्या सदस्यांसोबत योग करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी आपल्या संदेशात जनतेला केलं आहे. रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यामध्ये योगची महत्त्वपूर्ण भूमिका असून यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होऊ शकते, असं पंतप्रधान म्हणाले. योगोचं महत्त्व विशद करताना पंतप्रधान म्हणाले.

अंतर्राष्ट्रीय योग दिवस का यह दिन एक प्रकार से एकजुटता का दिन यह विश्व बंधुत्व के संदेश का दिन है जो हमें जोड़े साथ लाएं वही तो योग है जो दूरियों को खत्म करें वही तो योग है कोरोना के इस संकट के दौरान दुनिया भर के लोगों का My Life My Yoga Video Blogging Competition में हिस्सा लेना इस बात को दिखाता है कि योग के प्रति उत्साह कितना बढ़ रहा है कितना व्यापक है

यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी योगच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात होतं, मात्र यावर्षी कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरी राहूनचं योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगण्यात आलं आहे.
****
भारत आणि चीन दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करू नये, असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर जमून, चिनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केला. तसं न करण्याचा इशारा देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं, असं पंतप्रधान कार्यालयानं काल सांगितलं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या कुठल्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता असून, गलवान संघर्षात, भारताच्या हद्दीत कुणी घुसखोरी केलेली नाही अथवा सैन्याची चौकीही कोणी बळकावलेली नाही, असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्याचं, पंतप्रधान कार्यालयानं नमूद केलं आहे.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग चौदाव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर ५१ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतीलिटर ६१ पैसे वाढ नोंदवण्यात आली. १४ दिवसानंतर पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे सात रुपये ६२ पैसे, तर डिझेलच्या किमतीत लिटरमागे आठ रुपये २८ पैसे वाढ झाली आहे.
****
कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या काळात घरी परतलेल्या स्थलांतरितांना रोजगार संधी निर्माण व्हावी याकरता तयार करण्यात आलेल्या गरीब कल्याण रोजगार अभियानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या योजनेकरता पंचवीस कार्यक्षेत्रं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना दिली. कामगारांना त्यांच्या घराजवळ काम मिळावं असा आपला प्रयत्न आहे, आपण आतापर्यंत शहरं विकसित करत होतात आता आपण आपल्या खेड्यांना मदत करा, असं आवाहन त्यांनी यावेळी स्थलांतरित कामगारांना केलं. ग्रामीण भागानं या विषाणूचा ज्या पद्धतीनं सामना केला तो शहरांसाठी एक मोठा धडा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
****
कोरोना विषाणूची लक्षणं असलेल्या व्यक्तींनी घरात विलगीकरणात राहण्याच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असे निर्देश केंद्रानं राज्यांना दिले आहेत. अशा व्यक्तींनी जिल्हा आरोग्य विभागाला विलगीकरणाचे सर्व निकष पाळण्याविषयीचं एक वचनपत्र देणं बंधनकारक असून घरी विलगीकरणात असतांना जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्याला वेळोवेळी तब्येतीची माहिती द्यावी असं यात म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये घरातच विलगीकरणात राहण्याच्या नियमांचं पालन केलं जात नसल्याबद्दल केंद्रानं नाराजी व्यक्त केली आहे.
