Friday, 19 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.06.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 June 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०२० सायंकाळी ६.००

****

·      कोविड संसर्ग चाचणीसाठी देशभरात समान चाचणी शुल्क असावं - सर्वोच्च न्यायालय.

·      सर्व राज्यांनी कोविड प्रतिबंधासाठी कर्नाटकच्या उपाययोजनांचा अवलंब करण्याची सूचना.

·      देशात नवीन कोविडग्रस्तांच्या संख्येचा उच्चांक; रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही सुमारे ५४ टक्के.

·      औरंगाबाद जिल्ह्यात नव्या १०८ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या तीन हजार २२४ वर.

आणि

·      जालना शहर व्यापारी महासंघाकडून आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यूचं आवाहन.

****

कोविड संसर्ग चाचणीसाठी देशभरात समान चाचणी शुल्क असावं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यागणिक भिन्न चाचणी शुल्क असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. काही राज्यात या चाचणीसाठी दोन हजार दोनशे रुपये तर काही राज्यात साडे चार हजार रुपये शुल्क आकारलं जातं, या प्रकरणी केंद्र सरकारने लक्ष घालावं, असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबत आपला निर्णय नंतर देणार असल्याचं म्हटलं आहे. देशभरात सध्या ७०३ सरकारी आणि २५७ खासगी अशा एकूण ९६० प्रयोगशाळांमधून कोविड संसर्गाची चाचणी केली जाते.

दरम्यान, कोविडग्रस्तांच्या देखभालीवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांचं पथक नियुक्त करण्याचे तसंच रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले जाण्याचे संकेत न्यायालयानं दिले आहेत. रुग्णांच्या योग्य व्यवस्थापनाची खात्री करून घेण्याच्या सूचना न्यायालयानं महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

****

राज्यात कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांची संख्या शंभर झाली असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. चाचणी प्रयोगशाळांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.

****

कोविड संक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचा सर्व राज्यांनी अवलंब करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. यामध्ये कोविडग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा सर्वसमावेशक तपास आणि प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश आहे. प्रत्येक रुग्णाच्या संपर्काचा प्रभावी माग काढणं, हा उपाय कोविड संसर्गाला योग्य प्रतिबंध करू शकतो, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

देशात आज नवीन कोविडग्रस्तांच्या संख्येनं उच्चांक गाठला. आज संपूर्ण देशात १३ हजार ५८६ नवे कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण आढळले, त्यामुळे देशातल्या या रुग्णांची संख्या आता तीन लाख ऐंशी हजार ५३२ झाली आहे. यापैकी दोन लाख चार हजार ७११ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, त्यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५३ पूर्णांक ८० शतांश टक्के एवढं झालं आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत १२ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण मृत्यू दराचं प्रमाण तीन पूर्णांक तीस शतांश टक्के झालं आहे. सध्या देशभरात एक लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

पुण्यात कोविडग्रस्तांची संख्या १३ हजार ७५० वर पोहोचली आहे. आज पुण्यात या संसर्गाचे ५१५ नवे रुग्ण आढळले. तर बारा रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात या आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५५२ झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात १०८ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या तीन हजार २२४ झाली आहे. आज दुपारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पाच रुग्ण, उस्मानपुरा इथले तीन रुग्ण, बजाज नगरचे दोन तर एसबी नगर, अहिंसा नगर, अंगुरी बाग, जहाँगीर कॉलनी, लोटा कारंजा, फुलंब्री तालुक्यातील खामगाव आणि सिल्लोडच्या झाकीर हुसेन कॉलनी इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. आतापर्यंत एक हजार ७५३ रुग्ण उपचार घेवून घरी गेले आहेत. तर १७० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात आज नव्याने एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २९७ झाली आहे. त्यापैकी १८६ रूग्ण बरे झाले आहेत तर १३ रुग्ण कोरोना विषाणू बाधेमुळे मृत्यू पावले आहेत. सध्या ९८ रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.

****

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज बारा जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं स्पष्ट झालं. तर वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड इथंही आणखी तीन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे.

****

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ बी पी आर विठ्ठल यांचं आज हैदराबाद इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. दहाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहिलेल्या विठ्ठल यांनी आंध्र प्रदेश राज्याचे वित्त आणि नियोजन सचिव या पदासह अनेक पदांवर काम केलं. जागतिक नाणे निधीमार्फत त्यांनी सुदान तसंच मलावी या देशांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

****

टाळेबंदी नंतरच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आणि योग्य ती खबरदारी घेऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षाचं नियोजन करणे गरजेचं असल्याचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या सर्व नवनियुक्त संविधानिक अधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आगामी वर्षात प्रवेश प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत शैक्षणिक दिनदर्शिका तयार करण्यात येईल. कोणी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पीएचडीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागा, विद्यार्थी संख्या याचा आढावा घेऊनच प्रवेशपूर्व परीक्षा - पेट घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

जालना शहरात कोरोना विषाणूसंसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापारी महासंघाच्या वतीनं शहरात आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनास प्रतिसाद देत बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. बाजारसमिती मधला भुसार आणि किराणा बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, औषधी आणि कृषी साहित्याची दुकानं सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात मागील आठवडा भरापासून रहदारीला अडथळा ठरणारी तसंच नागरिकांची गर्दी होत असलेल्या भागातली अतिक्रमणं हटवण्यात येत आहे. आज शहरातल्या फुलबाजार, कपडा बाजार परिसरातल्या मुख्य रस्त्यांवर स्थानिक व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणं नगरपालिकेच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली.

****

उस्मानाबाद इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीनं प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे, या संपूर्ण प्रकरणाची सक्तवसुली संचालनालया मार्फत चौकशी करावी आणि दोषींवर भ्रष्टाचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही ठाकूर यांनी उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत केली.

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बाजरी बियाण्याचं मोफत वाटप करण्यात आलं. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आमदार चव्हाण यांनी बाजरी बियाण्यांचं वाटप केलं. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी गावंडे उपस्थिती होते.

****

नांदेड जिल्ह्यात कोणीही अन्न धान्यावाचून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे. त्यासाठी तालुकानिहाय समतोल आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. यासाठी लागणाऱ्या अन्न-धान्याचा मुबलक प्रमाणात जो पुरवठा शासनातर्फे झाला आहे, त्याची गुणवत्ता टिकून राहण्याकरीता गोदाम व्यवस्थाही अधिक परिपूर्ण करावी असंही ते म्हणाले.

****

No comments:

Post a Comment