Wednesday, 22 July 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22 JULY 2020 TIME 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
** औरंगाबाद जिल्ह्यात आज १०३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ
** परभणी जिल्ह्यात आज नवे ६ रुग्ण कोविड बाधित तर दोन रुग्णांचा मृत्यू
** उस्मानाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात कोविड -19 विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू
आणि
** जालना इथं चार अवैध पिस्तुलं जप्त; चौघे संशयित ताब्यात
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात १०३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये महापालिका हद्दीतल्या ५९ रुग्णांचा, ग्रामीण भागातल्या ३७ रुग्णांचा आणि शहराच्या प्रवेश नाक्यावरील तपासणीत आढळलेल्या सात रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ११ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित पाच रुग्णांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामध्ये कन्नड इथला ७८ वर्षीय पुरुष, रामनगर इथल्या ४२ वर्षीय पुरुष, शिवेनरी कॉलनीतल्या ६५ वर्षीय पुरुष, उमाजी कॉलनीतली ६५ वर्षीय महिला, तसंच पडेगाव इथल्या ५५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ४११ झाली आहे. तर सहा हजार ४९७ रुग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. आणि चार हजार ८६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आज अकरा जणांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानं सुटी देण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात आज नवे ६ रुग्ण कोविड बाधित आढळले. तर दोन रुग्णांचा आज कोविड संसर्गाने मृत्यू झाला. यामध्ये परभणी शहरातल्या इकबाल नगरातल्या ७५ वर्षीय पुरुषाचा तसंच पूर्णा शहरातल्या ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सोळा रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ४५४ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २०४ जण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून सध्या २३८ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद इथं आजपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात कोविड -19 विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात कोविड विषाणू तपासणी सोबतच स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू आणि इतरही विषाणूजन्य आजारांची तपासणी आणि संशोधनास मदत होणार आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्हाच्या उमरगा शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या आदेशानुसार शनिवार २५ जुलैपासून १ ऑगस्ट पर्यंत जनता संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. या दरम्यान उमरगा शहरात तालुक्यातल्या किंवा बाहेरगावच्या कोणत्याही व्यक्तीस येण्यास मज्जाव केला जाणार आहे. या कालावधीत दूध विक्रेते आणि रुग्णालयास संलग्न असलेली औषधी दुकाने चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर शहरात परवा शुक्रवारीन २४ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत शंभरटक्के टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. या दरम्यान फक्त रुग्णालयालगतची औषधी दुकानं आणि काही अटींवर दूधविक्री सुरू राहणार आहे.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या नियमित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास व्यवस्थापन परिषदेनं मान्यता दिली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. यासाठी दरवर्षी पंधरा लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यापीठाच्या वर्ग १ च्या अधिकाऱ्यांकडून दरमहा ३०० रुपये, वर्ग २ आणि वर्ग ३च्या कर्मचाऱ्यांकडून दरमहा २०० रुपये तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून दरमहा शंभर रुपये घेण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध आजारांसाठी तीन लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळणार आहे.
****
जालना पोलिसांनी आज धडक कारवाई करत चार संशयितांच्या ताब्यातून चार गावठी पिस्तुलं ताब्यात घेतली. परमेश्वर अंभोरे, गणेश काकडे, कृष्णा सलामपुरे आणि रामदास मिसाळ, अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे, एक कार असा एकूण सात लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध सुगंधी सुपारीचा साठा आज सांगली जिल्ह्यात मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. सांगली जिल्ह्यातील बेडग रोड इथं एका कंटेनर मधून हा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपये असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीला सामोरंजाण्यासाठी “कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाचा” आराखडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर उस्मानाबाद इथल्या व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर इथल्या व्यवस्थापन संकुलाचे डॉ. हनुमंत पाटील यांनी तयार केला आहे. हा आराखडा कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचा असून पेटेंट साठी मुंबई इथल्या भारतीय पेटेंट कार्यालयात सादर करण्यात आला असल्याचं विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्रता यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण विनाविलंब पूर्ण करून घ्यावं, असं आवाहन जालन्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या १६ हजार ९८७ शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप अपूर्ण असून, तीन हजार २८४ शेतकऱ्यांनी कर्जमाफी संदर्भात ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या आहेत. यापैकी दोन हजार १९ तक्रारींचा निपटारा जिल्हा समितीनं पूर्ण केला असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या एक लाख २४ हजार ६२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची ८५३ कोटी ४८ लाख रुपयांची लाभ रक्कम जमा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यातील ३० हजार २१७ शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने या योजनेचा लाभ मिळण्यासाठी या शेतकर्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक असल्याचं आवाहन परभणीच्या जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधकांनी केलं आहे.
****
अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी प्रक्रिया राबवावी; तसंच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणं महिनाभरात निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. आज मुंबईत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकत त्या बोलत होत्या.
****
बीड जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात किरकोळ मद्य विक्री, वाईन शॉप, परमिट रुम, बीअर शॉपी, आणि देशी दारु किरकोळ विक्री दुकानांना सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत सीलबंद बाटलीतून मद्याची विक्री करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. परमिटरूम - परवानाकक्ष धारकांना नवीन मद्य साठा घेण्यास तसंच लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत सीलबंद बाटलीतून मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्याची विक्री करतांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अनुज्ञप्ती धारकाची राहील. आणि नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
****
जालना-अंबड मार्गावर शेवगा इथं आज दुपारी भरधाव दुचाकी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. शुभम रामेश्वर साबळे मृत तरुणाचं नाव असून, तो भोकदरन तालुक्यातल्या लोणगाव इथला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
****
नांदेड शहरानजीकच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयातून आज दुपारपासून ४७२ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्याची ही तिसरी वेळ असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोन्याच्या दराने आज नवीन उच्चांक नोंदवला. दिल्लीत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर ५० हजार ९२० रुपये नोंदवला गेला. चांदीच्या दरातही किलोमागे सुमारे अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन आजचा दर ६० हजार ४०० रुपये किलोवर पोहोचल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.
****
नियंत्रक आणि महालेखा परीक्षक - सीएजी ही एक सक्षम आणि विश्वासार्ह संस्था आहे, आणि याचं श्रेय घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जातं, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
****


No comments:

Post a Comment