****
राज्यात काल आणखी तीन हजार ८७४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख २८ हजार २०५ झाली आहे. काल या आजारानं १६० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत पाच हजार ९८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल राज्यभरात एक हजार ३८० रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ६४ हजार १५३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ५८ हजार ६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद मधे काल दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत सहा महिला आणि एका पुरुष रुग्णांचा समावेश आहे. लोटा कारंजा इथल्या 45 वर्षीय महिला, जटवाडा साइदा कॉलनीतील 55 वर्षीय, नाशिक जिल्ह्यातील येवला इथली ४८ वर्षीय, शिवाजी नगर गारखेड्यातली 55 वर्षीय, राजा बाजार परिसरातल्या 65 वर्षीय आणि रांजणगाव इथल्या 29 वर्षीय महिलेचा तसंच बेगमपुऱ्यातल्या 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहरातल्या खासगी रुग्णालयात तीन पुरुषांचा मृत्यू झाला, यामध्ये मंजुरपुरा इथल्या 59 वर्षीय, जुना बाजार इथला 52 वर्षीय, तसंच रोजा बाग इथल्या 65 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता १८७  झाली आहे. दरम्यान काल औरंगाबाद जिल्ह्यात १२२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३६० झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये ५५ महिला आणि ६७ पुरुष आहेत. यामध्ये बजाज नगर तसंच पळशी भागात सर्वाधिक प्रत्येकी सहा रुग्ण आढळले. याशिवाय पिसादेवी इथं २ आणि कन्नड इथं एक रुग्ण आढळून आला. जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार ८५७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार ३१६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात काल एकाच दिवशी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यात बीड शहरात बशीरगंजमध्ये ४ जण, झमझम कॉलनीत २, शहेनशहानगरमध्ये १ तर धारूर तालुक्यातल्या चिंचपूर इथल्या २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण १०१ बाधितांपैकी ७७ जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत तर ४ जणांचा मृत्यू झाला असून २६ जणांवर सध्या  उपचार सुरु आहेत.
*****
जालना शहराच्या आनंदनगर भागातल्या एका पासष्ट वर्षीय कोरोना विषाणू ग्रस्ताचा काल जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे झालेला हा अकरावा मृत्यू आहे. दरम्यान, जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागात काल आणखी सहा नवे रुग्ण आढळून आले त्यामुळे, जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या आता ३५९ झाली आहे. काल आढळलेले बाधित रुग्ण रहेमानगंज, देहेडकरवाडी, कुरेशी मोहल्ला, श्रीकृष्णनगर, नरिमन नगर या भागातले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. नळदुर्ग इथले पाच, तर तुळजापूर तालुक्यातल्या बोळेगाव इथले दोन रुग्ण आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १७५ झाली आहे. त्यापैकी १३१ जण बरे झाले असून, सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल पाच नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये निलंगा तसंच औसा इथल्या प्रत्येकी एक आणि लातूर शहरातल्या मोती नगर, अजिंक्य सिटी, शाम नगर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता २२६ झाली आहे. सहा रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. लातूर जिल्ह्यातून आतापर्यंत १४६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर १३ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना विलगीकरण कक्षात एकूण २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
****
नांदेड जिल्ह्यात काल कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या २३ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं काल सुटी देण्यात आली. जिल्ह्यात या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २०९ झाली आहे. दरम्यान, काल नवे ४ कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३०४ झाली आहे. नांदेड शहरातील पीरबुऱ्हाननगर भागातल्या एका रुग्णाचा काल कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. आता जिल्हयात कोरोनाविषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या चौदा झाली आहे.
****
परभणी शहरातल्या सुंदराई नगर भागात कोरोना विषाणू बाधित एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सुंदराई नगर आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं आहे. शहरातल्या  खंडोबा बाजार परिसरातही एक संशयीत रुग्ण आढळला असून ती व्यक्ती पुण्याहून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. यामुळं जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ९६ झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवीन बाधित रुग्ण आढळला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली दाखल असलेल्या ९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २३८ रुग्ण आढळले असून त्यापैकी २१० रुग्ण बरे झाले आहेत तर २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात काल ६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले, यामध्ये संगमनेर तालुक्यातल्या ०३, पारनेर तालुक्यातल्या दोन आणि अहमदनगर शहरातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या २८२ झाली असून आतापर्यंत उपचारानंतर २३७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
नाशिक मध्ये काल ५ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामुळे नाशिकमधल्या मृतांचा आकडा ५६ झाला आहे. शहरातली कोरोना विषाणुमुळे होणाऱ्या बळींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक महापालिकेने कृती दल नेमलं असल्याची माहिती  नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.
दरम्यान, नाशिक इथं काल कोरोना विषाणूचे ४९ नवे रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार १०१ झाली आहे.
****
वाशिम जिल्ह्यात काल ८ जणांचा कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ५८ झाली आहे.
