Saturday, 1 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.08.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा स्थगित करण्यासंदर्भात अंतरिम निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.

·      प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा राज्यसरकारचा निर्णय.

·      औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा कोविडग्रस्तांचा मृत्यू.

·      लातूर आणि उस्मानाबाद इथं प्रत्येकी पाच, जालना आणि नांदेड इथं प्रत्येकी तीन, बीड दोन तर परभणी आणि हिंगोली इथं प्रत्येकी एका रुग्णाचं निधन.

·      लातूर शहर आणि परिसरात १५ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी; परभणी जिल्हा प्रवेशासाठीचे ई परवाने १५ ऑगस्ट पर्यंत स्थगित.

·      लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं ऑनलाईन व्याख्यानं आणि वेबिनारच्या माध्यमातून अभिवादन.

आणि

·      आज बकरी ईद; घरी नमाज अदा करुन, प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचं राज्य सरकारचं आवाहन.

****

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा स्थगित करण्याच्या याचिकांवर अंतरिम निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह विभागानं आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय हाताळत असल्यामुळे, सप्टेंबरमध्ये नियोजित परीक्षा स्थगित होतील, या संभ्रमात कोणीही राहू नये, असं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १० ऑगस्टला होणार आहे.

****

मुंबई वगळता इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, स्ट्रेस फंडाची निर्मिती, तसंच राज्यातल्या प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तब्बल पाच वर्षानंतर या प्राधिकरणाची बैठक झाली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण राज्य मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

****

राज्यात काल आणखी १० हजार ३०२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख २२ हजार ११८ झाली आहे. काल २६५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १४ हजार ९९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सात हजार ५४३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात कालपर्यंत दोन लाख ५६ हजार १५८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५० हजार ९६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत २१ लाख ३० हजार ९८ चाचण्या करण्यात आल्या.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २८१ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १४ हजार १२३ झाली आहे. तर काल २३१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार १९२ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन हजार ४५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, औरंगाबाद शहरात आजपासून सर्व दुकानं सकाळी ९ ते सायंकाळी सात या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. चित्रपटगृहं, प्रेक्षागृहं, उपाहारगृहं मात्र उघडता येणार नाहीत. उपाहारगृहांना घरपोहोच सेवा मात्र सुरु ठेवता येणार आहे. वाहनांबाबतही काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर काल आणखी १२१ बाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी ४५ जण हे अँटिजेन चाचणीतून बाधित आढळले. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत एक हजार २५६ रुग्ण बरे झाले असून, ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात सध्या ७७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यात काल पाच कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर १७४ नवे रुग्ण आढळले. मृतांपैकी तीन उस्मानाबाद शहरातले, तर उस्मानाबाद तसंच कळंब जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५१४ रुग्ण आतापर्यंत कोविड संसर्गातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ६०० रुग्णांवर सध्या जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

जालना जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवे ६२ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या दोन हजार १८२ झाली आहे. काल ५४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ४५४ रुग्ण बरे झाले असून, ७० जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यात सध्या ६६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उभनलाल यादव यांचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी १५४ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये आयटीपीसीआर चाचणीत ११८, तर अँटिजेन चाचणीत ३६ बाधित आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत ८८७ रुग्ण बरे झाले असून, सध्या ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या दोन कोविडग्रस्तांचा काल मृत्यू झाला, यापैकी एका रुग्णावर बीड इथं तर दुसऱ्या रुग्णावर औरंगाबाद इथं उपचार सुरू होते. त्यामुळे जिल्ह्यातली मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात काल नवे ५० रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७६३ झाली आहे.

****

परभणी जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. तर आणखी १८ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून, ३९० रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या २०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

हिंगोली इथं काल एका ८० वर्षीय पुरुषाचा कोविड संसर्गाने मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृतांची संख्या आठ झाली आहे. जिल्ह्यात काल नवे ५६ रुग्ण आढळून आले, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ६५४ झाली आहे. त्यापैकी ४३५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड विषाणू संसर्गाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:च्या घरी राहून उपचार घेता येतील, असं पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या तपासण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून, त्यासाठी दहा हजार रॅपिड अँटिजेन किट्स लवकरच जिल्ह्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

****

लातूर शहर आणि परिसरातल्या २० गावांमध्ये आजपासून १५ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. जुलै महिन्यात लागू केलेल्या टाळेबंदीतले नियम या टाळेबंदीत लागू असतील, असं या आदेशात म्हटलं आहे. लातूर शहरात सार्वजनिक, खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो यांना बंदी घालण्यात आली आहे. 

