Tuesday, 21 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.07.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात कोविड-19 आजाराचे रुग्ण बरे होण्याचा दर ६२ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांवर पोहोचला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत ७ लाख २४ हजार ५७८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत २४ हजार ४९२ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातला मृत्यूदरही कमी झाला असून तो आता दोन पूर्णांक ४३ दशांश झाला आहे. काल देशभरात ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल दिवसभरात देशात ३७ हजार १४८ कोरोनाविषाणू बाधितांची नोंद झाली त्यामुळे देशातल्या कोविड १९ च्या रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ५५ हजार १९१ वर पोहाचली आहे.
दरम्यान, भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारा मृत्यूदर अमेरिका आणि युरोपाच्या तुलनेत कमी असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. एका ट्वीट संदेशात त्यांनी ही बाब नमूद केली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज सकाळी १७९ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या ११ हजार ४२० झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतल्या १२३ रुग्णांचा, ग्रामीण भागातल्या ४६ रुग्णांचा आणि नाक्यांवरील चाचणीत आढळलेल्या १० रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६ हजार ३०० रुग्ण कोराना विषाणूमुक्त झाले असून ४ हजार ७२० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात २० कोरोना विषाणूबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ५७३ झाली आहे. त्यापैकी ३३८ जण या आजारातून बरे झाले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोविड संसर्गाचे दोन हजार ६०१ रुग्ण आढळले. पुण्यात एका दिवसातली ही सर्वाधिक रुग्ण संख्यावाढ आहे. पुणे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या आता ५४ हजार १३ झाली आहे.
****
दूध दराच्या मागणीबाबत भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला कोणतंही निवेदन मिळालेलं नाही, असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या संदर्भात आज दुपारी मंत्रालयात बैठक होणार असून, या बैठकीत सर्व मागण्या समजून घेणार असल्याचं, केदार यांनी सांगितलं. रस्त्यावर दूध ओतून देणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
दरम्यान, राज्यात आज ठिकठिकाणी दूध आंदोलन करण्यात आलं.
सोलापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाविकास आघाडीचा निषेध नोंदवण्यात आला. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे इथं जनावरांना दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध नोंदवला़.
अंबाड येथे एका डेअरीनं, दूध न घेण्याची विनंती केल्यानंतरही दूध खरेदी केल्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. माळशिरस तालुक्यातल्या वेळापूर इथं ग्रामदैवताला दुधाने अभिषेक घालून उरलेल्या दुधाने शेळ्या-मेंढ्यांना आंघोळ घालण्यात आली.
लातूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं दूध आंदोलनाचा भाग म्हणून तांदुळजा इथल्या ग्रामदैवतेला दुधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, प्रदेशउपाध्यक्ष सत्तार पटेल उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहूरी तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दगडला दुग्धभिषेक करून आंदोलन करण्यात आलं.
****
प्रसिद्ध शायर शम्स जाल्हनवी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी जुना जालना परिसरातल्या कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. जाल्हनवी यांचं आज पहाटे जालन्यात इथं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. फाळणीपूर्वी लाहोर इथल्या महाविद्यालयातून शायरीची पदवी संपादन केलेले जाल्हनवी यांनी देशभरात अनेक मुशायरे तसंच साहित्य संमेलनांमधून आपल्या गजल सादर करून रसिकांची मनं जिंकली होती. चरितार्थासाठी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे जाल्हनवी यांना जालना शहरातल्या विविध सामाजिक संस्थांसह नामवंत शायर आणि समीक्षकांनी अनेक पुरस्कार आणि पदव्यांनी सन्मानित केलं होतं. आपल्या रचनांमधून जीवनाचं वास्तव सादर करणाऱ्या जाल्हनवी यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरून काल रात्री पूर्णा निजामाबाद ही नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाची १०१ डब्यांची जम्बो मालगाडी धावली. या मालगाडीला समोर दोन तर गाडीच्या मधोमध अन्य दोन असे चार रेल्वे इंजिन लावण्यात आले होते.
****
मराठवाड्यात आज सकाळपासून पावसानं जोर धरला आहे. जालना शहरासह जिल्ह्यात अंबड तसंच बदनापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात सकाळी चांगला पाऊस झाला.
बीड जिल्ह्यात सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्याने पावसाची पन्नास टक्के सरासरी ओलांडली आहे.
नांदेड जिल्ह्यात आज सकाळपर्यंत ८० महसूल मंडळापैकी ३७ महसुली मंडळात पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील वडी शिवारात सोमेश्वर नदीला पूर आल्यानं अनेक गांवाचा संपर्क तुटला आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे.
****

No comments:

Post a Comment