****
सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात ७ नवीन कोरोना विषाणू बाधितांची भर पडली आहे. यामुळे सांगलीतल्या एकूण बाधितांची संख्या २८६ झाली आहे.
****
राज्यात ऑक्सिजनअभावी होणारे कोरोना विषाणू बाधित रूग्णांचे मृत्यू आणि एकूण मृत्यूसंख्या दाखवण्यात अद्यापही पारदर्शकतेचा अभाव असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं सांगत याकडे लक्ष वेधण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यात तातडीनं लक्ष घालून पारदर्शी माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
****
औरंगाबाद इथं बुढीलेन परिसरातल्या जामा मशिदीत कोविड विलगीकरण केंद्र कालपासून सुरू करण्यात आलं आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली. मशीद परिसरात विलगीकरण करण्यासाठी आवश्यक खोल्या, पाणी, शौचालय, मोकळा परिसर इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. समर्थनगर परिसरातल्या अकरा संशयितांना याठिकाणी ठेवण्यात आलं असून मशीद समिती या कामात सहकार्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 
****
या दशकातलं पहिलं, सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण आज पहायला मिळणार आहे. भारतातल्या फक्त उत्तर भागात हे कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल, तर उर्वरित भागात ते खंडग्रास दिसेल. आज सकाळी सुमारे १०  वाजून १ मिनीटांनी सूर्यग्रहणाला सुरूवात होणार असून ११ वाजून ३८ मिनीटांनी ग्रहणमध्य असेल कालावधीत सूर्याचा अंदाजे ७० टक्के भाग चंद्राने व्यापलेला असेल. दुपारी १ वाजून २८ मिनीटांनी ग्रहण पुर्णपणे सुटेल. देशात आजनंतर थेट ११ वर्षांनी म्हणजे २०३१ मध्ये सूर्य ग्रहण दिसणार आहे.
***
परभणी जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या परभणीसह पूर्णा, मानवत, सेलू, पालम, जिंतूर, पाथरी, गंगाखेड तसंच सोनपेठ तालुक्यात काल रात्री तासभर मुसळधार पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या कापडसिंगी इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मुत्यू झाला. उकंडी कुंडलिक गिऱ्हे हे शेतात पेरणी करत असताना काल सायंकाळी त्यांच्या अंगावर वीज पडली. या घटनेत एक बैलही दगावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी शिवारात ओढ्यात वाहून गेलेल्या वृध्द दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह काल सापडला. असोलवाडीचे हे पती-पत्नी शुक्रवारी ओढ्याच्या प्रवाहात बैलगाडीसह वाहून गेले होते. कुंडलीक असोले आणि ध्रुपदाबाई असोले अशी या दोघांची नावं असून कुंडलीक असोले यांचा काल सायंकाळपर्यंत शोध लागला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे सादर केलं. लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना मान्यताप्राप्त बियाण्यांच्या कंपन्यांची उगवण क्षमता नसलेले बियाणे विकल्याचं निदर्शनास आलं. शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही पवार यांनी केली आहे. याचबरोबर दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि खत कृषी विभागाने मोफत उपलब्ध करून द्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात कालपासून तीन दिवसांसाठी जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तालुक्यातल्या मदनसुरी इथं एका कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी हा निर्णय घेतला आहे. हा रुग्ण शहरात अनेकांच्या संपर्कात आला होता त्यामुळे ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या रुग्णावर उपचार केलेल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर, परिचारिकांसह ३६ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती निलंगा इथले उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली. शहरातल्या नागरिकांनी विनाकारण फिरु नये, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी मास्क, निर्जंतुकीकरण औषधाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
जालना जिल्हा परिषद शाळांमधल्या पाच हजार ९११ शिक्षकांनी एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिलं आहे. या मदतीचा एक कोटी पाच लाख २३ हजार रुपये निधी काल एसबीआय सीएमपी प्रणालीच्या माध्यमातून एका क्लिकद्वारे मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्यात आला. राज्यात या प्रणालीचा वापर करून अशा प्रकारे ऑनलाईन मदत निधी हस्तांतरित करण्याचा पहिला आणि एकमेव प्रयोग जालना जिल्हा परिषदेनं केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली.
