Thursday, 20 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20 AUGUST 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००

****

** औरंगाबाद जिल्ह्यात कोविडग्रस्तांची संख्या १९ हजार ५२७; आज सात रुग्णांचा मृत्यू

** जालना इथं १०७ वर्षांच्या आजीबाईंची कोरोना विषाणू संसर्गावर यशस्वी मात

** कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुहर्रमच्या मातमी मिरवणुकांना परवानगी नाही

** बीड जिल्ह्यात घरोघरी जाऊन गणेशमूर्ती विक्रीला परवानगी

आणि

** मराठवाड्यात सततच्या पावसामुळे मूग तसंच कपाशीचं मोठं नुकसान

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या १९ हजार ५२७ एवढी झाली आहे. आज दिवसभरात १२० रुग्ण आढळले. ग्रामीण भागातल्या ७९ आणि महापालिका हद्दीतल्या ४१ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, आज सात कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातल्या मुकुंदवाडीतील ६८ वर्षीय, आंबेडकर नगरातल्या ४५ वर्षीय, लासूर स्टेशन इथल्या ७० वर्षीय पुरूष रुग्णांचा आणि शहागंज परिसरातल्या ५२ वर्षीय, रांजणगाव इथल्या ८० वर्षीय, पैठण इथल्या ८० वर्षीय तसंच वैजापूर इथल्या ८० वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड बाधित मृतांची संख्या आता ६१३ झाली आहे. तर १४ हजार ६८९ रुग्ण बरे झाले असून सध्या चार हजार २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

जालना इथल्या विशेष कोविड रुग्णालयात जेष्ठ नागरिक असलेल्या एका वयोवृध्द महिलेनं कोरोना विषाणू संसर्गावर यशस्वी मात केली आहे. १०७ वर्षांच्या या आजीबाईंना दहा दिवसांच्या उपचारानंतर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जालना जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात असून, वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतले तर कोरोना विषाणूवर मात करता येते. त्यामुळे नागरिकांनी या संसर्गाला विनाकारण घाबरुन जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याप्रसंगी बोलताना केलं.

****

अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना कोरोना विषाणू संक्रमणातूनं बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे. दरम्यान, आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ५७ नं वाढ झाली. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या कोविडग्रस्तांची संख्या आता दोन हजार ६३० झाली आहे.

****

सांगली महापालिकेचं कोरोना रुग्णालय आजपासून सुरू करण्यात आलं. १२० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था याठिकाणी उपलब्ध असून अवघ्या सात दिवसात रुग्णालय उभं करण्यात आलं आहे. या रुग्णालयात सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात घरोघरी जाऊन गणेशमूर्ती विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाला परवा २२ तारखेपासून प्रारंभ होत आहे, मात्र जिल्ह्यात उद्या २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी असल्यानं, हा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित बाजारपेठ ही २२ ऑगस्ट रोजी उघडण्यात येणार असल्याचे सुधारित आदेश काढण्यात आले आहेत.

****

काळा पैसा वैध प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कोठडीत असलेले दीवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान या दोघांना मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. ईडीने त्यांना गेल्या १४ मे रोजी अटक केली होती. प्रत्येकी एक लाख रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना, न्यायालयानं त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या प्रकरणात वाधवान यांना आज जामीन मिळालेला असला तरीही, त्यांची सीबीआय कोठडी मात्र कायम आहे.

****

मुस्लीम धर्मियांनी मुहर्रमच्या परंपरेचं साधेपणानं पालन करावं, असं राज्यशासनानं म्हटलं आहे. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलं असून, यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुहर्रमच्या मातमी मिरवणुका काढण्यास परवानगी नसल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. टाळेबंदीच्या काळात इतर धार्मिक कार्यक्रम ज्याप्रमाणे घरात राहून पाळले गेले, त्याप्रमाणे मुहर्रमचा शोकही घरातच राहून करावा, असं या पत्रात म्हटलं आहे.

****

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा दिसत असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मुखर्जी यांचा रक्तदाब, नाडी, तापमान, आदी यंत्रणा स्थिर असून, तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचं, सैन्यदलाच्या रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. दहा ऑगस्टला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून कोमात असलेले मुखर्जी यांना कोविडचीही बाधा झालेली आहे. त्यांना गेल्या दहा दिवसांपासून कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे.

