▼

Sunday, 2 August 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.08.2020 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणू संबंधी रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करुन बाधितांवर वेळेत उपचार व्हावेत तसंच वयोवृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष दिलं जावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेला पंचवीस खाटांचा अत्याधुनिक अती दक्षता कक्ष आणि `मिशन झिरो` उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते `ई- प्रणालीद्वारे` करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. विषाणुवर मात हे धोरण प्राधान्यानं राबवून लक्षणं असणाऱ्या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणुचे ५३५ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता एक हजार ७९५ झाली आहे. जिल्ह्यातले तीन हजार सहाशे एकोणचाळीस रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.  

****

देशात कोरोना विषाणुचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६५ पूर्णांक ४४ शतांश टक्के आहे. देशात कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या सतरा लाख ५० हजार ७२३ झाली असून आतापर्यंत अकरा लाख ४५ हजार ६२९ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशात कोरोना विषाणुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण कमी होत असून ही टक्केवारी आता दोन पूर्णांक तेरा शतांश टक्के झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोरोना विषाणुच्या ८५३ रुग्णांचा गेल्या चोवीस तासांमधे उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३७ हजार तीनशे चौसष्ठ झाली आहे. देशात कालपर्यंत एक कोटी ९८ लाख २१ हजार ८३१ तपासण्या करण्यात आल्या असून यात काल चार लाख ६३ हजार १७२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

****

मुंबईत काल दिवसभरात कोरोना विषाणुच्या एक हजार एकोणसाठ नवीन रुग्णांची नोंद झाली असून  ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईतली या रुग्णांची संख्या एक लाख १५ हजार तीनशे सेहेचाळीस झाली असून एकूण मृतांचा आकडा सहा हजार ३९५ वर पोहचला आहे. आतापर्यंत ८७ हजार ९०६ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या मुंबईत या विषाणुचा प्रादुर्भाव झालेले २० हजार सातशे एकोणपन्नास रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

****

सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणुचे १५६ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातली रुग्णसंख्या आता दोन हजार सातशे नव्व्याण्णव झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९० रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या एक हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे ३९१ रूग्ण आढळले असून सध्या तीन हजार २०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ९५७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यामधे आठ रूग्णांचा, उपचार सुरू असताना काल मृत्यू झाल्यामुळे या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४३० झाली आहे.

****

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणुचे ७१ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या आता दोन हजार दोनशे अट्ठावीस झाली असून सध्या ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अमरावतीमधे या विषाणुमुळे मृत्त्यू झालेल्यांची संख्या ६१ आहे.

****

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या आठ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ६२० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून सध्या २१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी साडे आठ वाजता संपलेल्या २४ तासांमधे राज्यातली सर्वाधिक ८६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या काळात हिंगोली जिल्ह्यात १७ मिली मीटर, सोलापूरमधे ४२ मिलीमीटर तर पुण्यात २६ मिलीमीटर पाऊस झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद तसंच मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधे येत्या बुधवारपर्यंत अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या काळात २४ तासांदरम्यान सुमारे ६४ पूर्णांक पाच मिली मीटर ते २०४ पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडेल, असा अंदाज आहे. औरंगाबादसह नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, सांगलीमधेही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  

//**********//

 

 


No comments:

Post a Comment