****
लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेतर्फे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला आहे. संस्थेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी यासाठी आपलं दोन दिवसांचं वेतन दिलं आहे.
****
योग हा फक्त एकाच दिवसापुरता मर्यादित न राहता, तो आपल्या जीवनशैलीचा भाग व्हावा, असं आवाहन औरंगाबाद इथल्या योगतज्ज्ञ डॉ चारुलता रोजेकर यांनी केलं आहे. आजच्या जागतिक योगदिनानिमित्तानं आकाशवाणीशी बोलताना, त्यांनी ताणतणाव दूर करण्यासाठी योग महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या ...

सध्याचे युग हे तणावाचे युग आहे आणि या तणावजन्य या स्थितीमध्ये मानसिक शारीरिक आणि भावनिक संतुलन या दृष्टीने योग्य अभ्यास सांगितला जातो योगाभ्यासामुळे तीन महत्त्वाच्या बाबी असतात शारीरिक सामर्थ्य वाढवून मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवलं आणि भावनिक संतुलन व्यवस्थित ठेवणे आसन,प्राणायाम, ध्यान यातील महत्त्वाच्या पायऱ्या आहे योगदिन फक्त एकच दिवस न साजरा करतात हा जीवन शैलीचा दर भाग बनला तर आपल्या बऱ्याचशा समस्या नियंत्रणात येऊ शकतील म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे आपण आपली जीवनशैली बनवावी
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब शहरात राहणारे शशीकुमार भातलवंडे अंध असून गेल्या पंधरावर्षांपासून प्राणायाम योगशिक्षक म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोनशे शिबीरांमधून अनेक नागरिक तसंच विद्यार्थ्यांना योगाचं शिक्षण दिलं आहे. त्यांच्या या कार्याविषयी आमच्या वार्ताहरानं दिलेली ही माहिती…..
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब शहरात राहणारे शशिकुमार बाळकृष्ण भातलवंडे हे अंध असून देखील मागील पंधरा वर्षांपासून प्राणायाम योग शिक्षक म्हणून काम करत आहेत शशिकुमार भातलवंडे यांनी आजपर्यंत 200 प्राणायाम शिबिरातून पाच लाख लोकांना आणि दोन लाख विद्यार्थ्यांना एक योग्य शिक्षण दिले आहे दहा हजार जणांना विविध व्यसनापासून मुक्त ही केला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ही त्यांनी योग शिबिर घेऊन शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद
****
नांदेड जिल्ह्याने मागील वर्षी कर्करोग जागरूकता आणि नियंत्रण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल शासन स्तरावरील राष्ट्रीय रौप्यपदक नांदेड जिल्ह्यास प्राप्त झालं आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात कर्करोग जागरूकता आणि नियंत्रण मोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातल्या बाराशे गावांचा समावेश करण्यात आला होता. आणि जिल्ह्यातल्या २५ लाख लोकांची कर्करोग तपासणी करण्यात आली होती.
****
औरंगाबाद शहरातल्या जयभवानी नगर इथं नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं असून, खासदार इम्तियाज जलिल यांनी काल या भागाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. गेल्या चार वर्षांपासून या भागातल्या नागरिकांना या समस्येला सामोरे जावं लागत आहे. जलील यांनी शहर अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचं पथक या भागात पाठवलं असून, तातडीने काम सुरु करण्यात आलं.
****
चीनच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांना काल परभणी इथं शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना शहर शाखेच्यावतीनं शहरातल्या शिवाजी चौकात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला, नागरिकांनीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं.
****
गेल्या १३ दिवसांपासून दररोज होत असलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात औरंगाबाद शहरातल्या पैठण दरवाजा इथं काल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सरकारनं ही दरवाढ त्वरित मागे घेऊन जनतेला न्याय द्यावा, भारत चीन सीमेवर झालेल्या विवादाचा तोडगा काढावा, आदी या मागण्यांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. 
****


No comments:

Post a Comment