Thursday, 23 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.07.2020....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४७ साली या दिवशी नवी दिल्लीतल्या आकाशवाणीच्या स्टुडिओतून जनतेला संबोधित केलं होतं. आजच्या प्रसारण दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १०१ रुग्णांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित असल्याचे आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोविडग्रस्तांची एकूण संख्या १२ हजार १२६ झाले आहेत. त्यापैकी ६ हजार ६९० रुग्ण बरे झाले आहेत, तर ४१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
परभणी इथे आज एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या महिलेस काल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं
****
सांगली जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन सुरु झाले असून सर्व दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, वाहतुक, किराणा दुकानं, भाजीपाला विक्री बंद ठेवण्यात आली आहे. औषध दुकानं, वैद्यकीय सेवा, दूध वितरण सुरु राहणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर शहरात उद्यापासून ३१ जुलैपर्यंत शंभर टक्के टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. या दरम्यान फक्त रुग्णालयालगतची औषधी दुकानं आणि काही अटींवर दूध विक्री सुरू राहणार आहे
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवार २५ जुलैपासून एक ऑगस्टपर्यंत जनता संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. या काळात उमरगा शहरात तालुक्यातल्या किंवा बाहेरगावच्या कोणत्याही व्यक्तीस येण्यास परवानगी असणार नाही.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवाशियांसी संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रम मालिकेचा हा ६७ वा भाग असेल.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव आणि भोकर या तालुक्यातल्या सर्व महसूल मंडळात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४५ महसूल मंडळात पाऊस झाला. किनवट तालुक्यात शिवणी महसूल मंडळात सर्वाधिक ९२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
****

No comments:

Post a Comment