दरम्यान, लातूर व्यापारी महासंघानं या टाळेबंदीला विरोध केला आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात, लातूर जिल्ह्यातले व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यक्ती किंवा वाहनांना जिल्ह्यात येण्यासाठी दिलेले ई परवाने १५ ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. वैद्यकीय तातडीच्या कारणाची खात्री झाल्यास सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातली रहिवाशी असल्याचा परवाना द्यावा, असं या आदेशात म्हटलं आहे. यातून मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांना सूट असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात टाळेबंदीमुळे बंद असलेल्या सर्व आस्थापना, प्रतिबंधित उद्योग या सर्वांना आजपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अटी तसंच नियमांच्या अधीन राहून कामकाज सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यातली क्रीडा मैदानं, क्रीडा संकुलं तसंच सार्वजनिक खुले मैदाने वैयक्तिक व्यायामाकरिता चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

****

औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बालरोग विभागाला ६० लाख रुपये किंमतीचे पाच व्हेंटिलेटर दिले आहेत. घाटीमधे लहान मुलांचे आतापर्यंत फक्त तीनच व्हेंटिलेटर होते. त्यामुळे अनेक अत्यवस्थ बाल रुग्णांना उपचार सुरु होण्यास विलंब झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याअनुषंगानं जिल्ह्यातल्या वैद्यकीय सेवेसाठी स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली होती. त्यानिधीतून हे व्हेंटीलेटर देण्यात आले.

****

देशातले पाच टक्के लोक हे कोरोना विषाणू संसर्गाच्या गंभीर स्थितीत आहेत. त्यामुळे इतर जनतेला वेठीस धरणं अयोग्य असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शासनाच्या अहवालानुसार ८० टक्के लोकांमध्ये कोविड प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. उर्वरित २० टक्क्यांपैकी १५ टक्के लोकांना लक्षणे दिसू शकतात, तर पाच टक्के लोक हे गंभीर स्थितीत आहेत. त्यांच्यावर शासनानं लक्ष केंद्रीत करावं असं ते यावेळी म्हणाले. टाळेबंदी अमान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

माजी केंद्रीय गृह सचिव आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना राम प्रधान यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केलं. त्यावेळी आसाम करार आणि मिझोराम शांती करार घडवून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

****

लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व्याख्यानं आणि वेबिनारच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे काल ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉक्टर विजय चोरमारे यांनी यावेळी केलेल्या व्याख्यानात अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेलं असून अण्णाभाऊंनी ग्राम संस्कृती सोबतच गावकुसाबाहेरच्या भटक्या, वंचित लोकांचं कष्टमय जगणं पहिल्यांदाच साहित्यात आणल्याचं सांगितलं.

****

ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण आज साजरा होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा बकरी ईद साधेपणानं, घरीच नमाज अदा करुन, प्रतिकात्मक कुर्बानी देऊन साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण साजरा करताना सेवाकार्य तसंच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

दरम्यान, बकरी ईद निमित्त आज शासकीय सुटी असल्यानं औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद राहील, तर उद्या रविवारी सुरु राहील, असं वैद्यकीय अधिक्षकांनी कळवलं आहे.

****

औरंगाबाद नजिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीतल्या नाथनगर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा काल बुडून मृत्यू झाला. पाचही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमक विभागानं दिली.

****

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी आणि उप बाजारपेठ करमाड इथल्या विविध विकास कामांचं आणि जाधववाडी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काल झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण करतांना, महापुरुषांचे पुतळे हे सर्वांना प्रेरणा देण्याचं कार्य करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

****

हिंगोली इथं रेल्वे विभागाच्या मोकळ्या जागेत केंद्र सरकारच्या अन्न पुरवठा विभागाकडून ५० लाख मेट्रीक टन क्षमतेच्या गोदाम बांधण्याला अन्न महामंडळाची मान्यता मिळाली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी काल हिंगोली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. या गोदामाचा हिंगोलीसह नांदेड, वाशिम, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या ताड बोरगाव जवळ दोन मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला. काल दुपारी ही घटना घडली.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवून त्यावर उपाय योजना करण्याच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक स्थापन केलं आहे. हे पथक कोविड-१९ च्या रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सोई-सुविधा, स्वच्छता विषयक बाबी, डॉक्टर, नर्स, रुग्णांच्या समस्या आदी पडताळून पाहण्याचं काम करणार आहे.

****

साळी समाजाचे आद्यपुरुष जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव आज साजरा होत आहे. प्रत्येक साळी समाज बांधवांनी आपापल्या घरातच हा जन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन जिव्हेश्वर मंदिर आणि मंगल कार्यालय ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी केलं आहे. 

****

परभणी महानगरपालिकेनं घरपट्टी आणि नळपट्टी शास्ती भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चानं महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. टाळेबंदीमुळे व्यापारी वर्गाला, छोट्या व्यवसायिकांना तसंच नागरीकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असल्यानं ही मुदतवाढ द्यावी, असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात पाळीव जनावरांना त्वचेच्या लंफी स्किन नावाच्या रोगाची लागण झाली आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

****

आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक मंगेश वाघमारे काल ३४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. डिसेंबर २०१७ मध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावरून औरंगाबाद इथं ते बदलून आले होते. काल आकाशवाणी केंद्रातून त्यांना निरोप देण्यात आला.

****

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातल्या माणिक दौंडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने बारामती-औरंगाबाद राज्य महामार्गावरचा निर्माणाधीन पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या रसत्यावरची वाहतूक बंद झाली आहे.

****

औरंगाबाद शहर परिसरात मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहराच्या अनेक भागातला विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता.

****

सोन्याच्या दरात काल प्रतितोळा ६८७ रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो दोन हजार ८५४ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा ५४ हजार ५३८ रुपये तर चांदीचा दर प्रतिकिलो ६५ हजार ९१० रुपये झाला आहे.

****

No comments:

Post a Comment