****

केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे देशातल्या असंघटीत क्षेत्राचं गेल्या सहा वर्षात मोठं नुकसान झाल्याची टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. छत्तीसगड काँग्रेस शाखेच्या एका कार्यक्रमात दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून ते संबोधित करत होते. शेतकरी, कामगार आणि छोट्या व्यावसायिकांचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे, परिणामी आगामी काळात रोजगार निर्मिती ठप्प होण्याची भीती गांधी यांनी व्यक्त केली. देशाच्या भवितव्यासाठी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रांचा समतोल साधणं आवश्यक असल्याचं मत गांधी यांनी यावेळी नोंदवलं

****

देशभरात एक कोटी २२ लाख शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डना आतापर्यंत मंजूरी देण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं आहे. कोविड -१९ मुळे कृषी क्षेत्रात आलेली मरगळ दूर करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जात सवलत देण्यात येत असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारच्या आज जाहीर झालेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाच्या क्रमवारीत औरंगाबाद शहर राज्यात सव्वीसाव्या क्रमांकावर आलं आहे. नाशिक महापालिकेचा यंदा देशात अकरावा तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. या यादीत ठाणे चौदाव्या, पुणे पंधराव्या, नागपूर १८, कल्याण डोंबिवली २२ तर पिंपरी चिंचवड २४ व्या क्रमांकावर आहे.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राजीव गांधी यांनी दूरसंचार आणि संगणकाचं युग आणल्यानं आपला देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांचं हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. असं ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या गाडीवाट इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासासोबतच जपानी भाषा शिकवली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही मुलं जपानी भाषा शिकत असल्याचं या प्राथमिक शाळेचे शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी सांगितलं. ते म्हणाले..

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडीवाट या शाळेवर लर्न फॉरेन लँग्वेज या उपक्रमांतर्गत मुलांना कुठलीतरी एक फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयीचा प्रस्ताव दिला होता.त्यात मुलांनी विचार करुन जापनीज भाषा शिकुया असं ठरवलं आणि मग ती कशी शिकायची तर तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकुया. मग सुरुवातीला अँड्राईड मोबाईल फोनवर लर्न जॅपनीज हे ॲप त्यांनी शोधून काढलं.त्यावरुन ती शिकली.जपानी शिकवणारे व्हिडियो होते.त्या व्हिडियोचा वापर करुन शिकायला लागले. मग ही धडपड सुनील जोगदेव सर यांच्या कानावर गेली. ते जपानी भाषेचे टिचर आहेत. आणि मग आता दोन महिन्यांपासून जॅपनीज भाषेचं शिक्षण मुलांना देता आहेत. गुगल मीट या ॲपवरून ऑनलाईन संध्याकाळी सात ते साडे आठ यावेळेत.

 

****

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी कौस्तुभ दिवेगावकर नवे जिल्हाधिकारी म्हणून येणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

मराठवाड्यात सततच्या पावसामुळे मूग तसंच कपाशीचं मोठं नुकसान होत आहे. जालना जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे बहुतांश भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळं पिकांचं नुकसान होत आहे. शेतात उभ्या मुगाच्या शेंगांना कोंब फुटत असून काही भागात कापूस पीकही करपत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे.

 

परभणी जिल्ह्यातही काढणीला आलेल्या मूग पिकांचं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. मानवत तालुक्यात अनेक भागात मूग काढणीला मजूर मिळत नसल्याने काही ठिकाणी मुगांना अंकुर फुटले आहेत. रिमझिम पावसामुळे कापसाचं पिक पिवळं पडत असल्यानं शेतकरी वर्गात चिंता दिसून येत आहे.

 

नांदेड जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे पिकांच नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातला पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरणाच्या पायथा वीज गृहातून आता फक्त दोन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे सांगली, कराड, पाटण इथली पूरस्थिती निवळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आजपासून राज्य परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा प्रवासाला सुरुवात झाली परभणी बसस्थानकावर आज अनेक दिवसानंतर औरंगाबाद, बीड, लातूरकडे जाणारी बस उभी असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळाली. दरम्यान आज दिवसभरात ३५ बस सोडण्यात आल्या.

****

सोन्याच्या दरात आज प्रतितोळा सुमारे दीड हजार रुपये घट होऊन, दिल्लीत सोन्याचा दर प्रतितोळा ५२ हजार ८१९ रुपयांवर स्थिरावला. चांदीच्या दरातही किलोमागे एक हजार ४७६ रुपये घट होऊन चांदीचा दर ६७ हजार ९२४ रुपये किलोवर स्थिरावल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.

****

 

No comments:

Post a Comment